झाडं आणि फुटबाॅलची गट्टी जमवणारा लेसिन एक गोल केला की ११ झाडं लावतो.

Image: newsweek

लेसिन मुटुनकेई हा केनया देशात राहणारा मुलगा. फुटबाॅल खेळण्याची आवड असणारा. तो नैरोबीच्या 'लिटील लीग' या लोकल टीममध्ये फुटबाॅल खेळतो. लेसिनचा खेळ आणि झाडं यात घनिष्ट संबंध आहे. आता तुम्ही म्हणाल फुटबाॅलचा आणि झाडांचा काय संबंध? तुम्हाला पडलेला प्रश्न अगदी बरोबर असला तरी लेसिन आणि झाडं यांचा संबंध आहे. कारण आपल्या संघातर्फे खेळताना लेसिन जितके गोल करतो त्याच्या अकरा पट झाडं लावतो. एक गोल केला की ११  झाडं असं त्याचं सोपं गणित आहे. तो असं करतो कारण त्याचं जितकं फुटबाॅलवर प्रेम आहे तितकंच निसर्गावरही आहे. हवामान बदलामुळे आपलं पर्यावरण, आपल्या पृथ्वीचं जे नुकसान होतंय ते कमी करण्याचा एक मार्ग त्याला झाडं लावण्याच्या कृतीत दिसतो आहे. झाडं लावून आपण आपलं पर्यावरण आणि पृथ्वी वाचवण्याच्या कामात आपलं छोटंसं योगदान द्यायला हवं या विचाराने लेसिनने फुटबाॅलमधील गोल आणि झाडं लावणं यांची गट्टी जमवली आहे.

सन २०१२ पासून  लेसिनने 'ट्रीज4गोल्स' नावाच्या प्रकल्पाची सुरुवात केली. आपल्या लोकल टीमबरोबर तो जिथे जिथे फुटबाॅल खेळायला जातो तिथे तिथे तो आपल्या या प्रकल्पाचा प्रचार प्रसार करतो. आपली आवड आणि निसर्गाप्रतीचं आपलं प्रेम यांची मैत्री आपण कोणतंही काम करताना, कोणताही खेळ खेळताना आणि वयाने कितीही लहान मोठे असताना घालू शकतो, हेच लेसिन प्रत्येकाला सांगत असतो .

हेही वाचा!

लेसिनला अगदी लहान असल्यापासून निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप आवडतं. दिवसभर घराबाहेर राहणं, खेळणं, घरी येताना हात-पाय कपडे चिखल मातीने भरवून येणं हा त्याचा लहानपणीचा आवडता उद्योग असायचा. पण म्हणून लेसिनची आई त्याला कधीच रागवायची नाही. उलट मुलगा निसर्गात रमतोय याचा तिला आनंद व्हायचा. लेसिनला अगदी चालायला यायला लागलं तेव्हापासून त्याला फुटबाॅल हा खेळही आवडू लागला.  दहा वर्षांचा झाल्यानंतर २०१२ मध्ये त्याने फुटबाॅलचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि नंतर तो केनियाच्या 'लिटील लीग' या संघात दाखला झाला. संंघासाठी फुटबाॅल खेळू लागला.

लेसिनला शाळेत ज्या प्रकारे हवामान बदल (क्लायमेट चेंज) याबद्दल जे सांगितलं जायचं ते अजिबात आवडायचं नाही. शिक्षक नुसती हवामान बदलाची थिअरी सांगायचे. पण त्यातून आज आपण हवामान बदल थांबवण्यासाठी काय करु शकतो हे मात्र सांगायचे नाही. शिवाय निसर्ग, पर्यावरण, हवामान याबद्दल जे काही सांगायचे ते  २००० सालापूर्वीचं सांगायचे. तेव्हाचं हावामान, निसर्गाची -पर्यावरणाची स्थिती तुलनेने चांगली होती. पण आपण आता काय करायला हवं, हे मात्र लेसिनला शिक्षकांच्या सांगण्यातून काही कळायचं नाही. आपल्या शिक्षकांनी आपल्याला काहीतरी काम करायला / कृती करायला सांगायला हवी असं वाटायचं, पण ते होत नव्हतं. त्यामुळे शाळेत क्लायमेट चेंज या विषयाशी लेसिन स्वत:ला जोडूच शकत नव्हता.

Image: traileoni.i


शिक्षक क्लायमेट चेंजबद्दल एकदा सांगत असताना लेसिनला एक ८ वर्षांपूर्वीची घटना आठवली. तो जिथे राहयचा त्या भागातल्या मोकळ्या जागेत लेसिन आपल्या मित्रांसोबत फुटबाॅल खेळायचा. त्या जागेत एक झाड होतं. पण लेसिनसाठी ते नुसतं झाड नव्हतं तर ते झाड म्हणजे लेसिनला आपला फुटबाॅल खेळातला सहकारीच वाटायचं. ते मोठं झाड कसलं होतं, त्याला कोणती फळं-फुलं यायची हे काहीच लेसिनला माहीत नव्हतं. पण ते झाड मात्र लेसिनच्या फुटबाॅल खेळाचा एक भाग झालं होतं. फुटबाॅल खेळताना बाॅल जर कुंपणापलिकडे गेला तर लेसिन त्या झाडावर चढूनच त्या कुंपणापलिकडे जावून आपला बाॅल आणायचा. त्यामुळे ते झाडही आपल्यासोबत फुटबाॅल खेळतंययासं लेसिनला वाटायचं. पण एके दिवशी ते झाड कोणीतरी कापून टाकलं आणि लेसिनला खूप वाईट वाटलं. दु:ख झालं. लोकं उगाचच्या उगाच झाडं तोडतात, नवीन झाडं लावतही नाही हे देखील लेसिनला समजायला लागलं. तेव्हा लेसिनला आपणही झाडं लावायला हवीत असं वाटायला लागलं. आपण फुटबाॅलची मॅच खेळताना जितके गोल करु त्याच्या अकरापट झाडं लावू असं त्याने ठरवलं आणि नुसतंच ठरवलं नाही तर तसं तो करुही लागला.

Image: newsweek.com

हळूहळू लिटील लिग या त्याच्या टीममधले इतर खेळाडुंनाही लेसिनची ही गोल आणि त्याच्या अकरापट झाडं लावण्याची कल्पना खूप आवडली. लेसिन ज्या शाळेत जायचा त्या शाळेतही त्याने ही कल्पना सांगितली. तिथेही सर्व मुलांना आणि शिक्षकांना ती आवडली. त्या सर्वांनी लेसिनच्या प्रमाणे आपणही झाडं लावायचं ठरवलं. मग लेसिनने 

'ट्रीज4गोल्स' नावाचा झाडं लावण्याचा प्रकल्पच सुरु केला. आज त्याच्या या प्रकल्पामध्ये केनियातील १५ शाळा आणि फुटबाॅल क्लब्ज सहभागी झाले आहेत. या प्रकल्पात सहभागी झालेले सदस्य आपल्या घराच्या आजूबाजूला, शाळेच्या आजूबाजूला, मोकळ्या परिसरात, जंगलात झाडं लावत आहेत. लेसिन आणि त्याच्या फुटबाॅल टीममधील २२ जणांनी एके दिवशी गेम झाल्यानंतर केनियाच्या जवळील कारुरा जंगलात एका दिवसात ७०० झाडं लावली. लेसिनच्या 'ट्रीज4गोल्स'  या प्रकल्पाने जुलै २०२२ पर्यंत ५,५०० झाडं लावली आहेत. एकट्या लेसिनने त्यातली १००० झाडं लावली आहेत.

हेही वाचा!

लेसिनला हा 'ट्रीज4गोल्स' हा प्रकल्प जगभरात न्यायचा आहे. विविध खेळ खेळणारे, काम करणारे, शाळेत जाणारे अशा प्रत्येकाने झाडं लावायला हवीत यासाठी लेसिनला हा प्रकल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. एक छोटी कृतीही मोठी गोष्टी घडवू शकते यावर विश्वास असणारा लेसिन फुटबाॅल खेळताना आपण जास्तीत जास्त गोल करावेत याकडे लक्ष ठेवून असतो. संघाला सामना जिंकवून द्यायचा हे तर त्याचं ध्येय असतंच सोबतच त्याला गोलाच्या अकारपटीत झाडंही लावायची असतात. आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावता यावीत याच जिद्दीने लेसिन फुटबाॅलचा  प्रत्येक सामना खेळतो. 

Image: newsweek.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact