
Image: freepik
सानिका दुपारच्या वेळेत टीव्ही लावून लोळत बसली होती. खरंतर तिचं टीव्हीमध्येही मन रमत नव्हतं. सारखं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत, मग पुन्हा टीव्हीसमोर असं तिचं चाललं होतं. सानिकाचं काय चाललंय हे कम्प्युटरवर काम करत असतानाही आईच्या हे लक्षात आलं होतं. असं एकदा नाही तर अनेकदा होतं. ज्यादिवशी गृहपाठ नसेल तेव्हा टीव्ही लावून लोळत बसणं, अळमटळम करणं असंच सानिकाचं सुरु असायचं. शेवटी आई संध्याकाळी थोडा कामात ब्रेक घ्यावा म्हणून उठली . तिने तिच्यासाठी आणि सानिकासाठी चहा ठेवला. चहा ठेवता ठेवताच आईने सानिकाला हाक मारुन किचनमध्ये बोलावलं. 'सानिका तुला आज अभ्यास नाही करायचा?'
' आज टीचरने काही गृहपाठच नाही दिला ना आई, मी काय करु'
'मग काय टीव्ही बघायचा का?'
' गृहपाठच नाही तर मग टीव्हीच बघणार ना मी?'
हेही वाचा!
सानिकाच्या या उत्तरानं आईला थोडा रागच आला. पण रागवून बोललं तर सानिका जे सांगेल ते ऐकणारच नाही याची आईला खात्री होती. म्हणून आई शांतपणे सानिकाला म्हणाली, ' अगं गृहपाठ नसला तरी करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. उगाच टीव्ही पाहाण्यात वेळ कशाला घालवायचा? '
आई शांतपणे बोलत असली तरी आई आपल्याला टोकते आहे, हे सानिकाला कळत होतं. मग तीही वैतागली. गृहपाठच नसेल तर करण्यासारखं काय असतं आई? मला काही सूचत नाही!'
सानिका चिडलेली बघून आई तिला म्हणाली, ' अगं चिडतेस कशाला? नाही सूचत तुला तर मला खूप पर्याय माहीतीयेना, मी आहे ना सांगायला, विचार मला!'
' बरं सांग!' सानिका पुन्हा वैतागूनच म्हणाली.
मला काय वाटतं सानिका ज्या दिवशी टीचर गृहपाठ देत नाही, त्यादिवशी त्यांची अपेक्षा अशी असेल की तुम्ही तुमचा तुमचा अभ्यास करावा. प्रत्येक वेळेस दिला तरच आणि तेवढाच अभ्यास करायचा असं नाही. तुम्हाला प्रोजेक्टचं काम दिलेलं असतं. भलेही तो प्रोजेक्ट दोन महिन्यांनी शाळेत द्यायचा असेल. पण ज्या दिवशी गृहपाठ नसेल त्या दिवशी थोडा वेळ प्रोजेक्टचं काम करावं. आपल्या डोक्यातून प्रोजेक्टच्या विषयासंदर्भात काहीनाकाही सुरु राहातं. नवीन काही सूचत. ते लिहून ठेवावं.
गृहपाठ नसेल त्यादिवशी झालेल्या अभ्यासावर नजर घालावी. त्याचं वाचन करावं. अवघड वाटलेली गणिताची उदाहरणं पुन्हा सोडवून बघावी. दुसऱ्या दिवशी शाळेत जे शिकवणार आहेत, ते वाचावे. घरात कितीतरी पुस्तकं पडलेली आहेत. हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतली गोष्टीची पुस्तकं आहेत. त्यातलं एखादं काढून वाचावं. अशा वाचनामुळे थकलेला मेंदू रिलॅक्स होतो.
चित्रं काढावं किंवा एखादी हस्तकलेची वस्तू तयार करावी. यामुळे आपला क्रिएटिव्ह मेंदू चांगला काम करतो. आपल्याला नवीन नवीन कल्पना सूचतात.

Image: freepik
व्यायाम होत नाही एरवी. तर गृहपाठ नसलेल्या वेळेत थोडा व्यायाम करावा, थोडं सायकलिंग करुन यावं. नाहीतर मैत्रिणींबरोबर खेळून यावं. पण हे सर्व सोडून् गृहपाठ नाही म्हणून मिळाला वेळ अन लावला टीव्ही हे चूकच आहे सानिका असं मला वाटतं.. आता तू ठरव, तुला काय करायचं ते?'
असं म्हणून आईने दोन कपात चहा ओतला. सानिकाला चहा आणि बिस्किट देवून आई पुन्हा कम्प्यूटरसमोर जावून बसली. सानिकाला आईने सांगितलेल्या गोष्टी पटलेल्या होत्या. चहा प्यायल्यानंतर सानिकाने टीव्ही बंद केला आणि चित्रकलेची वही घेवून आई जिथे बसली होती तिथे जावून बसली. सानिकाने पुढे वाद घातला नाही, ती चित्रं काढू लागली याचा अर्थ तिला आपण जे काही सांगितलंय ते पटलंय हे पाहून आईलाही बरं वाटलं. एकीकडे आई तिच्या कामात मग्न झाली आणि दुसरीकडे सानिका चित्रं काढण्यात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact