एखाद्या गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना, मध्येच मुलं बोलली तर त्यांना दरडावून 'तुम्हाला काय कळतं यातलं?' असं म्हणत शांत केलं जातं. कारण मोठ्यांच्या तुलनेत मुलांच्या बोलण्याला काही वजनच नसतं. पण हा समज अमेरिकेच्या न्यू इंग्लड प्रदेशातील व्हरमाॅंट या राज्यातील टॅजेन यार्डली या मुलीने खोटा ठरवला. आपल्या पृथ्वीवर हत्तींचं जगणं असुरक्षित झालं आहे,हस्तीदंताचा अवैध व्यापार बंद व्हायला हवा अशा गंभीर विषयावर टॅजेन जेव्हा व्हरमाॅंटच्या स्टेटहाउसमध्ये बोलली तेव्हा ती ६ व्या ग्रेडमध्ये शिकत होती.
टॅजेन सहाव्या ग्रेडमध्ये शिकत होती, तेव्हा एके दिवशी वर्गात शिक्षकांनी पृथ्वीवर हत्तींचं जगणं असुरक्षित झालं आहे, हस्तीदंताचा बेकायदेशीर व्यापार होत आहे, त्यामुळे हत्तींना खूप धोका निर्माण झाला आहे, हे सांगितलं. हे ऐकल्याबरोबर टॅजेनने उभं राहून या विषयावर मला काम करायचं आहे, हे सांगितलं. तेव्हा शिक्षकांनी हस्तीदंताचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी एच २९७ हे विधेयक मांडलं जात आहे. तेव्हा स्टेटहाऊसमध्ये जावून बोल आणि हे विधेयक पास होईल यासाठी त्याला बळ दे असा सल्ला तिला शिक्षकांनी दिला. टॅजेनच्या मैत्रिणीची आई नॅशनल जिओग्राफिकमध्ये काम करायची. तिच्याकडूनही हत्तींना असलेला धोका याबद्दल टॅजेननं ऐकलं होतं. तेव्हा तिने हत्तींना वाचवण्यासाठी स्टेटहाऊसमध्ये जावून बोलायचं ठरवलं. मुलांच्या बोलण्यालाही वजन असतं, हा अनुभव टॅजेनने पहिल्यांदा स्टेटहाउसमध्ये बोलताना घेतला. टॅजेन जेव्हा बोलू लागली तेव्हा एक सिनेटर बसल्या बसल्या विणकाम करत होती. टॅजेन बोलू लागल्यावर तिने हातातलं काम बाजूला ठेवलं आणि टॅजेन काय सांगतेय, हे लक्षपूर्वक ऐकू लागली.

Image: sevendaysvt
हेही वाचा!

Image: linkedin
हस्तीदंताचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी मांडण्यात आलेलं हे एच २९७ विधेयक पास होवू शकलं नाही. पण हत्तीच्या रक्षणासाठी मुलांमध्ये, तरुणांमध्ये, सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करण्याचा टॅजेनचा निर्धार मात्र पक्का झाला. पृथ्वीवरील हत्ती कसे धोक्यात आले आहे, यावर डाॅक्युमेण्टरी बनवण्याची आयडिया तिच्या डोक्यात आली. शाळेतील एक शिक्षक फिल्म मेकींगचंही काम करतात, हे टॅजेनला माहीत होतं. ती त्या शिक्षकांकडे गेली. त्यांना आपली हत्तींवर डाॅक्युमेण्टरी फिल्म बनवण्याची आयडिया बोलून दाखवली. शिक्षकांनाही टॅजेनचा आयडिया आवडली. त्यांनी तिला मदत केली. टॅजेननेही म्ग या विषयावर काम करायला उत्सुक असलेल्या मुलामुलींना एकत्र आणून टीम तयार केली आणि फिल्म तयार करायला सुरुवात केली. या फिल्मसाठी टॅजेननं पटकथा लिहिली आणि फिल्ममेकर मार्क लाइन लुसी यांच्यासोबत चित्रीकरणही केलं.
'किडस बॅटल फाॅर अ वर्ल्ड विथ एलिफण्टस'ही टॅजेनची पहिली डाॅक्युमेण्टरी फिल्म २०१६मध्ये प्रदर्शित झाली. या फिल्ममध्ये स्थानिक मुलं हत्तींबद्दल माहिती देत आहे, असं दाखवण्यात आलं. टॅजेनची ही पहिली डाॅक्युमेण्टरी प्रदर्शित झाली, तेव्हा टॅजेन सातव्या ग्रेडमध्ये होती. ही फिल्म फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडियावरुन जगभरात व्हायरल झाली. जगभरातून अनेक शाळांनी ही फिल्म आपल्या शाळेतील मुलांना दाखवण्याची इच्छा व्यक्त केली.
पहिल्या डाॅक्युमेण्टरी नंतर
किडस बॅटल फाॅर अ वर्ल्ड विथ एलिफण्टस या पहिल्या डाॅक्युमेण्टरी नंतर टॅजेनने विविध विषयांवर पाच डाॅक्युमेण्टरी फिल्म्स तयार केल्या. जंगली आफ्रिकन मांजरी, समुद्राचं पर्यावरण, समुद्रातील जीव यांचं सवंर्धन या विषयांवर टॅजेनने तयार केलेल्या डाॅक्युमेण्टरी फिल्म्सही लोकांना खूप आवडल्या. तिची लेटेस्ट डाॅक्युमेण्टरी जैवविविधतेवर आहे. निसर्गात, आपल्या जगण्यात जैवविविधता कशी महत्त्वाची आहे, पण मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे वनस्पती, प्राणी कसे नष्ट होत आहे हे सांगणारी 'प्रोटेक्ट नेचर सो दॅट इट कॅन प्रोटेक्ट अस' नावाची डाॅक्युमेण्टरी तयार केली आहे. आपल्या डाॅक्युमेण्टरीमधून ती लोकांना निसर्ग, पर्यावरण, प्राणी संवर्धनाचे धडे देत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी चळवळ उभी राहावी म्हणून मुलांना, तरुणांना डाॅक्युमेण्टरीजमधून आवाहन करत आहे. टॅजेनला तिच्या या कामाबद्दल 'ॲक्शन फाॅर नेचर्स' तर्फे १३ ते १६ वयोगटातील मुलांना दिला जाणारा 'इंटरनॅशनल यंग इको हिरो' पुरस्कार मिळाला आहे. ग्लोरिया बॅटनचा यंग हिरो पुरस्कार मिळाला. तर लंडनध्ये तेव्हाचे 'प्रिन्स विल्यम ड्यूक ऑफ केंब्रिज' यांच्या हस्ते कंझर्व्हेशन अवाॅर्डही मिळाला आहे.

Image: sevendaysvt
हेही वाचा!
एकीकडे टॅजेनच्या कामाचं कौतुक होत होतं तशी तिच्या कामावर, बोलण्यावर टीकाही खूप झाली. तू हत्तींबद्दल जे मांडते आहेस, त्याला पुरावा काय? या लहान मुलीच्या बोलण्याला काय महत्व द्यायचं ते टॅजेन व्हरमाॅण्टमध्ये राहाते, तिचा हत्तीशी काय संबंध असे प्रश्न विचारुन तिला विरोध केला गेला. पण या विरोधाने टॅजेन मागे हटली नाही, की शांतही बसली नाही. तिने उलट स्वत:ची हिंमत वाढवली आणि लोकांना निसर्ग, प्राणी, समुद्री जीव वाचवण्यासाठी माहिती देण्याचं काम सुरुच ठेवलं. टॅजेनला मोठं होवून पर्यावरण संवर्धन, आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात करिअर करायचं आहे. टॅजेनला भाषण द्यायला, लोकांशी संवाद साधायला, लोकांशी बोलायला खूप आवडतं. तिच्या या आवडीमुळेच टॅजेन निसर्ग संवर्धन या महत्वाच्या विषयावर लहान वयातही आत्मविश्वासाने बोलत आहे.
एखादा मुद्दा मांडण्यासाठी आपलं वय कधीच अडथळा ठरत नाही, हे टॅजेननं आपल्या डाॅक्युमेण्टरीतून दाखवून दिलं आहे. ती जगभरातल्या मुलांना त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांवर बोलण्यासाठी, पुढे येवून काम करण्यासाठी आवाहन करते आहे. आपण नाही बोललो तर कोण बोलणार, मी नाही बोलले तर कोण बोलणार, असा प्रश्न टॅजेन विचारते आहे. आपल्याकडे टॅजेनच्या प्रश्नाचं उत्तर आहे का?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact