भक्ती चपळगावकर

Image: charliechaplin
मुलांनो, तुम्ही जन्माला आल्यापासून मोबाइल, आयपॅड, लॅपटॉप बघत आलात. पण तुमच्या आईबाबांच्या वेळी हे सगळं आजुबाजूला उपलब्ध नव्हतं. त्यांच्या आईबाबांच्या वेळी तर अजिबातच नाही. एकूण काय तर आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काळ फार वेगात बदलतो आहे. या आधुनिकीकरणाची सुरूवात औद्योगिक क्रांतीमुळे (इंडस्ट्रियल रेव्होलुशन) झाली. मशीन माणसाचं काम वेगात करते हे लक्षात आल्यावर अनेक शोध लागले आणि वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती वाढली. याच आधुनिक बदलांवर आधारित चार्ली चॅप्लिन या महान कलाकाराचा 'मॉडर्न टाइम्स' हा चित्रपट.
हा चित्रपट अनेक कारणांसाठी बघायला हवा. हा चित्रपट बनला १९३६ साली. त्या आधी चॅप्लिनने जगात फेरफटका मारून समाजात होणारे बदल टिपले. महात्मा गांधी आणि चॅप्लिनची या दरम्यान भेट झाली. गांधीजी सरसकट आधुनिकीकरणाला का विरोध करतात हे त्याला कळले नाही पण त्यांच्याबरोबर झालेल्या संवादाने त्याने माणूस आणि यंत्रातल्या संघर्षाकडे वेगळ्या नजरेने बघायला सुरूवात केली.
हेही वाचा!
काय आहे सिनेमाची गोष्ट ?
मॉडर्न टाइम्सची कथा अगदी साधी आहे. आपल्या सिनेमात चार्ली भटक्याची (ट्रॅम्प) भूमिका साकारतो. हा भणंग यावेळी एका कारखान्यात काम करत असतो. तिथला फॅक्ट्री मालक माणसांकडून यंत्रासारखे काम करुन घेण्याचा प्रयत्न करत असतो. मालकाचे ते प्रयत्न चार्लीच्या अचाट आणि अशक्य विनोद निर्मिती करणाऱ्या शारीरिक हालचालीतून पोट धरून हसायला लावतात. यात कामगारांचे काम थांबू नये म्हणून काम करत असताना मशीनच्या सहाय्याने कामगारांना खाऊ घालण्यासाठी एका मशीनचा प्रयोग करण्यात येतो आणि बकरा म्हणून अर्थात आपल्या भटक्याची निवड होते. एका जागी स्वस्थ बसण्याची सवय नसलेला भटक्या मशीनमध्ये आखडून बसतो आणि मशीन अर्थातच त्याचे जे हाल करते ते सिनेमातच बघा.

Image: deepfocusreview

Image: deepfocusreview
पुढे या भटक्याला एलेन भेटते. ही अनाथ मुलगी जगण्यासाठी संघर्ष करत असते. आता ते दोघे मिळून दोन वेळच्या खाण्यासाठी संघर्ष करु लागतात. आपल्या कारवायांमुळे हा भटक्या सारख्या जेलच्या वाऱ्या करत असतो. माणूस आणि मशीनमधला संघर्ष टोकाला पोचलेला असतानाच मंदीची लाट येते आणि सगळे कामगार रस्त्यावर येतात. भटक्या आणि एलेन या संघर्षात विजयी होतात का? याचे उत्तर तुम्हाला या सिनेमातच मिळेल. पण लहान मोठ्या सगळ्यांना हा अजरामर सिनेमा पोट धरून हसायला लावेल हे नक्की. हा चित्रपट 'मुबी' या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
(पालकांसाठी सूचना - या चित्रपटात अनेक छुपे संदेश आहेत. ते मोठ्या मुलांना शोधायला प्रोत्साहन द्या. उदाहरणार्थ - मशीन माणसाचे काम करु लागल्यावर काय बदल झाले? गरीब नेहमी पोलिसांच्या ताब्यात आणि पोलीस श्रीमंतांचं ऐकतात, असे सीन्स दिसतात, ते खरे आहे का? लहान मुलांना चार्लीच्या लीला अवश्य बघू द्या.)
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
bhalwankarb@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact