परकीय भाषा शिकण्याचा पुढे जावून काय उपयोग होईल?

Image: freepik

चौथीतून पाचवीत गेलो की एकदम मोठं झाल्यासारखं वाटतं. आपण शहाणे झालो आहोत, आपल्याला कळायला लागलंय याची जाणीव होवून छान वाटायला लागतं.  आपल्याला आपले इंटरेस्ट कळू लागतात, स्वत:ची ओळख होवू लागते. तसंच अभ्यासाच्या बाबतीतही नवनवीन विषयांनी एंट्री केलेली असते. आता थोडी अवघड शिकण्याची, जास्त अभ्यास करण्याचीही तयारी झालेली असते.  आपण हिंदी-मराठी- इंग्रजी या भाषा शिकतच असतो , या भाषांव्यतिरिक्त फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन यापैकी एक  परकीय भाषा ( फाॅरेन लॅंग्वेज) अभ्यासाला येते.  

आपण ज्या हिंदी-इंग्रजी-मराठी या भाषा शिकतो, त्यांचं महत्व, पुढे जावून त्याचा उपयोग, फायदे आपल्याला माहीत असतात. पण ही परकीय भाषा शिकून नेमकं काय मिळणार आहे, हे काही आपल्याला कळत नसतं. त्यामुळे अनेकांना परकीय भाषेचा अभ्यास करणं कंटाळवाणं वाटतं, तर काहींना मात्र परकीय भाषा शिकण्यात आनंद वाटतो, थ्रिल वाटतं. थ्रिल हे फक्त गोष्टीच्या पुस्तकात किंवा चित्रपटात असतं असं नाही.  या थ्रिलचा अनुभव आणि आनंद आपण अभ्यासातही घेवू शकतो. परकीय भाषेचा अभ्यास आपल्याला असाच थ्रिलचा अनुभव देतो.

अनेक परदेशी विद्यापिठांनी शाळेत असताना परकीय भाषा शिकण्याचे परिणाम यावर अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षांतून त्यांना एक सोडून अनेक फायदे होत असल्याचं आढळलं आहे. ते वाचून परकीय भाषा शिकण्याची आवड तुमच्यातही नक्कीच निर्माण होवू शकते. मग भलेही शाळेच्या अभ्यासक्रमात परकीय भाषा विषयाचा समावेश नसेल, पण आपण एखादा क्लास लावून ही भाषा शिकायला हवी अशी इच्छा तर नक्कीच निर्माण होईल. परकीय भाषा शिकण्याचे असे काय फायदे आहेत?

हेही वाचा!

परकीय भाषा शिकल्याने काय होतं?

परकीय भाषा ही पूर्णपणे नवीन असते. नुसतेच शब्द नवीन नाही तर या भाषेचं व्याकरण, तिची रचना, वाक्यरचना सगळंच वेगळं असतं. अशी पूर्णत: वेगळी भाषा शिकल्याने अवघड समजून घेण्यची आपल्या मेंदूची क्षमता वाढते. परकीय भाषेतले नवीनं अक्षरं शिकण्याचा, शिकून ती ओळखण्याचा, नवीन् शब्द , त्याचे अर्थ समजून ते लक्षात ठेवण्याचा मेंदू प्रयत्न करत असतो. जसजशी परकीय भाषा आपण शिकत जातो तसा तिचा वापर करण्याचा प्रयत्न मेंदू करतो. आपल्याला जेवढी भाषा समजलीय, जितके शब्द अर्थांसह माहिती झालेले आहे ते वापरुन आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. परकीय भाषा शिकण्याच्या या पध्दतीमुळे आपल्या मेंदूची ताकद वाढते, आकलन क्षमता वाढते, समस्या सोडवण्याचं कौशल्य वाढतं. अवघड गोष्टींचा विचार करण्याचं मेंदूचं कौशल्य सुधारतं. परकीय भाषा शिकण्याच्या या प्रयत्नानं आपल्या मेंदूप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा होते. आपण वागण्या बोलण्यात अधिक स्मार्ट होतो. चारचौघांसमोर बोलण्याचं आपली मतं मांडण्याचं धाडस वाढतं.

जे वापरलं जातं ते उपयोगी ठरतं, जे वापरलं जात नाही ते निरुपयोगी ठरुन मागे पडतं. गळून पडतं. ही बाब आपल्या मेंदूच्या बाबतीतही आहे. मेंदू जर ताजातवाना ठेवायचा असेल तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग करता यायला हवा. परकीय भाषा शिकताना मेंदूचा खूप वापर होतो. परकीय भाषेतले नवीन शब्द, नवीन वाक्यरचना समजून घेवून लक्षात ठेवण्याचं मेंदूचं काम वाढतं. मेंदू असा खूप वापरल्या गेल्यानं आणखी स्मार्ट होतो. नवीनवीन चॅलेंजेस स्वीकारण्याची मेंदुची क्षमता वाढते.

परकीय भाषा शिकताना मेंदुचं काम सुधारतं, आपली आकलनशक्ती वाढते तसेच आपली स्मरणशक्ती देखील वाढते. मेंदुचं मल्टी टास्किंग करण्याचं कौशल्य वाढतं. परकीय भाषा शिकताना नवीन शब्द, त्यांचे अर्थ, परकीय भाषेची वाक्यरचना हे सर्व समजून घेताना मेंदू ते प्रत्यक्ष वापरुन बघतो, या परकीय भाषेतून विचार करुन बघतो.

एक वेगळी भाषा शिकण्याच्या प्रयत्नांनी आपला मेंदू आणि मन खूप सजग होतो. आजूबाजूचं बारकाईनं निरिक्षण करण्याची मेंदुची क्षमता वाढते. जे असंबंध्द आहे, निरर्थक आणि खरं नाही त्याची मेंदु आणि मनाला पटकन ओळख पटते. योग्य आणि अर्थपूर्ण गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची सवय मेंदुला लागते. योग्य ते टिपण्यासाठी आपला मेंदू जास्त तीक्ष्ण होतो. चपळ होतो. मेंदुला पटापट सूचतं. परकीय भाषेच्या अभ्यासामुळे मेंदू आणि मन स्ट्राॅंग होतं.

परकीय भाषा शिकत असताना आपली इतर कौशल्यं (स्किल्स) देखील वाढतात. परकीय भाषा शिकताना खूप बारकावे शिकावे लागतात. काय चूक काय बरोबर याचा निवाडा मेंदुला करावा लागतो. नवीन शब्द, शब्दाचा अर्थ, दिसणारे अर्थ, छुपे अर्थ , इतर अर्थ यांचा शोध घ्यावा लागतो. यामुळे आपल्या मेंदुचं निर्णय घेण्याचं कौशल्य वाढतं.

परकीय भाषा शिकत असताना आपण आपल्या मूळ भाषेचाही चांगला अभ्यास करतो. आपल्या भाषेला बारकाईने समजून घेतो. कोणतीही नवीन गोष्ट, अवघड गोष्ट शिकताना लक्ष देण्याची गरज सर्वात जास्त असते. परकीय भाषा शिकताना ऐकून घेण्याची क्षमता वाढते. आपण सर्वच गोष्टींकडे बारकाईने लक्ष देवू लागतो.

इतर विषय समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे , इतर विषयांचं आकलन या गोष्टीही सुधारतात.

परकीय भाषा शिकताना आपला दृष्टिकोन व्यापक होतो. आपण जी भाषा शिकतो, ती भाषा बोलणारे लोक, तो देश, तेथील संस्कृती, राहाणीमान, खानपान या गोष्टी समजून घेण्याची उत्सुकता वाढते. जग समजून घेण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते.

परकीय भाषा शिकल्याने पुढे भविष्यात उत्तम करिअर करण्याची संधी मिळते.

 Image: freepik

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact