
Image: thebestcatpage
लाकडी घरं, आजूबाजूला दाट जंगल, वातावरणात शास्रीय संगीताचे सूर मिसळलेले. मोकळं खेळण्यासाठी भलं मोठं मैदान. जेवणासाठी एक खास कॅफे. तिथे दिवसातून तीन वेळा आवडीचं जेवण मिळण्याची सोय. हे वर्णन एखाद्या सहलीसाठीच्या छानशा ठिकाणाचं वाटतं ना? पण ही जागा माणसांसाठी नाही. ही खास जागा आहे, फक्त मांजरींसाठीची. ही जागा तुर्कस्तानातील सॅमसून नावाच्या प्रांतात आहे.
'केडी कसाबासी' हा तुर्कीश शब्द आहे. याला इंग्रजी भाषेत 'कॅट टाऊन' तर मराठीत 'मांजरींचं शहर' म्हणतात. संपूर्ण तुर्कस्तानात केडी कसाबासी हे ठिकाण खूप प्रसिध्द आहे. खास मांजरींसाठी उभारलेल्या या आरामदायी, मनोरंजक जागेबद्दल आता जगातल्या लोकांनाही खूप कुतुहल वाटत आहे.
हेही वाचा!
मांजरींचं हे शहर सॅमसून प्रांतात २० एकरच्या परिसरात वसलेलं आहे. मांजरींसाठीची ही खास जागा तेथील महानगरपालिकेने तयार केली आहे. या जागेची देखभालही महानगरपालिकाच करते. जंगलात भटकणाऱ्या, मोकळ्या जागेत खेळणाऱ्या, त्यांच्या खोलीत आरामशीर पहुडलेल्या, कॅफेमध्ये आपल्या आवडत्या पदार्थांवर ताव मारणाऱ्या या मांजरी बघितल्या की बघणाऱ्याला वाटतं, की या मांजरींसारखं आरामदायी आयुष्य असायला हवं. पण या आरामदायी जागेत येण्यापूर्वी या मांजरींनी खूप यातना सहन केलेल्या असतात. हे मांजरींचं शहर खास भटक्या, अनाथ मांजरींसाठीची सुरक्षित जागा आहे. इथे पहिल्यांदा आणलेल्या मांजरी एकतर जखमी तरी असतात नाहीतर भेदरलेल्या तरी. केडी कसाबासी या खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी त्यांना आणल्यानंतर सर्वात आधी या मांजरींवर उपचार केले जातात. मांजरी पूर्ण बऱ्या झाल्या की मग त्यांना त्यांच्यासाठीच्या या खास शहरात मोकळं सोडलं जातं. मांजरी मस्त जंगलात भटकून येतात. आल्हाददायक वातावरण, शहरी गोंगाटापासून लांब असलेली शांत जागा. यामुळे इथे आणल्यानंतर थोड्याच दिवसात मांजरी आनंदी आणि खेळकर होतात.
मांजरींसाठीच्या या खास शहरात इथे राहाणाऱ्या मांजरींची काळजी घेण्यासाठी डाॅक्टरांसह खास कर्मचारी वर्गाची नेमणूक केलेली आहे. इथे राहाणाऱ्या मांजरींच्या सर्व गरजा पुरवल्या जातील याची काळजी इथले कर्मचारी घेतात. मांजरींच्या या शहरात जखमी आणि आजारी मांजरींसाठी स्वतंत्र जागा केलेली आहे. या ठिकाणी या मांजरांवर डाॅक्टर उपचार करतात. आजारी, जखमी मांजरी या जागेत आराम करतात. बऱ्या होतात.आता सध्या या मांजरींच्या शहरात १५०पेक्षा जास्त मांजरी राहातात. मांजरींना राहाण्यासाठी लाकडी घरं आहेत. इथे मांजरी स्वतंत्रही राहातात आणि एकत्र राहाण्याचा अनुभवही घेतात. थंडीच्या दिवसात मांजरींना ऊब मिळण्यासाठी खास ऊबदार वातावरणाची सोयही केलेली आहे.

Image: thebestcatpage
हेही वाचा!

Image: ntv
मांजरींवर प्रेम करणारा तुर्कस्तान
तुर्कस्तान हा देश मांजरींवर प्रेम करणारा देश म्हणून ओळखला जातो. इस्तंबूल शहरात तर लाखो मांजरी राहातात. इस्तंबूल शहर म्हणजे 'मांजरींचं घर' म्हणून ओळखलं जातं. इथे मांजरींची एखाद्या राजासारखी काळजी घेतली जाते. मांजरींना खायला प्यायला देणं, त्यांना सुदृढ ठेवणे याला इथली माणसं फार महत्व देतात. इस्तंबूल शहरातील रस्त्यांवर मांजरी मुक्तपणे वावरतात. मांजरी म्हणजे इस्तंबूल शहराचा अविभाज्य भाग आहेत.
तुर्कस्तानात मांजरी आणि माणसाच्या घट्ट नात्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. जहाजातून अन्नधान्याची ने आण करताना जहाजातील अन्न धान्यं कीटक आणि उंदरांपासून सुरक्षित ठेवण्याचं मोठं काम जहाजावर असलेल्या मांजरी करत. ही जहाजं जेव्हा बंदरावर उभी राहात तेव्हा जहाजातील मांजरी शहरात जात. शहरात गेलेल्या अनेक मांजरी मग परत जहाजावर येत नसत. या मांजरी मग शहरातल्या माणसांसोबत मिसळून राहात. शहरातली माणसं या मांजरींना घरात ठेवत. या मांजरी बोटीप्रमाणेच माणसांच्या घरातही पुस्तकं आणि अन्न धान्याचं कीटक आणि उंदरांपासून संरक्षण करायच्या. मांजरींच्या या कामावर सर्वच लोक खूप खूश होते. म्हटलं तर इथल्या मांजरी कोणाच्या नाही आणि म्हटलं तर सर्वांच्याच. मांजरी इस्तंबूल शहराच्या प्रतीक झाल्या आहेत.
केडी कसाबासी या मांजरांच्या शहरात मांजरी छान रमलेल्या आहेत. त्या जंगलात भटकतात, मैदानात खेळतात, कॅट्स कॅफेमध्ये खातात पितात. तशा या मांजरी खूप आनंदी आहेत. पण या मांजरींना कोणी दत्तक घेतलं , या मांजरींना स्वत:च्या घरी घेवून गेलं तर या मांजरी आणखी खूश होतील असं केडी कसाबासी येथील मांजरींवर उपचार करणारे डाॅक्टर म्हणतात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact