
आजी आजोबा नेहमी सांगतात पूर्वी रात्र झाली की काळोख पडायचा. बाहेरचा अंधारही घरात येऊन घर आणखी अंधारायचं. रात्र झाली की सगळं शांत व्हायचं. माणसं लवकर झोपायची लवकर उठायची. रात्रभर पाहण्यासाठी तेव्हा टी.व्ही, मोबाइल नव्हता. तरी आजी आजोबांसारखी इतर माणसं बोअर वगैरे व्हायची नाही. हल्ली मुलांना आपल्या आजी आजोबांबाबत किंवा जुन्या काळातील माणसांबाबत असा प्रश्न नेहमी पडतो. तेव्हा टीव्ही पाहण्याशिवाय करण्यासारख्या इतर मजाही असायची. आकाशातले चंद्र, तारे पाहात, गप्पा गोष्टी करत, विविध प्रकारचे खेळ खेळत झोप यायची आणि रात्र कशी संपायची ते कळतही नसत. पण हल्ली आजी आजोबांच्य्या वयाची माणसं कुरकुर करतात, तक्रार करतात की हल्ली झोपू म्हटलं तरी झोप येत नाही. डोळ्यावर सतत कोणत्या ना कोणत्या लाइटचा प्रकाश पडत असतो. झोप लागली तरी मधे मधे मोडते. रात्रीचा प्रकाश ही माणसांपासून प्राणी पक्ष्यांपर्यंत, आकाशापासून समुद्राच्या तळापर्यंत सगळ्यांसाठीच त्रासाची गोष्ट झाली आहे. रात्र झाली तरी झोपू थोड्या वेळाने म्हणत मोठी माणसं, मुलं टीव्ही/मोबाइल पाहात बसतात.
हेही वाचा!
खऱ्या पफीनला बोलावण्यासाठी खोट्या पफीनची नेमणूक
माणसाने विविध उपकरणं, यंत्र तयार केली. प्रत्येक समस्येवरचा/ अडचणीवरचा उपाय शोधला. रात्रीच्या अंधारावर बॅटरीपासून लाइट. एलइडी लाइटपर्यंत अनेक पर्याय शोधले. आता या पर्यांयामुळे रात्रीचा अंधारच गायब झाला आहे. दिवसा सूर्य उगवल्यानंतरही प्रकाश पडला नाही, ही गोष्ट जितकी गंभीर ठरेल तितकीच रात्रीचा अंधार गायब होणे ही ठरते आहे. पण याकडे कोणाचं लक्षच नाहीये.
रात्रीचा अंधार गायब करणाऱ्या कृत्रिम प्रकाशाचा परिणाम
१. वेगवेगळ्या लाइट/बल्ब यामुळे रात्र झाली तरी घर आणि घराबाहेरचा परिसर उजळलेलाच असतो. बरं घरातले लाइट बंद करुन झोपलो तरी अनेकदा बाजूच्या बिल्डिंगमधील घरातल्या लाइटचा, रस्त्यावरील लाइटचा प्रकाश घरात येतोच. डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशामुळे झोप लागण्यास अडचण निर्माण होते. शहरातल्या मोठमोठ्या इमारती, त्यावर झगमगणारे दिवे यामुळे आकाशातील चंद्र ताऱ्यांचा प्रकाश जाणवत नाही. पृथ्वीवरील रात्रीच्या वेळी झगमगणाऱ्या, अंधार झाल्यावर लख्ख कृत्रिम प्रकाश पाडणाऱ्या दिव्यांमुळे तयार झालेलं प्रकाशाचं प्रदूषण थेट आकाशापर्यंत पोहोचलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे खगोलशास्त्रज्ञांना देखील अवकाशील घटकांचे निरिक्षण करुन अभ्यास करताना अडचणी जाणवतात.
२. रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाचा हा एवढाच परिणाम नाही. पृथ्वी, समुद्र, आकाशातल्या प्रत्येक जीवावर या कृत्रिम प्रकाशाचा परिणाम झालेला आहे. कृत्रिम प्रकाशामुळे मानवापासून प्राण्यापर्यत प्रत्येकाच्या जैविक घड्याळावर परिणाम झालेला आहे. हे घड्याळ बिघडलं की उठण्यापासून झोपण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. यामुळे आपल्या शरीरातील घड्याळ गोंधळतं. हे घड्याळ एकदा का गोंधळलं की त्याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. कामावर होतो.
३. रात्र होते, अंधार पडतो तसे मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती होते. हे हार्मोन पुरेसं स्त्रवलं की रात्री झोप येते. पण रात्रीचा कृत्रिम प्रकाश या हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो. हे हार्मोन पुरेसे स्त्रवले नाही तर वेळेवर झोप येत नाही. पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे डोकं दुखतं, ताण येतो. भीती वाटते. गोंधळ उडतो.

४. रात्रीचा काळोख गायब करणाऱ्या कृत्रिम प्रकाशाचा परिणाम प्राणी, पक्षी, किड्यांवरही होतो. रात्रीच्या कृत्रिम प्रकाशामुळे पक्ष्यांच्या वागण्यात बदल होतो. पक्ष्यांच्या स्थलांतरचा पॅटर्न बदलतो. पक्ष्यांच्या झोपण्या उठण्यावर परिणाम होतो. रात्रीचा प्रकाश पक्ष्यांची दिशाभूल करतो. स्थलांतराच्या काळात पक्षी रस्ता चुकतात. भरकटतात. रस्त्या चुकल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत.
५ . पक्ष्यांचे खाद्य असलेले किटकही रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाकडे आकर्षित होतात. कृत्रिम प्रकाश स्त्रोतांच्या म्हणजे लाइट, बल्बच्या सान्निध्यात येऊन मरतात. त्यामुळे पक्ष्यांची उपासमार होते.
६. वाहतुकीचा आवाज, रात्रीचा कृत्रिम प्रकाश यामुळे शहरातील पक्षी त्यांच्या मूळ वेळेपेक्षा चार पाच तास आधीच उठतात आणि कामाला लागतात.
७. समुद्राखालील कृत्रिम प्रकाश व्यवस्थेने समुद्राच्या आतील प्राण्यांनाही त्रास होतो आहे. खनिज तेल काढणारी मोठमोठाली यंत्रे, रात्रीच्या वेळेत समुद्रातून प्रवास करणारी जहाजं यामुळे समुद्राच्या पर्यावरण व्यवस्थेवर परिणाम होतो आहे.
८. कृत्रिम प्रकाशाच्या प्रदूषणामुळे प्रण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होतो आहे.

रात्रीचा काळोख जपण्यासाठी..
माणसांवर, प्राणी-पक्षी-किटकांवर रात्रीच्या प्रकाशा होणारा गंभीर परिणाम बघता अनेक देशात वेगवेगळ्या संस्थांकडून ' लाइट आउट' हा उपक्रम राबवला जातो. त्यात पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या काळात रात्री उंच उंच बिल्डिंगवरील लाइट बंद ठेवले जातात. द नॅशनल पार्क सर्व्हिससारख्या संस्था रात्रीचं आकाश जपण्याला महत्व देत आहे. सामान्य माणसंही प्रयत्न करत आहे. रात्रीतला कृत्रिम प्रकाश कमी करुन नैसर्गिक प्रकाश जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाचा आपल्याला आणि इतरांना त्रास होऊ नये, रात्रीचा नैसर्गिक प्रकाश जपला जावा याची काळजी आपण स्वत:ही घेऊ शकतो. गरज नसेल तर रात्री घराबाहेर जास्त लाइट लावू नये. गरज असेल तेव्हाच बाहेर उजेड करा. घरातून रात्रीच्या वेळेस बाहेर पडणारा प्रकाश खिडक्या, पडदे यांनी अडवायला हवा. घराबाहेर, रस्त्यावर दिवे आणि प्रकाशाची व्यवस्था करताना तो प्रकाश रस्त्यावरच राहील तो आकाशात जाऊन तिथे प्रकाशाचं प्रदूषण होणार नाही याची काळजी माणसांनी घ्यायला हवी.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


