किचकट विषयांचा अभ्यास सोपा करण्यासाठी फक्त १० उपाय करा !

Image: freepik

आपल्या घरी पाहुणे आले की काय होतं? याचं निरिक्षण केलंय का कधी? म्हणजे आधी आई बाबांची कशी धांदल उडते, पाहुणे येण्याच्या आधी ते कशी तयारी करतात, प्रत्यक्ष पाहुणे आल्यानंतर कसे हसतमुखानं स्वागत करतात, पाहुण्यांसोबतचा वेळ मजेत घालवतात. आधी पाहुणे येणार म्हणून थोडे गोंधळून गेलेले आई-बाबा पाहुणे येणार याचं टेन्शन घेवून हातावर हात ठेवून बसले नाही. उलट जे टेन्शन आलं, त्याचा वापर त्यांनी पाहुण्यांच्या स्वागताची चांगली तयारी करण्यासाठी केला. हे उदाहरण आहे एका अभ्यासाशी संबंधित समस्येवरचा उपाय शोधण्यासाठी. तर समस्या अशी आहे की, चिन्मय, गंधाली, शिवम, सोहम, देविका हे चांगल्या गुणांनी वरच्या वर्गात गेले. आता त्यांच्या अभ्यासक्रमात तीन नवीन विषय आले आहेत. त्याचं त्यांनी फारच टेन्शन घेतलंय. ते एकत्र भेटले की सारखे किती अवघड, कसं जमेल असं म्हणत फारच गंभीर होवून चर्चा करतात. पण या बोलण्यानंतर मात्र त्यांचं या विषयांबद्दलच टेन्शन आणखीनच वाढतं.

खरंतर असं नवीन विषयांबद्दलचं टेन्शन अनेकांना आलंय. पण हे टेन्शन घालवण्याचे सोपे उपाय आहेत. ते उपाय वापरुन पाहिलेत ना की भूमिती, रसायनशास्त्र, फाॅरेन लॅंग्वेज हे अवघड विषयही आवडायला लागतील. अर्थात मी जे उपाय सांगणार आहे ना ते शिक्षणाच्या विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले आहेत.

हेही वाचा!

विषयांची भीती वाटते.. हे करुन पाहा!

नवीन अनोळखी विषयांची भीती वाटणे स्वाभाविकच. अनोळखी गोष्टींना दिली जाणारी ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आपण या विषयांना घाबरतो किंवा या विषयांची आपल्याला भीती वाटते म्हणून त्याबद्दल कमीपणा वाटण्याची गरज नाही.  शिवाय भीती वाटते म्हणजे आपल्याला हे विषय कधीच समजणार नाही, कधीच येणार नाही, त्यात चांगले गुण मिळणार नाहीत असं मानण्याचं काही कारण नाही.  उलट आपल्याला या विषयांची भीती वाटते म्हणजे कसली भीती वाटते हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. भीतीमध्येच अडकून न राहाता पुढे जावं.

समजा आपल्याला मोठी उडी घ्यायची आहे. ही मोठी उडी घेणं अवघड आहे. आपण ती घेवू शकू की नाही याचा आपल्याला अंदाज नाही. आणि तरीही आपण एकदम मोठी उडी मारली तर काय होणार? पडणार, आपल्याला लागणार, आपला आत्मविश्वास कमी होणार? आपल्याला मोठी उडी कधी मारताच येणार नाही असा आपला पक्का समज होणार. त्या मोठ्या उडीसाठी जर आपण टप्प्याटप्प्याने प्रयत्न केले असते तर असं झालं नसतं. हेच आपल्याला अवघड वाटणाऱ्या विषयांबाबतही लागू होतं. नुकतीच हे विषय शिकवायला आणि शिकण्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अख्खं पुस्तक एकदम समजून घ्यायला गेलात तर ते अवघडच वाटणार. विषय अवघड असले, अनोळखी असले तरी सोप्यापासून अवघडापर्यंत जाण्याचा एक एक टप्पा असतो. तो पार केला, एक एक कन्सेप्ट शिकत गेलं की विषय कळतो, तो सोपा वाटायला लागतो. भूमिती, रसायनशास्त्र, फाॅरेन लॅंग्वेज यांचा एक एक धडा समजून घेतानाही आधी पूर्ण धडा वाचायचा. मग त्या धड्याचे आपल्याल झेपतील असे परिच्छेद पाडायचे. एका वेळी एक-एक, दोन-दोन परिच्छेद समजून घेत पुढे जायचं. जे अडतंय, ते त्याच टप्प्यावर समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. समजा समजत नसेल तर शाळेत शिक्षकांची किंवा आपल्या वर्गमित्रांची मदत घ्यायची. पण जेव्हाची शंका तेव्हाच सोडवायची.

भूमिती, रसायनशास्त्र, परकीय भाषा हे विषय म्हणजे गंभीरपणेच शिकायला हवेत असं नाही. खेळकर पध्दतीनेही हे विषय शिकता येतात. भूमितीतल्या अवघड संकल्पना खेळकर पध्दतीने सोप्या पध्दतीने सांगणारे व्हिडीओज असतात. आई बाबांच्या मदतीने ते इंटरनेटवर शोधता येतात.  भूमितीतल्या संकल्पना केवळ विषय म्हणून शिकायच्या नाही  तर त्या 'व्हिज्युलाइज' करायच्या. म्हणजे डोळ्यासमोर उभ्या करायच्या. या पध्दतीने विषय सोपा होतो. आपल्या खेळण्याच्या वस्तूत ठोकळे, रिंग्ज, पट्ट्या असं बरंच काहीकाही असतं. त्याचा उपयोग करुन भूमितीतले आकार, द्विमिती, त्रिमिती या संकल्पना समजून घेता येतात.

रसायनशास्त्र हा खरंतर खूप मजेदार विषय आहे. रसायनशास्त्रात अनेक सूत्रं असतात. प्रत्येक घटकाचं रसायनशास्त्रात  एक विशिष्ट नाव असतं. ते लक्षात ठेवणंच अवघड वाटतं. त्यासाठी रसायनशास्त्रातले सूत्र रोजच्या बोलण्यात वापरायचे. उदा. मी H2O पितोय. म्हणजे पाणी पितोय. अशीच बाकीची सूत्रंही वापरायची, म्हणजे ती लक्षात राहातात. दोन रासायनिक घटक एकत्र येणं, त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होणं ही खरंतर उत्सुकता वाढवणारी बाब आहे. हे असं घडलं की काय होत, या उत्सुकतेनं हे समजून घेतलं तर रसायनशास्त्र हा विषय आवडू लागतो.

फाॅरेन लॅंग्वेज शिकतानाही  त्या विषयासोबत खेळण्याचं सूत्र अवलंबवायचं. जास्तीत जास्त नवीन शब्द जाणून घेणे, जेवढं व्याकरण शिकवलेलं असतं त्याचा उपयोग करुन आपण शिकलेले शब्द प्रत्यक्ष वापरुन बघणं, त्या भाषेत सोप्या सोप्या वाक्यरचना करणं, त्या भाषेतील चित्रपट, मालिका बघणं हे केलं की ही फाॅरेन लॅंग्वेज हळूहळू आवडू लागते.

Image: freepik

नवीन विषय शिकताना आपण अडखळतो, चुका होतात. पण चुका झाल्यानं स्वत:वर, त्या विषयावर चिडायचं नाही. आपण शिकतोय, शिकण्याचा,समजून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून चुका होतात हे समजून घ्यावं.

एखादी गोष्ट अवघड वाटते, कठीण वाटते तेव्हा ती सोपी करण्याचा उपाय म्हणजे रोज सराव करावा. शाळेत त्या विषयांचा तास असो किंवा नसो, शिक्षकांनी त्या विषयाचा गृहपाठ दिलेला असो किंवा नसो आपण रोज एक ठराविक वेळ त्या विषयाचा अभ्यास करायचा असं ठरवून रोज अभ्यास केला, त्या विषयाचा सराव केला तर अवघड वाटणाऱ्या विषयांबद्दल गोडी निर्माण होते. तो विषय आवडू लागतो. आता हे समजलं, आता पुढे काय अशी उत्सुकता निर्माण होते. त्या विषयातल्या कठीण गोष्टी शिकण्यासाठी मनाची तयारी होते.

अवघड वाटणरे विषय समजून घेताना जास्त घाई करुन चालत नाही. त्यासाठी संयम हवा. कितीही अवघड वाटत असला तरी रोज त्या विषयाचा सराव करायला हवा. आणि आपण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, रोज सराव करतो आहोत तर हा विषय आपल्याला नक्की समजेल असा पाॅझिटिव्ह दृष्टिकोन हवा.

अवघड, अनोळखी गोष्टींबाबत भीती वाटणं ही सामान्य बाब आहे. खरंतर या भीतीमुळेच त्या विषयाकडे वळण्याची, ते बारकाईने समजून घेण्याची इच्छा निर्माण होते. पण इतकी पण भीती वाटू देवू नका की त्या विषयाला हात लावण्याची इच्छाच होणार नाही.

नवीन विषयाला घाबरण्याची गरज नसते. अवघड वाटत असले तरी आता ते आपल्याला जमणार नाही, अशक्य आहे असं वाटून घेण्याची गरज नसते. तुमचा वयोगट, त्या वयोगटाची बौध्दिक, शारीरिक, मानसिक क्षमता या सर्वांचा विचार करुनच त्या त्या वर्गाला नवनवीन विषय अभ्यासक्रमात येत असतात. त्यामुळे आज अवघड वाटत असले तरी रोजच्या प्रयत्नांनी हे विषय सोपे होणार आहेत, आपल्या आवडीचे होणार आहेत हे लक्षात घ्या.

नव्याचं स्वागत नेहेमी उत्साहानं, आनंदान, जिज्ञासू वृत्तीनं, कुतुहलानं करावं. हे अवघडच आहे, आपल्याला जमणारच नाही असं म्हणत कपाळावर आठ्या घालून नव्हे!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact