शिस्त म्हणजे शिस्त! सिंगापूर जगातलं सर्वात कडक शिस्तीचं शहर!

Image: freepik

शिस्त कोणाला आवडते? शिस्तीत बसा, शिस्तीत राहा, शिस्तीत अभ्यास करा, शिस्तीत खेळा.. असं कोणी म्हटलं की आपले हात-पाय-तोंड कोणीतरी गच्च बांधून ठेवल्यासारखंच वाटतं. जास्तच शिस्त शिस्त झालं की आपल्याला घर असो की शाळा, शिक्षक असू देत किंवा आई -बाबा त्यांचा कंटाळा येवू लागतो.  आपण तक्रारी करु लागतो. पण शिस्तीबद्दल आपल्या कितीही तक्रारी असल्या तरी शिस्तीतही एक गंमत आहे. शिस्त मोडली की शिक्षा होते आणि ती जर मनापासून पाळली तर त्याचे चांगले फायदेही होतात. शिस्तीमुळे कामं चांगली होतात, वेळेत होतात. त्यामुळे मोठी माणसं शिस्तीचा आग्रह धरतात. कठोर नको पण थोडी शिस्त हवीच. सगळंच बेशिस्त असेल, कशालाच शिस्त नसेल तर काय होईल आपलं? असा विचार केलाय का कधी? तुम्ही म्हणाल ही काय आज शिस्त शिस्त लावलीये आणि तीही रविवारी . ज्या दिवशी रोजची शिस्त नाही पाळली तरी चालते.  तर मग कशाला रविवारी या शिस्तीच्या गप्पा? नुसतं शिस्तीवर बोललं तरी वैताग आला ना, पण जिथे पावलो पावली कडक शिस्त, ती मोडली तर पैशांचा दंड आणि तुरुंगवासही. तिथे काय होत असेल माणसांचं? मी सिंगापूरबद्दल बोलतेय. सिंगापूर हे जगातलं सर्वात शिस्तीचं शहर आहे. इथले शिस्तीचे नियम ऐकाल तर म्हणाल किती ही शिस्त!

हेही वाचा! 

सिंगापूरची शिस्त काय सांगते?

सिंगापूर म्हणजे आग्नेय आशियातलं शहर. हे शहर आहे आणि राज्यही. प्रजासत्ताक असलेल्या सिंगापूर या शहराची ओळख आज जगभरात आहे. शिस्त पाळणाऱ्या लोकांमुळेच हे शहर स्वच्छ, नीटनेटकं , सुंदर आणि प्रगत आहे की ते पाहायला जगभरातून लोक येतात.

सिंगापूरमध्ये रस्त्यावर साधा चाॅकलेटचा कागद टाकला तरी चालत नाही. रस्त्यावर कचरा टाकण्याला, थुंकण्याला येथे सक्त मनाई आहे. कचरा करणं , थुंकणं हा मोठा गुन्हा समजला जातो इथे. त्यावर दंड आकारला जातो आणि तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावली जाते. रस्त्यावर कचरा केला, थुंकल तर त्या व्यक्तीला ५०० ते १००० सिंगापूर डाॅलर्सपर्यंत दंड ठोठावला जातो. रस्त्यावर थुंकताना कोणी दिसलं की त्या थुंकणाऱ्या व्यक्तीकडून रस्ता धुवून घेतला जातोच शिवाय तीन महिन्यांसाठी तुरुंगातही पाठवलं जातं.

रस्त्यावर चालताना जेवढी शिस्त वाहन चालकंनी पाळायची तितकीच शिस्त चालणाऱ्यांनीही पाळायची हा इथला नियम. रस्ता ओलांडताना नियम पाळले नाही, रस्त्यावर कसंही चाललं तर तो गुन्हा समजला जातो. रस्त्यावर बेशिस्तीने चाललं तर त्या व्यक्तीस १००० सिंगापूर डाॅलर इतका आर्थिक दंड आणि ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होवू शकते.

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान ही बाब गांभीर्यानं घेतली जाते. त्यासाठीची शिक्षाही मोठी आहे. असं काही नुकसान झाल्यास २००० सिंगापूर डाॅलर्सचा दंड आणि ३ वर्षांची शिक्षा होवू शकते. तसेच सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर चित्रं काढणे, भित्तीचित्रं काढणं, संदेश लिहिणं, पोस्टर लावणं हा गुन्हा समजला जातो.

च्युइंगमवर कडक बंदी आहे. इथे च्युइंग विकूही दिलं जात नाही. सिंगापूरचे रस्ते खराब होण्यास च्युइंगम कारणीभूत ठरलं हे लक्षात आल्यानंतर १९९० मध्ये च्युइंगम खाणं हा गुन्हा ठरवला गेला. च्युइंगम खाऊन ते रस्त्यावर फेकल्यामुळे खराब झालेले रस्ते स्वच्छ करण्यास सरक‌ारला बरेच पैसेखर्च करावे लागले. आर्थिक नुकसान करणारे हे च्युइंगम नकोच विकायला आणि खायला म्हणून सिंगापूरच्या सरकारने च्युइंगमबंदी अंमलात आणली.

Image: straitstimes

रस्त्यावर विनापरवानगी गाण्याचा कार्यक्रम घेणं हे सिंगापूरच्या शिस्तीत बसत नाही. यामुळे गोंधळ निर्माण होतो. लोकांना त्रास होतो. कोणी गाणं गातना, वाद्य वाजवताना दिसल्यास शांतता भंग केली, इतर लोकांना त्रास झाला या आरोपांखाली गाणं गाणाऱ्या / वाद्य वाजवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो आणि त्या व्यक्तीस शिक्षाही दिली जाते. आर्थिक दंड आणि तुरुंगवास अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षा व्यक्तीस दिल्या जातात.

मोठ्याने बोलणे, मोठ्या आवाजात सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारणं , ओरडून बोलणे यावर निर्बंध आहेत.  मोठ्याने बोलण्याने शांतपणे जगण्याला अडथळा निर्माण होतो आणि पर्यावरणास त्रासही होतो.

सिंगापूरमध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वर्णाचे लोक राहतात. या सर्व लोकांमध्ये कोणताही भेद नसल्यास ही माणसं मिळून मिसळून राहतील आणि त्यामुळे आपल्या शहराची प्रगती होईल या उद्देशाने सिंगापूरमध्ये वर्णभेद आणि धर्मभेद करण्याला विरोध आहे. त्यासाठीची शिक्षेची तरतूदही आहे.

कितीही आनंदाचा क्षण असला, सण-सोहळा-उत्सव असला तरी फटाके फोडायचे नाही असा नियम सिंगापूरने केला आहे. १९७२ पासून फटाकेविरोधी कायदा अस्तित्त्वात आला. उंच इमारती, झाडं, वनस्पती यांचं काही नुकसान होवू नये , सिंगापूरमध्ये माणसांची घनता जास्त आहे. छोट्या जागेत जास्त माणसं राहतात. अशा परिस्थितीत फटाके फोडल्यास लोकांमध्ये गोंधळ उडू शकतो, लोकं जखमी होवू शकतात. हा धोका निर्माण होवू नये म्हणून सिंगापूरमध्ये फटाके उडवण्यावर बंदी आहे.

हेही वाचा! 

Image: brushtec.com

सिंगापूरमध्ये पतंग उडवायलाही बंदी आहे. पतंगीमुळे गाडी चालवणाऱ्याचं लक्ष विचलीत होतं, शिवाय पतंगीमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता बघता यावरही येथील सरकारने बंदी घातली आहे.

सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर लघवी करणे, सार्वजनिक स्वच्छता गृहात पाणी नीट न टाकणे, स्वच्छता न पाळणे हा गुन्हा समजला जातो. हा गुन्हा करणाऱ्यास १००० सिंगापूर डाॅलर्सचा दंड ठोठावला जातो.

डुरियन नावाचं सिंगापूरचं प्रसिध्द फळ आहे. हे फळ अतिशय उग्र वासाचं आहे. म्हणूनच सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना तेथे डुरियन हे फळ खाण्यास बंदी आहे. हे फळ घरी खावे किंवा रेस्टाॅरण्टमध्येच खावे असा या फळासंबंधीचाही नियम सिंगापूरमध्ये आहे.

कबुतरांमुळे शहराची स्वच्छता राखली जात नाही. कबुतरं शिटल्याने इमारती, गाड्या घाण होतात. त्यामुळे कबुतरांना खाऊ घालणे हा येथे गुन्हा समजला जातो. कबुतरांना खायला देताना दिसल्यास ५०० सिंगापूर डाॅलर्सचा दंड होतो.

इतरांचं वायफाय वापरणं हा येथे गुन्हा समजला जातो. हॅकिंग, हॅकर्सचा धोका असल्याने इतरांचं वायफाय वापरण्याला मनाई आहे.  खूपच अडचण असली, काही तातडीची बाब असल्यास संबधित व्यक्ती/ ऑफिस/ हाॅटेल यांची परवानगी घेवून त्यांचं वायफाय वापरावं असा नियम आहे.

सिंगापूरमध्ये एवढी शिस्त का?

सिंगापूरने १९६५ मध्ये मलेशियाकडून स्वातंत्र्य मिळवलं. तेव्हा सिंगापूर हा देश/ राज्य/ शहर खूपच गरीब होतं, अविकसित होतं. येथे गुन्ह्य्यांचं प्रमाणही खूप होतं. ली कुआन यू यांनी शासन कारभार हातात घेतल्यानंतर शिस्तीला महत्व द्यायला सुरुवात केली. सिंगापूरचा विकास करायचा असल्यास शिस्त हवी. या शहराला नैसर्गिक देणं काहीच नाही. त्यामुळे येथील माणसांनाच हे शहर उभं करावं लागणार आहे. शिस्त असली तरच माणसे काम करु शकतील, शहराचा विकास करु शकतील असा विचार करुन प्रत्येक बाबतीतली शिस्त ठरवली गेली . सिंगापूरमधील नागरिकांनीही शासनाने घालून दिलेली शिस्त काटेकोर पाळली. आज सिंगापूर जगातलं स्वच्छ आणि सुंदर शहर आहे, येथील सामाजिक नियमांच पालन होतं, मोठे मोठे व्यवसाय या शहरात आहे, त्याचं सारं श्रेय शिस्तीला दिलं जातं.

Image: goabroad

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact