
Image: rediff
लिसिप्रिया कंगजूम हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटलं ना? बरोबर अगदी लहान वयातच तिने पर्यावरणासाठी मुलांची चळवळ सुरु केली. मुळची मणिपूरची असलेली लिसिप्रियाची जगभरात ओळख झाली ती २०१९ मध्ये स्पेनमध्ये झालेल्या 'क्लायमेट चेंज काॅन्फरन्स२५' मुळे. या परिषदेत लिसिप्रिया पर्यावरण कार्यकर्ती म्हणून उपस्थित होती. तेव्हा ती फक्त ८ वर्षांची होती. पण तरीही या परिषदेला ती फक्त गेलीच नाही तर व्यासपिठावर उभं राहून समोरील जगभरातल्या नेत्यांना क्लायमेट चेंजबद्दल गांभिर्याने काम करण्यासाठी आवाहन केलं. जगभरातल्या नेत्यांना 'काम करा' असं आवाहन करणाऱ्या या एवढुशा मुलीचा काय अधिकार?असं म्हणून कोणीही लिसिप्रियावर टीका केली नाही. कारण लिसिप्रिया जे सांगत होती ते महत्वाचं होतं. ही लिसिप्रिया कंगजुम म्हणजे तीच मुलगी जिने २१ जून २०१९ रोजी भारतातल्या संसद भवनासमोर भारताने 'क्लायमेट चेंज लाॅ' (हवामान बदल कायदा) करावा यासाठी आठ दिवस आंदोलन केलं होतं. या लिसिप्रियाचं नाव पुन्हा चर्चेत आलं ते दुबई येथील 'क्लायमेट चेंज काॅन्फरन्स २८' (काॅप२८) मुळे.
या परिषदेला १२ वर्षांची लिसिप्रिया कंगजुम पर्यावरण कार्यकर्ता म्हणून उपस्थित होती. या परिषदेत हवामान बदलावर गंभीर चर्चा सुरु होती. तेव्हा लिसिप्रिया खुर्चीवरुन उठून व्यासपिठावर गेली. तिच्या हातात एक घोषणापत्र होतं. तिने व्यासपिठावर जावून छोटं भाषण केलं आणि हातातलं घोषणापत्र उंचावून 'एन्ड फोसाइल फ्युएल सेव्ह अवर प्लॅनेट ॲंड फ्युचर' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा सुरक्षारक्षक धावत आले आणि तिला घेवून बाहेर गेले.
हेही वाचा!
लिसिप्रियाने केलेली हिंमत, घोषणा देण्याची दाखवलेली हिंमत आणि तिने केलेलं छोटसं भाषण यामुळे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून या छोट्याशा मुलीच्या हिंमतीला दाद दिली. काॅप२८ या परिषदेत जीवाश्म इंधनाबाबत दिलेल्या घोषणेमुळे लिसिप्रियाला बाहेरचा रस्ता दाखवला गेला असला तरी काॅप२८ परिषदेचे महासंचालक राजदूत माजिद सुवेदी यांनी मात्र काॅप २८ परिषदेत तरुण लोकांनी दाखवलेल्या उत्साही पुढाकाराबाबत कौतुक केले. उपस्थित लोकांना लिसिप्रियाने दाखवलेल्या धाडसाबद्दल टाळ्या वाजवून तिचं कौतुक करण्याचं आवाहन केलं. पण तरीही लिसिप्रियाला भर परिषदेतून बाहेर काढून नंतर तिला सुरक्षारक्षकांनी अर्धा तास ताब्यात ठेवलं.

Image: independent
लिसिप्रिया काय म्हणते?

Image: telegraphindia
एका परिषदेत लिसिप्रियाचा आवाज दाबला गेला पण म्हणून लिसिप्रिया थांबणारी मुलगी नाही. हवामान बदलाच्या परिणामांपासून पृथ्वी वाचवण्यासाठी ती खंबीरपणे आवाज उठवत राहणार आहे. आपलं म्हणणं मांडतांना समोर कोणत्या देशाचा किती मोठा नेता उपस्थित आहे याची भीड लिसिप्रिया बाळगत नाही हेच काॅप28 च्या परिषदेत झालेली घटना दाखवून देते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact