भविष्यात माणूस कसा वागेल? हे आताच कसं कळेल आपल्याला?

-भक्ती चपळगावकर

image : imdb

माणसाला पृथ्वीची सीमा ओलांडून या ब्रम्हांडाची सफर करण्याची ओढ नेहमीच आहे. विज्ञानकथालेखकांच्या लिखाणात माणसाची ही अनिवार इच्छा प्रकट झाली आहे. कित्येकदा विज्ञान कथा लेखकांनी आपल्या गोष्टीतून जे भविष्य वर्तवले ते भविष्यात खरेखुरे झाले आहे. मग ती वैज्ञानिक उपकरणे असोत की वाहने.

जीन रॉडेनबेरी नावाच्या अवलियाने बनवलेली स्टार ट्रेक ही मालिका अशीच अनेक अर्थी विज्ञानप्रेमींना गारूड घालते. ही मालिका जर आई वडलांच्या देखरेखीखाली बघितली तर तुम्हाला नक्कीच ग्रहताऱ्यांच्या अद्भुत सफरीला घेऊन जाईल. १९६६ साली ही मालिका सर्वात प्रथम अमेरिकन टिव्हीवर झळकली. त्या मालिकेचे तीन सीझन्स आले ही स्टार ट्रेक ओरिजनल सिरीज. ही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, पण त्याचबरोबर स्टार ट्रेकच्या पुढच्या भागातल्या अनेक मालिका आणि चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत. 

 

हेही वाचा!

मशीन आणि माणूस यांच्यातल्या संघर्षात कोण जिंकेल?

मूळ मालिकेतला कॅप्टन कर्क, त्याचा विश्वासू साथीदार आणि वल्कन ग्रहावरून आलेला कमांडर स्पॉक, डॉक्टर स्कॉट वगैरे मंडळी मानवाच्या या ब्रम्हांड सफरीवर युएसएसएस एंटरप्राईझ या भव्य यानातून निघतात. 'सितारों के आगे जहां और भी है' म्हणत हे लोक एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर सफर करतात. या मालिकेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे माणसाला समाजातल्या ज्या गोष्टींनी मागे खेचले, माणसांमाणसांमध्ये दरी निर्माण केली त्या गोष्टींवर सुद्धा ही मालिका भाष्य करते. त्यामुळे ती फक्त विज्ञान मालिका न राहता मानवतेचे महत्व अधोरेखीत करते. एक उदाहरण द्यायचे झालेच तर या मालिकेत एक कॅरेक्टर म्हणजे लेफ्टनंट अहुरा. ही भूमिका निशेल निकोल्स नावाच्या कृष्णवर्णीय अभिनेत्रीने केली. तिला ही मालिका सोडायची होती, पण अमेरिकन गांधी या नावाने ओळखल्या जाणा-या मार्टिन ल्युथर किंगने तिला रोखले. याला कारण असे होते की कृष्णवर्णीयांना अतिशय हीन वागणूक देणाऱ्या अमेरिकन समाजात पहिल्यांदाच एका कृष्णवर्णीय व्यक्तीला टिव्हीवर महत्वाची भूमिका मिळाली होती. त्याचबरोबर चिनी, जपानी, रशियन कॅरेक्टर्स पण जीनने तयार केली. भविष्यातला मानवी समाज कसा असेल याची ती झलक होती. आज जग इतके एकत्र आले आहे की प्रत्येक वंशाची व्यक्ती हवे ते काम करु शकते त्यामुळे त्याचा समज खरा होता असेच म्हणावे लागेल. 

(पालकांसाठी सूचना - नेटफ्लिक्सवर प्रत्येक मालिकेच्या कथेचा गोषवारा दिलेला असतो. तुम्ही ती कथा वाचून घेतली तर अधिक उत्तम. भारतीय आणि अमेरिकन समाजातल्या सांस्कृतिक फरकामुळे काही भाग तुम्हाला मुलांसाठी अयोग्य वाटू शकेल)

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

bhalwankarb@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact