ती फक्त २वर्षांची आहे पण घोडा चालवते. खेळण्यातला नाही खराखुरा!

Image: foxnews

सर्वच लहान मुलांना प्राण्यांबद्दल मोठं आकर्षण असतं. तुम्हालाही प्राणी आवडतात ना. कुत्रा, मांजर, घोडा.. प्राण्यांचे फोटो, व्हिडीओ बघणं ही तर अगदी आवडची गोष्ट. त्यात जर आई बाबांनी झू मध्ये जावून प्राणी पक्षी दाखवले की किती आनंद होतो आपल्याला. या प्राण्यांना लांबून बघायला किती मजा येते ना. पण तोच एखादा प्राणी जवळ येवू लागला तर लहान मुलं घाबरतात, मोठ्यांच्या मागे जावून लपतात. लहान मुलांना प्राण्यांच्या भावना कळण्याइतकी समज नसते. त्यामुळे प्रेमाने जवळ येवू पाहणाऱ्या प्राण्यांना ते भीतीने दूर लोटतात. आणि म्हणूनच या सर्वांमध्ये फक्त दोन वर्षांची छोटीशी मायझी इव्हान ही मुलगी वेगळी ठरते. अमेरिकेतल्या उटाह राज्यातील या मुलीला सतत घोड्यांसोबतच राहायचं असतं. त्यांच्याशी खेळायचं असतं. घोड्यांची ही आवड तिला अगदी लहानपणापासून म्हणजे ती अगदी ३ महिन्यांची होती तेव्हापासून आहे.

हेही वाचा!

मायझी जेव्हा खूपच लहान होती तेव्हा तिची आई तिला प्राण्यांचे चित्र असलेल्या पुस्तकातील प्राणी दाखवायची. या पुस्तकातूनचे तिला पहिल्यांदा घोडा पाहायला मिळाला. पुस्तकातील चित्रं पाहताना मायझीला घोड्याचं चित्रं पाहायला फर आवडायचं. मायझीला घोडा आवडतो हे तिच्या आईला लक्षात आलं. मग ती जेव्हा ६  ते ७  महिन्यांची झाली तेव्हा मायझीच्या आईने तिला पहिल्यांदा घोडा दाखवला. तिचा हात हातात धरुन तिच्या आईने घोड्याच्या अंगावरुन तो फिरवला. तिला फारच मजा येत असल्याचं आईला समजलं. लहानग्या मायझीला मग खेळण्यासाठी घोडाच लागायचा. खेळण्यातला नाही तरा खराखुरा. त्यामुळे आई मायझीला रोज तिच्या आजीकडे असलेल्या घोड्यांना भेटण्यास मायझीला घेवून जायची. तिथे मायझी घोड्यांसोबत खेळताना सर्व काही विसरुन जायची.

Image: theepochtimes

आधी घोड्याला बघणं, मग त्याच्या अंगावरुन हात फिरवणं या गोष्टीतून आनंद मिळ्वणाऱ्या मायझीला मग आजी ज्याप्रमाणे घोड्यांना ब्रशने आंघोळ घालते तशी आंघोळ घालावीशी वाटायची. आजी घोड्यांना कशी आंघोळ घालते हे मायझीने अनेकदा बघितलेलं असल्यानं मायझीला ते लगेच जमलं. नुसतं घोड्यांच्या अंगावरुन पाणी टाकणं तिला आवडायचं नाही. तिलाही ब्रशनं घोड्यांना खरारा करायचा असायचा. आत्ता मायझी दोन वर्षांची असली तरी तिला ब्रशनं घोड्यांचं अंग घासून त्यांना आंघोळ घालायला आवडतं.

हेही वाचा!

Image: theepochtimes

मायझीची आई स्वत: फार धाडसी आहे. त्यामुळे आपल्या मुलीनेही लहानपणापासून सर्व गोष्टींचा न घाबरता अनुभव घ्यावा असं तिला वाटतं आणि म्हणूनच मायझी खूप लहान असली तरी ती मायझीला घोड्यांसोबत बिनधास्तपणे खेळू देते. इतकंच नाही तर मायझी घोड्यावर बसून स्वत: घोडा चालवते या गोष्टीलाही मायझीच्या आईने प्रोत्साहनच दिलं. आज मायझी घोड्यावर बसते, घोडा चालवते. तब्येलातून स्वत: घोड्याला बाहेर आणते, पुन्हा तब्येलात नेवून सोडते. एवढशी मायझी हे सगळं कसं करते हे बघून इतर मुलांनाही मायझीसारखं घोड्यांसोबत खेळावंसं वाटू लागलं.

मोठ्या घोड्यांप्रमाणेच मायझी घोड्यांच्या पिल्लांसोबतही अतिशय प्रेमाने , त्यांची काळजी घेत खेळते. घोड्यांना आपल्यामुळे काहीही त्रास होवू नये याची काळजी मायझी घेत असते. मायझी जसं घोड्यांना, त्यांच्या भावनांना समजू शकते तसेच घोडेही मायझीला समजून घेतात. घोड्यांना मायझीचा स्पर्श कळतो, आवडतो आणि हवाहवासाही वाटतो. मायझीचं घोड्यांबद्दलचं आकर्षण, प्रेम, काळजी बघितली की मायझीला जणू घोड्यांची भाषा समजते, ती घोड्यांशी बोलू शकते असं तिच्या आईलाही वाटू लागलं आहे.  मियाझीच्या आईने घोड्यांशी बोलणारी मायझी अशी तिला उपमा दिली आहे.

घोड्यांवर प्रेम करणारी, घोड्यांचा सहवास आवडणरी आपली मुलगी इतर लहान मुलांपेक्षा खूप वेगळी आहे असं आता मायझीच्या आईला, आजीलाही वाटू लागलं आहे. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact