यंदा चांगला अभ्यास करायचाय, पण कसा तेच कळत नाही!

Image: pinterest

यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास करायचा असं सर्वज्ञनं ठरवलं होतं. याला कारण म्हणजे क्षमता असूनही त्याला दरवर्षी परीक्षेत कमी मार्क्स पडतात. शिक्षकांनीही सर्वज्ञच्या पालकांना हेच सांगितलं होतं. सर्वज्ञ हुशार आहे. पण त्याने चांगला अभ्यास करणं, सुरुवातीपासूनच अभ्यास करणं आवश्यक आहे. दरवर्षी  आपल्या बाबतीत हेच होतं, आपल्यात कॅपॅसिटी असूनही आपल्याला चांगले मार्क्स पडत नाही, याला आता स्वत: सर्वज्ञच कंटाळला होता. म्हणूनच त्याने यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास करण्याचं ठरवलं आहे. सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास  करण्याचा निश्चय सर्वज्ञने केला असला तरी नेमका चांगला अभ्यास म्हणजे काय? तो कसा करावा? याबाबत त्याचा गोंधळ उडाला होता. ऊर्जाला हा गोंधळ समजला आणि सर्वज्ञच्या एवढ्या चांगल्या निश्चयला मदत करण्याचं ऊर्जानं ठरवलं.  शिक्षण तज्ज्ञांशी बोलून चांगला अभ्यास कसा असतो, तो कसा करावा? हे समजून घेतलं. सर्वज्ञ सोबतच इतर सगळ्यांनाही मी जे सांगणार आहे, त्याचा नक्की फायदा होईल.

हेही वाचा!

चांगला अभ्यास कसा करावा?

१. तासनतास एका जागी बसून, जागेवरुन न हलता अभ्यास करणं म्हणजे चांगला अभ्यास असं बऱ्याच जणांचं मत असतं. पण एवढा अभ्यास करुनही डोक्यात काहीच शिरलेलं नसतं. मग अशा अभ्यासाला चांगला अभ्यास म्हणता येणार नाही. अभ्यास मोजकाच करावा पण लक्षपूर्वक करावा, लक्ष देवून करावा हा चांगला अभ्यासाचा पहिला नियम आहे. अभ्यासाबाबत आपण फोकस्ड असलं पाहिजे. शाळेत, क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतात तेव्हा केवळ शिकवण्याकडेच लक्ष हवं, आपण घरी जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा आपलं लक्ष केवळ अभ्यास करण्यावरच केंद्रित हवं. लक्ष देवून अभ्यास केल्यास तो समजतो आणि तो लक्षातही राहातो.

२. सगळा धडा घोकून पाठ करुन टाकणं, पुस्तकात लिहिलेलं जसंच्या तसं वहीत उतरवून काढणं म्हणजे देखील चांगला अभ्यास नव्हे. केवळ घोकंपट्टी केल्यानं, वहीत रखडल्यानं अभ्यास चांगला होत नाही. त्यासाठी समजून उमजून अभ्यास करण्याचं तंत्र आहे. एखादी गोष्ट पूर्ण समजेपर्यंत तिचा सराव करणं, जे समजलं आहे ते आपल्या भाषेत लिहून काढणं, प्रत्येक विषयाच्या आपल्या भाषेत नोटस काढणं, रोज शाळेत जे शिकवलेलं असतं, ते आपल्याला किती समजलं आहे, हे तपासून बघण्यासाठी डोळे लावून काय आठवतयं ते बघणं किंवा जे आठवतंय ते लिहून काढणं, या पध्दतीमुळे अवघड संकल्पना नीट समजतात. विज्ञानातले प्रयोग स्वतः करून पाहणे, स्वतः काही प्रश्न तयार करून ते सोडवणे, गणिताची उदाहरणं तयार करून ती  सोडवल्यामुळे त्याचा चांगला फायदा विषय समजण्यासाठी होतो. 

Image: freepik

हेही वाचा!

३. अभ्यास चांगला होण्यासाठी आपल्या अभ्यासाची एक विशिष्ट वेळ ठरलेली असावी. त्यासाठी आपली शाळा, क्लास इतर छंद यांचा विचार करुन रोजच्या अभ्यासाचं एक वेळापत्रक करावं आणि आपण केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास व्हायलाच हवा याबाबत ठाम असायला हवं. आपल्या या अभ्यासाच्या वेळापत्रकात मधे मधे खेळण्यासाठी, आपल्या छंदासाठी वेळ असायला हवा. मधे मधे ब्रेक घेतल्याने , मोकळं खेळून आल्यानं, आपल्याला आवडतो तो छंद जोपासल्यानं अभ्यास केल्यामुळे मनावर जो ताण येतो, मेंदू जो थकतो त्याला आराम मिळतो. आणखी ऊर्जा मिळते आणि नवीन जोमानं अभ्यास करण्याची ताकद मिळते. त्यामुळे चांगला अभ्यास होण्यासाठी किमान पाऊण तास मैदानी खेळ हवाच.

४. अभ्यास करताना आपण आपलेच् ध्येय ठरवायला हवं. प्रत्येकाची ध्येयं वेगळी असू शकतील. उदा. अमूक दिवसात अमूक विषयाचा इतका भाग समजून, नोटस् काढून तयार असायला हवा.. या प्रकारची अभ्यासाची छोटी छोटी ध्येयं ठरवावी. हवं तर आठवडाभराच्या अभ्यासाचं ध्येय आठवड्याच्या सुरुवातीला एका कागदावर लिहून काढावं आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा. आठवड्याच्या शेवटी आपण ठरवलेलं ध्येयं गाठलं की नाही, किती गाठलं याची चाचपणी आपली आपणच करावी. यामुळे अभ्यास विभागला जातो. अभ्यासाचे छोटे छोटे तुकडे करुन अभ्यास केल्याने तो जास्त चांगला समजतो.

५. शाळेत शिकवलेलं असलं तरी जेव्हा आपण स्वत: अभ्यास करायला बसतो तेव्हा काही गोष्टी अडतात. जे अडलंय ते शिक्षकांना विचारण्यात कमीपणा बाळगू नये, शंका विचारण्यास घाबरु नये. जे अडलंय ते लगेच समजून घेतल्याने अभ्यास चांगला होण्यास मदत होते.

हेही वाचा!

Image: freepik

६. एकट्याने अभ्यासाचा कंटाळा येत असेल तर घरी भावंडं असल्यास त्यांच्यासोबत अभ्यासाला बसावं. किंवा मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र अभ्यास करावा. एकत्र अभ्यास केल्यानं चर्चा होतात, काही शंका असल्यास त्याही एकमेकांच्या मदतीने सुटतात. एकमेकांच्या सोबतीने अभ्यास केल्यास अभ्यास करण्यात मन लागतं, अभ्यास करणं आवडतं आणि जास्त अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. एकत्र मिळून अभ्यास केल्यानं अवघड विषय, विषयातल्या अवघड संकल्पना समजण्यासही मदत होते.

७. जे समण्यास अवघड आहे, किचकट आहे, त्याचा नियमित सराव करावा. सरावानं जे अवघड जातं ते सोपं व्हायला मदत होते.

८. आपण जो अभ्यास केलाय तो आपल्याला किती समजला, किती आठवतोय हे बघण्यासाठी त्याची उजळणी करावी. नेहमी आधी केलेल्या अभ्यासाची थोडी उजळणी आणि मग पुढचा अभ्यास असं केल्यास अभ्यास चांगला लक्षात राहातो.

९. अभ्यास हा नेहमी शांत ठिकाणी करावा. आपली अभ्यासाची जागा देखील ठरलेली असावी. ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या जागेवर अभ्यास केल्यानं अभ्यासाचा चांगला मूड तयार होतो.

१०. अभ्यास करताना मोबाइल दहा हात दूर ठेवावा. म्हणजे सारखं मोबाइलकडे लक्ष जाणार नाही. अभ्यास करताना लक्ष विचलित होवू न देण्याचा नियम पाळला तर अभ्यास लक्षपृवक करण्याचा नियम आपोआप पाळला जातो.

जसं सर्वज्ञने सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास करण्याचा निश्चय केला तसा तुम्हीही करायला हरकत नाही. आणि चांगला अभ्यास करण्याच्या सोप्या टिप्स तर मी तुम्हाला सांगितल्या आहेच. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact