
मटार सोलतांना…फ्लॉवरचे तुरे मोडतांना… वालाच्या शेंगा निवडतांना… अचानक जोरात “ईईईईईई” असा आवाज आला की समजतं की तिथे कुठल्या व्हिलनने एंट्री मारली आहे.
किंवा आपण प्रेमाने लावलेल्या बागेतल्या झाडांची पानं रात्रीतून कातरल्यासारखी दिसायला लागल्यावर…
काही वेळा रात्रीतून लिलीचं रोप पूर्ण नाहीसं झाल्यावर सात्विक संतापाने “काय करावं यांचं…” अशी प्रतिक्रिया ऐकू येते त्यावेळी…
घरातल्या सगळ्यांना समजलेलं असतं की नुकसान कोणी केलेलं आहे… या दोन्ही वेळची व्हिलन जरी वेगवेगळ्या प्रकारची असली तरी मुळात एकाच प्रकारची असते, ती म्हणजे… अळी!
बहुतेक वेळा अत्यंत लिबलिबीत दिसणारी, मधेच पाठ उंच करून सरकत सरकत पुढे जाणारी अळी!
हे वाचा!
आपण झोपतो तेव्हा शरीरात काय काय घडतं?

घाणेरडी दिसणारी अळी असं मुद्दामच म्हटलं नाही, कारण काही वेळा लिलीसारख्या रोपांवर येणाऱ्या अळ्या दिसायला अतिशय सुंदर असतात. त्यांचे रंग भडक आणि आकर्षक असतात. आणि त्याचवेळी मॅटरमध्ये राहणाऱ्या अळ्या… हिरव्या आणि लिबलिबीत! काही अळ्या तुळतुळीत अंगाच्या तर काही केसाळ. पण या सगळ्या अळ्यांमध्ये एक गोष्ट समान असते, ती कुठली?
हे वाचा!
वाढदिवसाला केक का कापतात? आहे तुमच्याकडे या सोप्या प्रश्नाचं उत्तर?
तर यापैकी कुठल्याच अळीला दोन डोळे नसतात. कोणाला सहा, कोणाला आठ, तर काहींना बारा किंवा चौदा डोळेसुद्धा असतात. प्रत्येक जातीच्या अळीला किती डोळे असतात ते ठरलेलं असतं. त्याप्रमाणे एका बाजूला तीन ते सात असे एकूण सहा ते चौदा अळीला असू शकतात. हे सगळे डोळे तिच्या डोक्यावरच असतात.
अळी कोषात जाऊन नंतर तिचं रूपांतर एखाद्या कीटकात किंवा फुलपाखरात होतं. त्यावेळी हे अनेक डोळे एकत्र होऊन दोन्ही बाजूला एक एक असे दोन संयुक्त डोळे तयार होतात. त्यामुळे अळीला जरी १४ डोळे असले तरी फुलपाखराला मात्र दोनच डोळे असतात.


