जंगलाला आग लागली हे सांगणारं मशीन बनवणाऱ्या मुलीला भेटा!

Image: indianeagle

तोंडाला मास्क लावल्यानंतर काय होतं, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. कोविड १९ च्या संसर्ग काळात आपण बाहेर जाताना तोंडाला मास्क लावायचो तर किती गुदमरायचं आपल्याला. कधी एकदा घरी पोहोचतो आणि तोंडवरचं मास्क काढून टाकतो असं व्हायचं आपल्याला. निदान घरात तरी मास्क लावावं लागयचं नाही. कोरोना संसर्गाचा धोका नाही. तरीही घरात मास्क लावून बसावं लागलं तर काय होईल आपलं असा विचार केलाय का कधी? कोरोना नाही तर तोंडाला मास्क लावायचं कशाला आणि तेही घरात? असे प्रश्न वाचणाऱ्यांना लगेच पडतील. पण अशी परिस्थिती रेश्मा कोसाराजू या मुलीने अनुभवली आहे.

 हेही वाचा!

काही वर्षांपूर्वी रेश्मा शिकागो वरुन सॅन फ्रान्सिस्को येथे राहायला गेली. तेव्हा ती ११-१२ वर्षांची होती. त्याच वेळेस उत्तर कॅलिफोर्नियातील जंगलाला मोठी आग लागली. जंगलातून धुराचे लोट उठत होते. हा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरत होता. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेणं मुश्किल झालं होतं. खरं तर रेश्मा जिथे राहात होती तो भाग आग लागलेल्या जंगलापासून ३२१ कि.मी इतका दूर होता. पण तरीही वणव्यामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाचा त्रास सॅन फ्रान्सिस्को येथे राहाणाऱ्या लोकांनाही होत होता. त्यामुळे तेथील लोकांना घरातही तोंडाला मास्क लावावं लागत होतं. तेव्हा काही कोरोनाचा संसर्ग नव्हता. त्यामुळे तोंडाला मास्क लावून वावरणं ही सामान्य बाब नव्हती.

तोंडाला मास्क लावून फिरताना रेश्माच्या मनात विचार येत होते ते जळणाऱ्या जंगलाचे. जंगलातील झाडांचे, प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे. जंगलात लागणारी आग ही काही एका ठिकाणापुरती मर्यादित नव्हती. जंगलात पेटणारे वणवे ही संपूर्ण जगातली समस्या आहे. जंगलांना असे वणवे लागून जंगलाचे, झाडांचे, जंगलातील प्राणी पक्ष्यांचे किती नुकसान होत असेल, त्यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होत असेल याचा विचार छोट्युशा रेश्माला त्रास देत होता.

जंगलाला आग लागली की लोकांना कळवलं जायचं. पण जर जंगलाला आग लागण्याआधीच ही सूचना देण्याची व्यवस्था का नाही? असा प्रश्न रेश्माला पडायचा. अशी सूचना जर आधी मिळाली तर जंगलातील आग विझवणारे आधीच सावध होतील, आवश्यक त्या उपाययोजना करुन जंगलात लागणारी आग टाळू शकतील किंवा आगीमुळे होणारं नुकसान कमी होईल. यावर काय करता येईल हे मग रेश्मानेच शोधायला सुरुवात केली. त्यासाठी तिने आर्टिफिशिअल इंन्टेलिजन्सची मदत घेतली. त्यावर तिने ३ वर्षं काम केले. त्यातून ' डीप लर्निंग माॅडेल' हे साॅफ्टवेअर तयार केलं.

Image: edition.cnn.com

 हेही वाचा!

रेश्माचे डीप लर्निंग मॉडेल 

मातीचा कोरडेपणा, हवेतील आर्द्रता, वाऱ्याच वेग आणि तापमान या माहितीच्या आधारे रेश्माने डीप लर्निंग माॅडेल तयार केलं होतं. या माॅडेलच्या सहाय्याने जंगलात लागणाऱ्या आगी बाबतची शक्यता आधीच वर्तवली जाते. ९० टक्के खात्रीशीर माहिती रेश्माने तयार केलेल्या माॅडेलमधून मिळत होती. पण रेश्माला आपल्या माॅडेलने १०० टक्के अचूक माहिती सांगावी असं वाटत होतं. पण आपल्या माॅडेलमधील माहितीचं प्रमाण कमी असल्यानं जंगलातील वणव्यांच्या पूर्व सूचनेबाबत पूर्ण १०० टक्के खात्रीशीर माहीती मिळत नव्हती हेही रेश्माला कळत होतं. मग तिने जास्तीत जास्त डाटा मिळवायला सुरुवात केली. संपूर्ण अमेरिकेतील वातावरणाचा डाटा तिला मिळत असल्याने रेश्माचं डीप लर्निंग माॅडेल जंगलाना लागणाऱ्या आगीबद्दलची खात्रीशीर सूचना देवू शकतं. रेश्माने तयार केलेल्या या माॅडेलची चाचणी विविध पातळ्यांवर घेतली गेली. या चाचण्यांमधूनच रेश्माने तयार केलेल्या या माॅडेलची उपयुक्तताही लोकांना पटत गेली. रेश्माला साॅफ्टवेअर स्वरुपात असलेल्या आपल्या या माॅडेलचं रुपांतर ॲपमध्ये करायचं आहे. आपण तयार केलेलं हे माॅडेल केवळ अमेरिकेच्याच फायद्याचं नाही तर जगभरातल्या जंगलांसाठी फायदेशीर ठरावं असं रेश्माला वाटतं आहे. आपण तयार केलेल्या माॅडेलचं ॲप झाल्यास ते शक्य होईल याची रेश्माला खात्री वाटते. 

रेश्मानं डीप लर्निंग माॅडेल तयार केलं तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. एवढ्या लहान वयातही माणसाला सुरक्षित जगायचं असेल तर जंगलं वाचायला हवीत ही जाण रेश्मामध्ये निर्माण झाली. त्यातूनच रेश्मानं तयार केलेल्या माॅडेलमुळे ज्ंगलात लागणाऱ्या आगींची सूचना आधीच मिळून जंगल वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

रेश्माला तिच्या या कामाबद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमुळे पर्यावरणासाठी आणखी काम करण्याची प्रेरणा मिळल्याचं रेश्मा सांगते. रेश्माप्रमाणेच आपल्यालाही आपल्या आजूबाजूच्या परिसराबाबत प्रेम आणि काळजी वाटते का? आपण त्यासाठी काय करु शकतो? हे शोधायचं का आपलं आपणच!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact