
Image: medium.com
ओम प्रकाश गुर्जर राजस्थानातला मुलगा. तो जेव्हा ५ वर्षांचा होता तेव्हा तो त्याच्या कुटुंबापासून, आई-बाबांपासून वेगळा झाला. त्याला बळजबरीने शेतावर काम करायला नेलं गेलं. त्याच्या आजोबांनी शेती करण्यासाठी सावकाराकडून् कर्ज घेतलं होतं. तेच कर्ज आजोबांनंतर वडील फेडत होते. ओमचे वडील कसेबसे कर्ज फेडत होते. पण तरीही सावकाराने कर्ज फेडीसाठी छोट्याशा ओमला बळजबरीने उचलून नेले आणि शेतावर काम करण्यास लावले. पहाटेपासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत ओम शेतातच राबायचा. आपल्याला जेवायला मिळेल का? आपण जगू का? एवढाच प्रश्न ओमसमोर असायचा. आपल्या वयाची इतर मुलं आपल्यापेक्षा वेगळं जगतात. ती शाळेत जातात, खेळतात, त्यांना मित्र-मैत्रिणी असतात, त्यांना फक्त अभ्यास करायचा असतो या सर्व गोष्टी बालमजूर म्हणून राबणाऱ्या ओमला माहितीच नव्हत्या. ओम जसजसा मोठा होत होता त्याला आपल्यात आणि प्राण्यांमध्ये फरकच वाटायचा नाही. खेळ, शिक्षण, कुटुंब यांच्याशिवाय ओमने शेतात दिवस रात्र अल्प मजुरीवर राबत दोन वर्षं काढलीत. ओम जेव्हा ७ वर्षांचा होता तेंव्हा तो बालमजूर म्हणून राबतोय हे शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या 'बचपन बचाओ आंदोलना'च्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पोलिसात त्या सावकाराविरुध्द ओमकडून बालमजूरी करुन घेतल्याचा गुन्हा दाखल केला. केस कोर्टात गेली. तिथे ओम हा बालमजूर असल्याचं सिध्द केलं गेलं.
हेही वाचा!
बालमजुरीतून सुटका झालेल्या ओमला बचपन बचाओ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी राजस्थानातल्या 'बाल आश्रम'मध्ये ठेवलं. ओमला तिथे पहिल्यांदा आपल्या बालपणाची जाणीव झाली. तो शाळेत शिकू लागला. शिकता शिकता त्याला त्याच्यावर बालमजृर म्हणून झालेल्या अन्यायाची आणि त्याच्या प्रमाणेच इतर मुलांचे होत असलेल्या शोषणाची जाणीव झाली. आपली तर शोषणातून सुटका झाली, पण आपल्यासारख्याच इतर मुलांचं काय? हा विचार शाळेत शिकणाऱ्या ओमला सतावू लागला. त्याने बालमजुरीच्या विळख्यातून मुलांची सुटका करण्यासाठी काम करायला सुरुवात केली.
मुलांचे जन्मदाखले नसल्याचा फायदा घेत मुलांचे जास्त वय दाखवून कमी वयातल्या मुलांना बालमजूर म्हणून बेकायदेशीरपणे राबवलं जातं. यासाठी गावातील मुलांचे जन्मदाखले काढण्याचं काम तो करु लागला. गावातील लोकांना मुलांचे जन्मदाखले काढणं का महत्त्वाचं आहे? हे पटवून देवू लागले. त्याने पुढाकार घेवून ५०० मुलांचे जन्मदाखले काढून दिले. तसेच त्याने मुलांचे हक्क अबाधित राहावेत, त्यांचं बालपण जपलं जावं, त्यांना शिक्षण मिळावं, खेळता यावं, कुटुंबात सुरक्षितपणे जगता यावं यासाठी ओमने 'पाठशाळा' नावाची संस्था सुरु केली. तिथे बालमजूरीतून बाहेर पडलेली, गावातील गरीब घरातली मुलं शिकण्यासाठी, एकत्र खेळण्याचा आनंद घेण्यासाठी येवू लागली. या मुलांसाठी ओमने आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी अभ्यासक्रम तयार केला. कोण्याही मुलाला बालमजुरीचा भयंकर अनुभव घ्यायला लागू नये, त्यांना शिकता यावं, बालपणाचा आनंद घेता यावा, त्यांचे बालक म्हणून हक्क सुरक्षित राहावेत यासाठी ओम आपलं शिक्षण सांभाळून काम करायचा. कमी वयात अतिशय महत्त्वाचं काम करणाऱ्या ओमला २००६ मध्ये 'आंतरराष्ट्रीय चिल्ड्रन्स पीस प्राईज' हा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला. एकवेळ होती जेव्हा ओम नावाच्या मुलाला मजूराशिवाय दुसरी ओळख नव्हती. शेतात राबण्यापलिकडे दुसरं काही माहित नव्हतं त्याच ओमला 'वाचवणारा' या नावाने ओळखलं जातं.

Image: borgenprojec
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact