लहान असूनही रिधीमाला समजलीये माणसाची चूक! ती कोणती?

Image : https://globalclimatestrike.net

रिधीमा पांडे केवळ १४ वर्षांची आहे. आज तिची पर्यावरण कार्यकर्ती अशी ओळख आहे. आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी रिधीमा काम करते. पण हे काम तिने आता सुरु केलं असं नाही. तर ती नऊ वर्षांची होती, तेव्हापासून ती पर्यावरण संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी काम करते आहे. एवढ्या लहान वयात ती पर्यावरण कार्यकर्ती कशी काय बनली असा प्रश्न केवळ लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही पडतो.

मूळची उत्तराखंड येथील रिधीमा पांडे ही हल्दवानी या उत्तराखंडातल्या डोंगरांनी वेढलेल्या शहरात राहाते. २०१३ मध्ये केदारनाथ येथे अचानक मोठा पूर आला. तिनं टीव्हीवरुन या पुरात लोकं, घरं वाहून जातांना बघितली. खरंतर ती राहात होती तिथून केदारनाथ ३३० कि.मी अंतरावर. पण या घटनेमुळे आणि टीव्हीवर तिने पाहिलेल्या यासंबंधीच्या दृश्यांमुळे रिधीमा अस्वस्थ झाली. तिने केदारनाथला असं का घडलं, याबाबत आपल्या आई बाबांना अनेक प्रश्न विचारले. त्यांच्याकडून तिने ग्लोबल वाॅर्मिंग, क्लायमेट चेंज, त्याचे केदारनाथ येथे झालेल्या घटनेसारखे परिणाम, या गोष्टी समजून घेतल्या. माणूस निसर्गात हस्तक्षेप करत असल्यामुळे केदारनाथ येथील पूर आपत्ती सारख्या अशा घटना घडल्या आणि यापुढे अशा घटनांची संख्या वाढेल हे रिधीमाला कळल्यापासून आपलं पर्यावरणं, आपली डोंगरं सुरक्षित राहाण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, याची जाणीव तिला झाली. या विषयावर आई वडिलांसोबतच ती अनेक पर्यावरण तज्ज्ञांशी, कार्यकर्त्यांशी बोलत होती. तेव्हा तिला कळलं की गाडी चालवणे आणि त्यातून होणाऱ्या प्रदुषणामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो आहे. आपल्याला पर्यावरणावरील संकटासोबतच , पर्यावरण संवर्धनाबाबत जे काही समजलं, ते इतरांना सांगायला हवं असं तिला मनापासून वाटलं, आणि त्यातूनच तिने जाणीव जागृतीचं काम सुरु केलं.

हेही वाचा!

कोण म्हणतं, मुलांचं कोणी ऐकत नाही..टॅजेन यार्डलीची गोष्ट वाचा!

Image: https://swachhindia.ndtv.com

 

रिधीमा केवळ नऊ वर्षांची होती, तेव्हा तिने सरकारविरुध्द हरित न्याय लवादाकडे याचिका दाखल केली. हवामान बदल रोखण्यासाठी आपले सरकार अजिबात गंभीर पावलं उचलत नसल्याची तिची तक्रार होती. ती तक्रार तिने याचिकेद्वारे मांडली. पॅरिस, नाॅर्वे येथे झालेल्या पर्यावरणावरील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये रिधीमाला आमंत्रित केलं गेलं.ग्लासगो येथे झालेल्या हवामान बदलविषयक COP२६या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नेमलेल्या तरुण सल्लागार मंडळाची रिधीमा ही सदस्य होती.

हेही वाचा! 

लिसिप्रिया कंगजूमने जगभरातल्या सरकारांना काय ठणकावून सांगितले?

 

Image: https://icytales.com

पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असं रिधीमाला वाटतं. यासाठी लहान मुलं, तरुण यांच्यासोबत तापमान वाढ, हवामान बदल, त्याचे परिणाम, हवामान बदल आणि मुलांचे हक्क या विषयांवर ती व्यासपिठांवरुन गप्पा मारते. घनकचरा व्यवस्थापन, हवेचं प्रदूषण आणि इतर पर्यावरण विषयक मुद्दांवर ती सरकारी अधिकाऱ्यांना सतत पत्र पाठवत असते. आपण पाठवलेल्या पत्रांवर सरकारच्या पातळीवर काय भूमिका घेतली याचा ती पाठपुरावाही करते. एवढ्या लहान वयात पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी रिधीमा पांडे करत असलेल्या कामाची दखल 'बीबीसी'ने घेतली आणि तिचा समावेश २०२० च्या १००  प्रभावशाली महिलांच्या यादीत केला गेला.

Image: https://scroll.in

पर्यावरण या विषयावर काम करण्याची प्रेरणा रिधीमाला तिच्या आई वडिलांकडूनच मिळाली. तिचे वडील दिनेश चंद्र पांडे हे वकील असून वन्यजीव संवर्धक म्हणूनही काम करतात तर आई विनिता पांडे उत्तराखंडच्या वनविभागात काम करते. पृथ्वी ही आपली आई आहे आणि तिला वाचवण्यासाठी आपण काम करायला हवं याची जाणीव तिला तिच्या आई वडिलांमुळे झाली. भविष्यातही रिधीमाला पर्यावरण या विषयावरच काम करायचं आहे. जैवविविधता हा तिच्या आवडीचा विषय आहे. दऱ्या, नद्या, डोंगररांगा..निसर्गातील या गोष्टी आपल्याला आनंद देतात, आपल्या मनाला शांती देतात, तेव्हा त्यांच्यासाठी, त्यांना जपण्यासाठी आपण काहीतरी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे ही मोठी जाणीव रिधीमाला अगदी छोट्या वयातच झाली. आज रिधीमा पांडेची ओळख केवळ भारतापुरती मर्यादित नसून या छोट्या मुलीला संपूर्ण जग ओळखतं.

 

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा  : ९११२०५०५०० 
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact