उन्हात काळ्या रंगाच्या गोष्टींचा सणसणीत चटका का बसतो?

 Image : classroomclipart

मिनीला दुपारी आइस्क्रीम खाण्याची हुक्की आली. घरी जेवणासाठी आलेल्या बाबांकडे तिने तसा हट्टच धरला. आता तो मिनीचा गोड हट्ट. बाबा नाही कसे म्हणणार? ऑफिसमध्ये जाण्याच्या आधी आणून देतोना असं बाबा मिनीला म्हणालेत. पण मिनीला बाबांसोबत जावून आवडेल ते आइस्क्रीम निवडायचं होतं. बाहेर ऊन इतकं तापलेलं. त्यात मिनीने काळ्या रंगाचा फ्राॅक घातलेला. वडिलांनी मिनीला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ऐकेल ती मिनी कसली? असा कुठे काळ्या रंगाचा चटका बसतो का? असा उलटा प्रश्न तिने बाबांनाच विचारला. पण बाबांना होती ऑफिसात जाण्याची घाई. त्यांनी मिनीला सोबत घेतले आणि निघाले. पार्किंगच्या बाहेर लावलेली गाडी उन्हातच उभी होती. मिनी आनंदाने गाडीवर जावून बसली तर तिला जोराचा चटका लागला. 

आइस्क्रीम पार्लरला पोहोचेपर्यंत मिनीला खूपच चटके बसू लागले. एकदाचं हवं ते आइस्क्रीम निवडलं आणि मिनीला बाबा घरी सोडून जायला निघणार तोच, मिनी बाबांना म्हणाली, 'खरंच की हो बाबा, काळ्या रंगाचा किती चटका लागतो. आज मला लागला. मिनीचं बोलणं ऐकून बाबांना हसू आलं, ते तिला बाय म्हणून निघून गेले.

पण प्रश्नखोर चिंगीला प्रश्न पडलाच की उन्हात काळ्या गोष्टींचा चटका का बसतो? बाबांनी पांढरा शर्ट घातलेला, त्यामुळे बाबांच्या तोंडून उन्हाचा चटका लागला असं काही ऐकू आलं नाही. खरंतर मिनीसारखा हा प्रश्न अनेकांना पडतो.

हेही वाचा!

काय कारण असेल बरं?

कुठल्याही वस्तूवर प्रकाशाचे किरण पडले की त्याचे तीन परिणाम घडतात.  प्रकाशाच्या ऊर्जेचा काही भाग परावर्तित होतो, काही भाग पदार्थातून आरपार जातो आणि ऊर्जेचा काही भाग पदार्थामध्ये शोषला जातो.

चकचकीत पृष्ठभाग असलेल्या पदार्थावरून प्रकाशाच्या ऊर्जेचा खूप मोठा भाग परावर्तित होतो. तर पारदर्शक पदार्थामधून बहुतांश ऊर्जा आरपार निघून जाते; पण काळ्या रंगाचा पृष्ठभाग असलेल्या पदार्थावर पडलेल्या प्रकाशाची ऊर्जा तात्काळ शोषून घेतली जाते.  त्यातुलनेत परावर्तित होणारी ऊर्जा मात्र फारच कमी असते. 

काळ्या वस्तूवर प्रकाश पडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा शोषून घेतली गेल्यावर त्या वस्तूचं तपमान वाढतं. काळ्या रंगाचा पदार्थ जसा सगळ्यात जास्त प्रमाणात ऊर्जेचं शोषण करतो. तसंच जर का तो तापला तर सर्वात जास्त प्रमाणात ऊर्जा उत्सर्जितपण करतो . याच कारणामुळे तापलेल्या स्कूटरच्या काळ्या सीटवर बसण्याचा आपण प्रयत्न केला तर ती काळी सीट तापून त्यामधून झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे आपल्याला खूप जोरात चटका बसतो. किंवा काळे कपडे घालून उन्हाळ्यात बाहेर पडलं तर अंगाला जास्त चटके बसतात. 

Image : classroomclipart

अभ्यास सांगतो..

एका अभ्यासात हे सिध्द झालं आहे की, पांढऱ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यात वापरले तर शरीर थंड राहातं. या प्रयोगात त्यांनी एका पुतळ्याला पांढरे कपडे घातले आणि एका पुतळ्याला काळे कपडे. दोन्ही पुतळे थोडा वेळ उन्हात ठेवले. तेव्हा वातावरणातली उष्णता 30 डिग्री सेल्सिअस होती. थोड्यावेळानं पांढऱ्या रंगाच्या कपड्याचे तापमान मोजले असता ते 30 डिग्री सेल्सिअस भरले, तर काळ्या कपड्याचे तापमान 50 डिग्री सेल्सिअस भरले. कारण काळ्या रंगाच्या कपड्याने सर्व 

उष्णता शोषली आणि ती ऊर्जेच्या रुपात बाहेर टाकली. उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे टाळून पांढरा, पिवळा, राखाडी, लाल रंगाचे कपडे वापरावेत असं तज्ज्ञ सांगतात. कारण हे रंग 'कूल कलर' म्हणून ओळखले जातात. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact