फुलपाखरांसाठी काम करणाऱ्या डंकनच्या बागेत आहेत ५००० फुलपाखरं!

Image: globalcitizen

रंगीबिरंगी फुलपाखरं पाहायला किती मजा येते ना. त्यांना पकडावं, हातात धरावं अशी खूप इच्छा होते ना. जगात असं कोणीच नसेल ज्यांना फुलपाखरं आवडत नसतील. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील वेस्टन येथे राहणाऱ्या डंकन जर्मन या मुलालाही लहानपणापासून फुलपाखरांचं खूप आकर्षण. त्याच्या घरातल्या बागेतल्या झाडावर दोन अळ्या त्याने पाहिल्या. या अळ्या कशा कोषात जातात, कोषातून फुलपाखरु कसं बाहेर पडतं याचं निरिक्षण केल्यावर त्याला फुलपाखरं फारच आवडायला लागली. तेव्हा तो फक्त ५ वर्षांचा होता. तो जसजसा मोठा होत होता तसं हे फुलपाखरांचं आकर्षण खूपच वाढलं. मग त्याला नुसती फुलपाखरं पाहायलाच नाही तर फुलपाखरांबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायला आवडू लागलं. तो जिथून मिळेल तिथून फुलपाखरांची माहिती जमवायचा.

जसजसं त्याला फुलपाखरांबद्दल समजत गेलं तशी त्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली, ती म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या फुलपाखरांचं आयुष्य हे धोक्यात आहे. फक्त आपल्याच शहरात नाही तर जगभरात फुलपाखरांना धोका निर्माण झाला असून त्यांची संख्या वेगाने घटते आहे. किटकांची (अळ्यांची) संख्या घटते आहे. फुलपाखरांबद्दल वाचत असताना, माहिती मिळवताना त्याला या सुंदर सुंदर फुलपाखरांचं पर्यावरणातलं महत्त्वही समजलं होतं. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, पर्यावरणातली जैवविविधता टिकवण्यासाठी फुलपाखरांची संख्या वाढणं आवश्यक असल्याचं डंकनला लक्षात आलं. मग त्याने आपल्या या आवडत्या फुलपाखरांसाठी काम करायचं ठरवलं. तेव्हा डंकन केवळ ४ थ्या ग्रेडमध्ये शिकत होता.

 हेही वाचा!

फुलपाखरांबद्दल डंकनने जमवलेली माहिती खूप महत्त्वाची होती. ती फारशी कोणाला माहित असण्याची शक्यताच नव्हती. फुलपाखरांबद्दलची आपण जमवलेली माहिती इतरांना समजावी, इतर लोकांनाही फुलपाखरांचं महत्त्व समजावं असं डंकनला वाटू लागलं. म्हणून त्याने खास फुलपाखरांची माहिती देणारी वेबसाइट सुरु केली. या वेबसाइटवरुन डंकन फुलपाखरांची माहिती सांगण्याबरोबरच आपण फुलपाखरांची संख्या वाढावी म्हणून काय करायला हवं हे ही सांगू लागला. फुलपाखरांबद्दल डंकन खोलात जावून अभ्यास करत होता. त्यामुळे कोणती झाडं लावली, कोणती फुलं फुलली की फुलपाखरु त्या झाडांकडे येतात याबद्दलची अभ्यासपूर्ण माहिती त्याने जमवली होती. 

डंकन केवळ माहिती जमवत नव्हता तर त्या माहितीचा उपयोग करुन प्रयोगही करत होता. आधी त्याने आपल्या घरातल्या बागेत फुलपाखरांना आवडणारी झाडं लावली. स्वत:च्या बागेतच त्याने आधी फुलपाखरांची बाग तयार केली. आपल्या या प्रयत्नाने फुलपाखरांची संख्या वाढेल. पण जगभरात घटत चाललेल्या फुलपाखरांची संख्या बघता हे प्रमाण फारच कमी असेल. आपल्यासारखे प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे याची जाणीव झाल्यावर डंकन फुलपाखरांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करु लागला. फुलपाखरांना आवडणारी झाडं लोकांनी लावावीत, फुलपाखरांची बाग करावी यासाठी त्यांना प्रेरणा देवू लागला. त्यासाठी डंकन याने 'ब्रिंग बटरफ्लाइज बॅक' नावाची चळवळच सुरु केली. तो शाळेत आपल्या वर्गातल्या मुलांना, इतर वर्गातल्या मुलांना फुलपाखरांना आवडणाऱ्या झाडांच्या बिया देवू लागला. डंकनने सूर्यफूल, सागवान, काॅनफ्लाॅवर, अशा विशिष्ट झाडाच्या बिया जमवल्या होत्या. या बिया तो शाळेतल्या मुलांना, शिक्षकांना द्यायचा. एक छोट्या कुंडीत नाहीतर भांड्यात या बिया पेरायला सांगायचा.

Image: globalcitizen

Image: globalcitizen

संपूर्ण फ्लोरिडामधे फुलपाखरांची बाग तयार व्हावी हे डंकनचं ध्येय आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. पण हे ध्येय साध्य करण्यासाठी त्याला जास्तीत जास्त लोकांची मदत लागणार आहे. म्हणून डंकन आता फ्लोरिडा राज्यात विविध ठिकाणी प्रवास करुन लोकांना फुलपाखरांबद्दल माहिती देत आहे. फुलपाखरांचे अधिवास घटत चालल्याने, हवामान बदलामुळे, शेतीत जास्तीत जास्त रासायनिक खतं आणि किटकनाशकं वापरल्याने फुलपाखरांची संख्या कशी कमी होतेये, पर्यावरणाचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी, निसर्गातील जैवविविधता टिकावी यासाठी फुलपाखरं किती महत्त्वाची आहे, आपण आपल्या बागेत फुलपाखरांसाठी कशी जागा निर्माण करु शकतो, त्याद्वारे फुलपाखरांची संख्या कशी वाढवू शकतो याची सविस्तर माहिती डंकन मोठ्या माणसांन, लहान मुलांना देतो. त्याचा परिणाम म्हणजे फ्लोरिडातील विविध शहरातल्या शाळांनी शाळेत फुलपाखरांची बाग तयार केली आहे. डंकनच्या पुढाकारातून वेस्टन येथील त्याच्या शाळेतही फुलपाखरांची बाग तयार झाली आहे. या बागेत फुलपाखरांच्या ५० प्रजाती आढळतात. डंकनने घरी तयार केलेल्या बागेतून २०२० पर्यंत ५००० फुलपाखरं सोडली होती.

 हेही वाचा!

अन्न साखळीत फुलपाखरं अगदी खाली आहेत. पण त्यांच्यामुळे स्थानिक पक्षी, सरडे, बेडूक यांच्या विविध प्रजाती निर्मांण होण्यास फुलपाखरंच मदत करत आहेत. आपल्या पर्यावरणाचं आरोग्य सुदृढ आहे की नाही हे फुलपाखरांच्या संख्येवरुन सहज लक्षात येतं. ही फुलपाखरं हळूहळू अशीच कमी कमी होत राहिली तर निसर्गातल्या इतर गोष्टीही हळूहळू नष्ट होवू लागतील. मानवाचं, प्राणी-पक्ष्यांचं आयुष्य धोक्यात येईल. हे होवू नये म्हणून डंकन 'ब्रिंग बटरफ्लाइज बॅक' नावाची चळवळ जोमात चालवत आहे. त्याला त्याच्या या कामासाठी 'नाॅनप्राॅफिट ॲक्शन फाॅर फ्युचर' कडून ' इको हिरो अवाॅर्ड' हे बक्षिस मिळालं आहे.

Image: globalcitizen

आपण आपल्या घरीही डंकनने सांगितल्यासारखी फुलपाखरांची बाग तयार करु शकतो. विविध प्रजातींच्या फुलपाखरांना आपल्या घरातल्या अंगणात बागडायला बोलावू शकतो. तुम्ही आपल्या आवडत्या फुलपाखरांसाठी काय करणार आहे, हे मलाही नक्की सांगा. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact