१२ वर्षांचा निर्वाण प्राण्यांसाठी आठवड्यातून दोनदा करतो आंदोलन!

 Image: timeforkids

कुठलंही काम करायला विशिष्ट वयच लागतं असं नाही. समज असली की वय लहान असो की मोठं आपण काम करु शकतो आणि आपण करत असलेल्या कामाचा प्रभावही पाडू शकतो, हे १२ वर्षांच्या निर्वाण अगरवाल या मुलाने दाखवून दिले आहे. आता तो १२ वर्षांचा असला तरी प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल बोलायला,आवाज उठवायला, काम करायला निर्वाणने वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच सुरुवात केली होती. निर्वाण अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील एडिसन येथे राहतो. तो फक्त ३ वर्षांचा होता तेव्हा त्याने प्राण्यांचं सर्कशीमध्ये होणाऱ्या शोषणवर पहिलं पाऊल उचललं होत. सर्कशीच्या ठिकाणी जावून त्याने सर्कशीमध्ये प्राण्यांचं कसं शोषण होतं यावर आधारित पत्रकं वाटली होती. पण निर्वाण लहान होता म्हणून लोकांनी तो वाटत असलेली पत्रकं घेतली. पण त्याने लगेच खूप काही फरक पडला नाही. पण निर्वाण त्याचं काम करत राहिला.

हेही वाचा!

प्राण्यांना दिली जाणारी वाईट वागणूक, त्यांच्यावर होणारा अन्याय,  लोकर उद्योगापासून घोड्यांच्या शर्यतीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्राण्यांचा होणारा गैरवापर या प्रत्येक बाबतीत प्राण्यांच्या हक्कांसाठी निर्वाणने आवाज उठवला आहे. प्राण्यांच्या हक्कांसाठी, प्राण्यांचा , त्यांच्या हक्कांचा नागरिकांनी सहदयतेने विचार करावा यासाठी निर्वाण आठवड्यातून दोनदा  सार्वजनिक ठिकाणी निदर्शनं करतो. तो प्राण्यांचे हक्क, प्राणीजीवन यांच्याबाबतीत इतका संवेदनशील आहे की त्याचा प्रभाव त्याच्या जगण्याच्या पध्दतीवरही पडला आहे. निर्वाण आहारात प्राण्यांच्या श्रमातून पिकणारा एकही घटक खात नाही. निर्वाण वेगन आहे.

लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत बहुतेकांना हेच माहित नसतं की अन्न, कपडे आणि आपलं मनोरंजन यासाठी प्राण्यांना किती त्रास दिला जातो, त्यांना दुखावलं जातं, वेदना दिल्या जातात. त्यामुळे ज्यांना हे कळतं त्यांनी तरी प्राण्यांच्या त्रासाविषयी, त्यांच्या हक्काविषयी बोलायला हवं. म्हणून आपणच बोलायला सुरुवात केली, निदर्शनं, आंदोलनं करायला सुरुवात केली, मोठ्यांना, मुलांना याबाबतीत जागरुक करायला सुरुवात केली, असं निर्वाण सांगतो.  त्यासाठी निर्वाण आठवड्यातून दोनदा सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांसाठी आंदोलन करतो. प्राण्यांना बोलता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असतांनाही ते मूकपणे ते सहन करतात. म्हणून आपण त्यांच्यासाठी बोलायला हवं असं निर्वाणणे ठरवलं , म्हणूनच अगदी लहानपणापासून तो प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करत आहे. आज तो १२ वर्षांचा आहे, पण त्याच्या या कामात खंड पडला नाही

 Image: timeforkids

हळूहळू का होईना पण निर्वाण प्राण्यांसाठी करत असलेल्या आंदोलनांचा परिणाम व्हायला लागला आहे. त्याच्या शहरात जाॅन्सन पार्क झू नावाचं प्राणी संग्रहालय आहे. पण या भागात कायम पूर येतो. त्यामुळे येथील प्राण्यांच्या आरोग्याला मोठा धोका आहे. ही बाब त्याने या प्राणीसंग्रहालयातील लोकांच्या लक्षात आणून दिली. पण त्याने काहीच फरक पडला नाही. मग त्याने ही बाब २०२२ मध्ये एडिसन शहराच्या प्रशासन व्यवस्थेच्या, तेथील अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्याबाबत अधिकाऱ्यांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वांची जाणीव जागृती केली. अधिकाऱ्यांनाही पुरामुळे प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना असलेला धोका लक्षात आला. शासनाने हस्तक्षेप करुन ते प्राणीसंग्रहालय बंद केलं आणि तेथील प्राण्यांना जवळच्या अभयारण्यात हलवलं.

निर्वाण प्राण्यांसाठी करत असलेली आंदोलनं, प्राणी हक्कांबाबत सामान्य जनतेची जाणीव जागृती याची दखल ' पीपल फाॅर द एथिकल ट्रीटमेण्ट ऑफ ॲनिमल्स अर्थात पेटाने घेतली. पेटाने लहान वयात प्राण्यांसाठी मोठं काम करणाऱ्या निर्वाणला मानाचा पुरस्कार देवून त्याचा गौरव केला, त्याचं कौतुक केलं.

हेही वाचा!

 Image: timeforkids

आपण शिकून कितीही मोठं झालो तरी आपण प्राण्यांसाठी करत असलेली आंदोलनं चालूच ठेवणार आहोत असा निर्वाणने निर्धार केला आहे. मोठेपणी निर्वाणला वेगन रेसिपी तयार करणारा शेफ व्हायचं आहे. प्राण्यांच्या हक्कांसाठीचा आपला आवाज आणखी धारदार करण्यासाठी विविध गोष्टींचं ज्ञान, माहिती मिळवण्याचे निर्वाणचे प्रयत्न सतत चालूच असतात. निर्वाणच्या या कामात त्याच्या वयाची आणि त्याच्यापेक्षा लहान असणारी अनेक मुलं सामील झाली आहेत. निर्वाणला आपलं काम असंच लोकांना आपल्या कामाशी जोडत वाढवायचं आहे. त्याला जास्तीत जास्त प्राण्यांबद्दल संवेदनशील असलेला समाज निर्माण करायचा आहे. निर्वाण हे नक्की करेल हे त्याला ओळखणारे लोकं खात्रीने सांगतात. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact