
Image: phys.org
समुद्रातील कचरा काढण्याची दृश्य आपण अनेकवेळा टीव्हीवर बघितलेली असतात. या कचऱ्यात सर्वात जास्त काय सापडत असेल बरं? - तुमच्या मनातलं उत्तर प्लॅस्टिक असेल तर अगदी बरोबर आहे. समुद्रात टाकलेल्या, समुद्राने गिळलेल्या कचऱ्यात सर्वात जास्त कचरा प्लॅस्टिकचाच असतो. हे पाहून आपल्याला काय वाटतं? आपण काही करायला हवं, असं वाटतं का? समुद्रातला हा प्लॅस्टिकचा कचरा पाहून आपल्याला कितीही वाईट वाटत असलं तरी आपण तर लहान, आपण काय करु शकतो? असा विचार करुन आपण शांत बसतो.. बरोबर ना? तुम्हीही असंच करता ना? पण ॲना डूने मात्र शांत बसण्याचा, दुर्लक्ष करण्याचा पर्याय निवडला नाही.
ॲना १०-११ वर्षांचीच होती, जेव्हा तिची ओळख समुद्राच्या पोटातल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याशी झाली. समुद्राच्या पोटात जाणारं हे प्लॅस्टिक म्हणजे फक्त कचरा नसून मनुष्य, प्राणी, पर्यावरण या सर्वांसाठी ते घातक आहे. त्यातही सर्वात घातक म्हणजे न दिसणारे प्लॅस्टिक. मायक्रो प्लॅस्टिक. जगात सर्वत्र मायक्रो प्लॅस्टिकचा धोका आहे. पण ज्याप्रमाणे मायक्रो प्लॅस्टिक डोळ्यांना दिसत नाही तसा हा धोकाही जगाला दिसत नाही का? असा प्रश्न ११ वर्षांच्या ॲनाला पडला. आपण काय करु शकतो? असा प्रश्न जेव्हा ॲनाने स्वत:ला विचारला तेव्हा तिच्या मनानं उत्तर दिलं, 'प्रयत्न'. आणि तिने खरोखर समुद्राच्या पोटातील मायक्रो प्लॅस्टिक शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नातूनच तिने तयार केला एक रोबोट.
हेही वाचा!
ॲनाचा समुद्रातील मायक्रो प्लॅस्टिक शोधणारा रोबोट

Image: smithsonianmag
हेही वाचा!
मायक्रो प्लॅस्टिक ॲण्ड मी

Image: wildplanetfoods
समुद्रातील पर्यावरण धोक्यात आणणारा हा मायक्रो प्लॅस्टिकचा कचरा, त्याचे परिणाम, त्यासाठी आपण काय करु शकतो, या बाबी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कळायला हव्यात असं ॲनाला वाटलं. लोकांना माहिती असेल तरच त्याचं गांभीर्य कळेल हे ओळखून ॲनाने मायक्रो प्लॅस्टिक ॲण्ड मी नावाचं पुस्तकही लिहिलं. मुलांनी पर्यावरणाच्या विषयावर काम करायला हवं असं ॲनाला वाटतं. त्यासाठी ती मुलांना जास्तीत जास्त वाचन करण्याचं आव्हान करते. कारण वाचनातूनच आपल्याला माहित नसलेल्या अनेक गोष्टी कळतात. समुद्राचं पर्यावरण आणि मायक्रो प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा धोका याबाबत ॲनाने आधी वाचलं आणि तेव्हा तिला त्याचं गांभीर्य समजलं. म्हणूनच आपल्या अनुभवातून ती इतर मुलांना आपल्या आजूबाजूचे प्रश्न ओळखून ते सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा विचार करण्याचे, त्यासाठी स्वत: प्रयोग करुन पाहण्याचे आवाहन करते. वाचन, अभ्यास आणि प्रयोग यातून आपल्याला जे ज्ञान मिळतं ते आयुष्यभर टिकतं असं ॲनाला वाटतं.
ॲना आता १७ वर्षांची आहे. ती अजूनही आपला रोबोट अधिक अचूक आणि अद्यावत करण्यासाठी प्रयत्न करते आहे. मुळात प्लॅस्टिक, प्रदूषण आणि पर्यावरण हा विषय इतका मोठा आणि गंभीर आहे की हा प्रश्न सोडवण्यासाठी अशा अनेक ॲनांची गरज आहे. आपणही करायचा का ॲनासारखा प्रयत्न?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact