वाढदिवसाला गिफ्ट तर मिळालं,पण लगेच गायबही झालं! ते कसं?

image : google

- शिल्पा दातार

वाढदिवस असेल तर तुम्हाला छान वाटतं ना! तसंच  निनादला झालंय. त्याचा वाढदिवस आहे. तो आता दहा वर्षांचा झालाय. निनादच्या घरात त्याचे बाबा छोट्या हॉलमध्ये पताका, झिरमिळ्या, फुगे लावत आहेत. आई स्वयंपाकघरात निनादच्या आवडीचे खाण्याचे पदार्थ करते आहे. तुमच्या घरीही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी असंच छान आनंदाचं वातावरण असतं ना? आई-बाबा, मित्र-मैत्रिणी येतात, केक कापला जातो, मग आई सगळ्यांना केक आणि खाऊ देते. तो सगळे मिळून खातात. दंगा मस्ती करतात. खूपच छान दिवस असतो तो. तसंच काहीसं वातावरण निनादच्या घरीही आहे.

निनादचे बाबा म्हणतात, ‘‘लवकर आवर निनाद, पटकन बाहेर ये. संध्याकाळी बर्थडे पार्टी आहे ना, त्याची तयारी करायचीय.’’

 

हेही वाचा!

गोष्ट पायातून निसटलेल्या बुटाची आणि स्लिपर तुटलेल्या मुलाची

तेवढ्यात निनादची ताई बाहेरून येते आणि आई-बाबांना विचारते, ‘‘निनाद कुठाय?’’

‘‘तो आवरतोय. निनादचं गिफ्ट आणलं आहेस ना?’’

ताई हो म्हणते.

सगळे हाका मारतात, निनाद... निनाद!

निनाद खोलीतून बाहेर येतो आणि ताईला विचारतो, ‘‘माझं गिफ्ट कुठाय?’’

ताई त्याच्या हाताला धरते आणि त्याला घराच्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. दार उघडल्यावर पाहतो तर काय! त्याच्या ताईनं त्याला वाढदिवसाचं छान सरप्राईज दिलेलं असतं.

काय असेल बरं ते सरप्राईज गिफ्ट! ती असते, सायकल! निनादची पहिली सायकल. छान छान निळ्या रंगाची नवी कोरी सायकल. ती सायकल पाहून निनादला फारच आनंद होतो. निनादच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याचे आई-बाबा आणि ताईसुद्धा खुश होते. निनादला गिफ्ट आवडलं तर! नवीन सायकलीला सगळे हार घालतात, ओवाळतात.

आता माझ्याकडे पण सायकल आहे, निनाद मनात म्हणतो. कारण निनादच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींकडे सायकल असते. आपल्या नवीन सायकलीवरून प्रेमानं हात फिरवत असतानाच निनादचे मित्र-मैत्रिणी सायकलवरून येतात. सायकलीकडं पाहून विचारतात,

‘‘नवीन सायकल?’’

‘‘हो, माझ्या ताईनं दिलीय गिफ्ट म्हणून.’’

निनाद म्हणतो,‘‘ए, तुम्ही सगळे संध्याकाळी सहा वाजता माझ्या बर्थडे पार्टीला या बरं का?’’

‘‘चल, आत्ता आपण खेळायला जाऊ, मग संध्याकाळी बर्थडे पार्टी.’’

आई-बाबा, ताई घरात गेलेत हे पाहून निनाद त्यांना न सांगताच आपली नवी सायकल घेऊन खेळायला जातो. असं आई-बाबांना न सांगता खेळायला जायचं असतं का? त्यामुळं संकटंही येऊ शकतात ना? तसंच काहीसं संकट निनादच्या आयुष्यातही येणार आहे का? बघूया. सगळेजण मैदानाच्या गेटबाहेर आपापल्या सायकली उभ्या करतात आणि मैदानात क्रिकेट खेळायला जातात. खूप वेळ खेळतात. निनादचा एक मित्र अश्शी बॅटिंग करतो की, त्याचा बॉल थेट मैदानाच्या कंपाऊंडबाहेर जातो. सगळी मुलं बॉल शोधायला बाहेर जातात. तेवढ्यात, निनादचं लक्ष जातं सायकलींकडे!

नवीन सायकल गायब? अशी कशी गायब झाली? आता त्याला टेन्शन येतं, आई-बाबांना काय सांगायचं? बाबा रागावले तर... त्यात आपण सायकल घेऊन खेळायला येताना घरी सांगितलंही नाही...

निनाद हिरमुसला होतो. निनादची सायकल सापडते का? कोण शोधून देतं? कोणी नेलेली असते, की लपवलेली असते? निनादची बर्थडे पार्टी होते का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ‘मेरी सायकल’ ही शॉर्ट फिल्म पाहिल्यावरच मिळतात. नंतर घडलेल्या एका छोट्याशा घटनेतून निनाद कुणाला काही देण्यातून, शेअरिंगमधून मिळणारा आनंद किती मोठा असतो, हे शिकतो. ती घटना कोणती? त्यासाठीच तर मेरी सायकल हा लघुपट पाहायला हवा!

मेरी सायकल, शॉर्ट फिल्म, सिक्स सिग्मा फिल्म्‌स, यूट्यूबवर उपलब्ध आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact