लिसिप्रिया कंगजूमने जगभरातल्या सरकारांना काय ठणकावून सांगितले?

लिसिप्रिया कंगजूम ही बारा वर्षांची मुलगी. ती २१ देश फिरुन आली आहे. पण ती सहलीसाठी, मौजमजा करण्यासाठी म्हणून फिरायला गेली नव्हती. तर आपली पृथ्वी वाचवण्यासाठी काहीतरी करा हेजगभरातल्या सरकारांना सांगण्यासाठी गेली होती. लिसिप्रिया कंगजूम हिने २१ देशांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल या विषयावर भाषणं दिली आहेत. तिने पहिलं भाषण कधी दिलं होतं माहितीये, ती जेव्हा आठ वर्षांची होती तेव्हा. 

पूर, वादळं ही नैसर्गिक संकटं लिसिप्रिया खूप लहान होती तेव्हापासून पाहाते आहे. ती सध्या दिल्लीता राहात असली तरी तिचा जन्म ईशान्य भारतात. मणिपूरमधील बाशिखाॅंग या गावात झाला. वादळं, पूर यामुळे पडणारी, वाहून जाणारी लोकांची घरं, मरणारी लोकं लिसिप्रियानं लहानपणापासून बघितली आहेत. हे बघून तिला खूप वाईट वाटलं. तेव्हापासून आपण काहीतरी करायला हवं असं लिसिप्रियाला वाटायचं. तेव्हा ती अगदीच चिमुकली होती. आपण पर्यावरणासाठी काम करायला हवं हा तिचा निर्धार पक्का झाला तो ती आठ वर्षांची असताना, २०१८ मध्ये. तेव्हा ती तिच्या वडिलांसोबत मंगोलियामध्ये उलनबातार येथे 'एशिया मिनिस्ट्रिअल काॅन्फरन्स फाॅर डिझास्टर रिस्क रिडक्शन' या परिषदेसाठी गेली होती. तेव्हा तिने तिथे विविध वक्त्यांची भाषणं ऐकली. या भाषणांचा लिसिप्रियाच्या मनावर खूप परिणाम झाला. तेव्हा तिनं पर्यावरण रक्षणासाठी, हवामान बदल रोखण्यासाठी काम करण्याचा आपला निर्धार पक्का केला. याच परिषदेत लिसिप्रियाने आपलं पहिलं भाषण केलं. हवामान बदलाने कशा नैसर्गिक आपत्ती येत असून आता जगभरातल्या सरकारने यावर काम करणं कसं गरजेचं आहे यावर ती बोलली. एवढीशी मुलगी किती मोठ्या विषयावर सहज बोलते आहे हे बघून तिथे उपस्थित असलेले सर्वच जण प्रभावित झाले. तेव्हा भारतातल्या एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या मुलीची ओळख जगाला झाली. 

Image: wionews

हेही वाचा!

Image lifegate

मणिपूरमध्ये आपल्या गावात राहात असताना लिसिप्रियाने पाहिलेली, अनुभवलेली नैसर्गिक संकटं वेगळी होती. तर दिल्लीत स्थलांतरित झाल्यानंतर वायू प्रदूषणाचा तिने अनुभव घेतला. केवळं आपलं जगणंच नाही तर संपूर्ण पृथ्वीचं आरोग्य प्रदूषणामुळे धोक्यात आलं आहे. हे वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी भारत सरकारने काहीतरी करायला हवं, हवामान बदलासंबंधीचा कायदा संसदेत करायला हवा यासाठी २०१९म्हणतेय, का ती आंदोलन करतेय याकडे आपल्या देशातील लोकांचं लक्ष गेलं. आज २०२३ सुरु आहे, पण या मागणीसाठी लिसिप्रिया सतत आंदोलन करत असते. विविध कार्यक्रमातून ती आपलं म्हणणं लोकांसमोर, भारत सरकारसमोर मांडत आहे. लहान मुलांमध्ये पर्यावरण जपण्याची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी तिने मुलांची चळवळ सुरु केली आहे, तर तरुणांमध्ये पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी, पर्यावरण, हवामान बदल याबाबतची माहीती पसरवण्यासाठी क्लब सुरु केला आहे.  

हेही वाचा!

हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि त्यासाठीचे आवश्यक बदल या विषयावर बोलण्यासाठी लिसिप्रियाला जगभरातून आमंत्रणं येतात.

२०१९ मध्ये स्पेन येथील माद्रिद येथे झालेल्या 'युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज काॅन्फरन्स' काॅप २५ साठी लिसिप्रिया गेली होती. ती जेव्हा या परिषदेत भाषण करण्यासाठी व्यासपिठावर उभी राहिली तेव्हा उपस्थित सर्वजण अवाक झाले. कारण या परिषदेत भाषण करणारी ती सर्वात लहान वक्ता होती. 

२०२२ मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या काॅप २७ या परिषदेत २०० देशांच्या प्रतिनिधींसमोर एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी करा, हे आपलं म्हणणं लिसिप्रियानं निर्भयपणे आणि ठामपणे मांडलं. 

Image lifegate

Image : bbc.com

लिसिप्रियाचं 'सुकीफू'

श्वास कोंडेल इतकं प्रदूषण असताना सरकारने काहीतरी करायला हवं ही आपली मागणी ठाशीव पध्दतीनं सांगण्यासाठी तिने कचऱ्यात फेकलेल्या सामानापासून 'सुकीफू' अर्थात 'सर्व्हायव्हल किट फाॅर द फ्यूचर' असं प्रतिकात्मम किट बनवलं.

ते घालून हे प्रदूषण रोखण्यासाठी काहीतरी करा , या आपल्या मागणीकडे सरकारचे, सामान्य लोकांचं, देशातील तरुणांचं लक्ष वेधत आहे. 

वाढत्या प्रदूषणावर जर सरकारने काहीच उपाय केला तर प्रदूषित वातावरणात जगताना श्वास घेण्यासाठी असंचा किटा तोंडाला लावून फिरण्याची वेळ आपल्यावर येईल हेच लिसीप्रिया 'सुकीफु' द्वारे सांगत आहे. 

काय म्हणणं आहे लिसीप्रियाचं?

आपली पृथ्वी जगण्यासाठी सुरक्षित राहायला हवी. त्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. पृथ्वी सुरक्षित ठेवण्यासाठी मी सतत काम करत राहीन. 

हवामान बदलाने जी संकटं येत आहेत, त्याचे आम्ही बळी ठरलो आहोत. पण येणाऱ्या पिढीला या संकटाचा सामना करायला लागू नये यासाठी म्हणून मी सतत प्रयत्न करीत राहीन. 

जागतिक पातळीवर मोठ्मोठ्या परिषदा होतात, तेव्हा जगभरातले देशांचे प्रतिनिधी हवामान बदलासाठी सतत दुसऱ्यांना दोष देतात. भांडतात. खूप बोलतात. पण करत मात्र काहीच नाही.

पण आता जर पृथ्वी वाचवायची असेल तर नुसता एकमेकांना दोष देवून चालणार नाही, केवळ बोलून चालणार नाही, पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी, हवामान बदल रोखण्यासाठी आता नेमकी कृती करायलाच हवी. 

 Image lifegate

हेही वाचा!

Image: twitter

रायझिंग स्टार 

लिसिप्रिया पर्यावरण संरक्षणासाठी, हवामान बदलाबाबत सरकारपासून सामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जे काम करत आहे, त्या कामाचं जगभरात कौतुक तर होतंच आहे. पण त्यासोबत तिला तिच्या कामासाठी विविध पुरस्कारही मिळाले आहेत. ३१ऑगस्ट २०१९ मध्ये लिसीप्रियाला 'वर्ल्ड चिल्ड्रन पीस प्राइझ' हा पुरस्कार मिळाला. २०२० मध्ये तिला 'ग्लोबल चाइल्ड प्राॅडिगी' (जागतिक विलक्षण बालक) हा पुरस्कार मिळाला. वाॅशिंग्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमात लिसिप्रियाला 'रायझिंग स्टार' म्हणून गौरवलं गेलं. विविध पुरस्कारातून मिळणारे पैसे लिसिप्रिया स्वत:साठी न ठेवता ती गरजू आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून ते दान करते. स्वत्:ची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांनाही लिसिप्रियाला पुरस्काराची रक्कम आणखी गरजू मुलांसाठी वापरायला हवी , हे वाटणं खूप मोठी गोष्ट आहे. 

लिसीप्रिया दिल्लीत ज्या शाळेत शिकते, त्या शाळेत तिच्या वर्गातील सर्व विद्यार्थी लिसिप्रिया जे काम करते आहे, ते पाहून प्रभावित झाले आहे. आपणही लिसिप्रियाची साथ द्यायला हवी असं त्यांना मनापासून वाटत आहे. तिच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक अजिबात न वापरण्याची, झाडं लावण्याची, पर्यावरण रक्षण जागृतीसाठी  ज्या रॅलीज निघतील त्यात सहभागी होण्याची, कचरा साफ करण्याची प्रतिज्ञा केली आहे.  एवढुशा वयात पर्यावरण रक्षण, हवामन बदल या विषयावर बोलणाऱ्या, त्यासाठी काम करणाऱ्या लिसिप्रियाबद्दल जगाला का कौतुक वाटतं आहे, ते आता नक्कीच समजलं असेल... हो ना?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact