छान दिसणारी फुलपाखरं विषारीही असतात हे माहिती आहे का?

Image: natura-pacific

फुलपाखरं दिसली की सर्वात आधी विचार येतो, तो त्यांना पकडण्याचा. आकर्षक रंगांची इवलीइवली फुलपाखरं आपल्याकडे असावीत असं वाटतं आणि बागेत दिसणाऱ्या फुलापाखरांमागे आपण पळत सुटतो. फुलपाखरं ही खूप नाजूक असतात. खरंतर वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, पक्षी, कोळी यांच्यापासून फुलपाखरांना धोका असतो. पण तरीही फुलपाखरं त्यांना असणाऱ्या या धोक्यापासून सहज वाचू शकतात. फुलपाखरं स्वत:चं संरक्षण करु शकतात. स्वत:ला इतर किटक, पक्षी यांच्यापासून वाचवण्याचे अस्त्र फुलपाखरांकडे असते. नाजूक साजूक दिसणाऱ्या, छान आकर्षक फुलपाखरांकडे अस्त्र ते कसं शक्य आहे? पण हे खरंच आहे. फुलपाखरांच्या हजारो प्रजाती आहेत. या प्रजातीतील अनेक फुलपाखरं ही विषारी असतात. तर अनेक प्रजातीतील फुलपाखरं नकला करण्यात फार पटाईत. ते विषारी नसले तरी ते विषारी फुलपाखरांची नक्कल करतात, तर कधी कधी झाडांच्या पानांचा, सालींचा रंग धारण करतात आणि स्वत:चा बचाव करु शकतात.

हेही वाचा! 

सुंदर फुलपाखरांकडे विष येतं तरी कुठून?

फुलपाखरं जेव्हा अळीच्या अवस्थेत असतात, तेव्हा या अळ्या स्वत:च्या शरीरात विष धारण करतात आणि अळीचं जेव्हा फुलपाखरु होतं, तेव्हा हे विष या फुलपाखरांमध्येही येतं.

फुलपाखरांमध्ये असलेलं विष हे मोठ्या शिकाऱ्यांना ठार करु शकत नाही. तेवढी काही त्या फुलपाखरंची आणि त्यांच्यातल्या विषारी घटकांची क्षमता नसते. पण आपल्याला खाल्लं तर तुमचं तोंड खराब होईल, आम्ही घाणेरड्या चवीचे आहोत , हा संदेश त्यांच्या शिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्या इतके फुलपाखरं आणि त्यांच्यातील विषारी घटक सक्षम असतात. सर्वच फुलपाखरं विषारी नसतात, पण फुलपाखरांच्या काही प्रजाती मात्र चांगल्याच विषारी असतात.

अनेक फुलपाखरं हे जेव्हा अळीच्या स्वरुपात असतात तेव्हा त्यांच्या शरीरात विष साठवायला सुरुवात करतात. या अळ्या विषारी वनस्पतींवर जगतात, मिल्कवीड सारख्या विषारी वनस्पतींवर पोषण झाल्यानं अळ्यांमध्ये त्या विषारी वनस्पतीमधील विष येतं आणि हेच विष अळ्यांचं फुलपाखरात रुपांतर होताना फुलपाखरात ही येतं. तर अनेक फुलपाखरं विषारी झाडांच्या फुलांमधू परागकण गोळा करतात, ते खातात त्यामुळे ती फुलपाखरं विषारी होतात.

Image: pling

जगातली विषारी फुलपाखरं


पॅपिलियो ॲण्टिमॅचस

हे फुलपाखरु 'जायण्ट आफ्रिकन स्वॅलोटेल' या नावानंही ओळखलं जातं. हे खरोखरं मोठं असतं. त्यांच्या पंखांचा विस्तार ७.१ आणि ९.८ इंच असतो. ही फुलपाखरं आफ्रिकेच्या वर्षावनात (रेनफाॅरेस्ट) आढळतात. या फुलपाखरांची अळी स्ट्रोफानथस ग्रेटस नावाच्याच्या विषारी वनस्पतीवर जगतात. या झाडाची फुलं खूप अतिशय सुंदर असतात. या झाडात ओवाबेन नावाचं विष असतं. हे विष फुलपाखरांच्या टोकदार सोंडेत असतं. हे विष हिप्पोपोटॅम्स सारख्या मोठ्या प्राण्यालाही आजारी पाडण्याइतकं जहरी असतं. या फुलपाखरांमध्ये जे विष असतं यामुळे त्यांचं केवळ संरक्षण होतं असं नाही तर या प्रजातीतील फुलपाखरांना सुंदर रंगही या विषारी घटकामुळेच प्राप्त होतो.

बर्डविंग बटरफ्लाय

पृथ्वीवर जी काही मोठी फुलपाखरं आहेत, त्यात बर्डविंग बटरफ्लायही येतात. ही फुलपाखरं आशिया, ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशियातील पर्जन्यवनात आढळतात. या फुलपाखरांच्या अळ्या पाइपवाइन आणि बर्थवर्ट सारख्या विषारी वनस्पतींवर वाढतात. अळ्या विष त्यांच्या मणक्यामध्ये साठवतात तर या अळीचं फुलपाखरु होतं तेव्हा हे विष फुलपाखरांच्या पाठीत असतं. या विषामुळे ही फुलपाखरं गडद रंगाची होतात. यामुळे त्यांची शिकार करु इच्छिणाऱ्या किटकांना- पक्ष्यांना हे फुलपाखरु विषारी आहे हे कळतं.

काॅमन इंडियन क्रो

आशिया, आस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत ही फुलपाखरं आढळतात. ओलेंडर, मिल्कवीड सारख्या विषारी वनस्पतींमधून या फुलपाखरांमध्ये विष येतं. या फुलपाखरांची शिकार करण्याचा प्रयत्न जर किटकांनी आणि पक्ष्यांनी केला तर ही फुलपाखरं अतिशय उग्र द्रव शरीरातून सोडतात, त्यामुळे शिकारी त्यांना सोडून दूर पळतात.

 अटाला बटरफ्लाय

ही फुलपाखरं छोटीशी असतात. नर फुलपाखरांचा पोटाकडील भाग एकदम लाल रंगाचा असतो. या फुलपाखरांच्या पंखांचा रंगही भडक असल्याने इतर किटकांना, पक्ष्यांना हे फुलपाखरं चवीला एकदम वाईट आहे, याची आगाऊ सूचनना मिळते आणि ते या फुलपाखरांच्या वाट्याला जात नाही.

क्वीन बटरफ्लाय

क्वीन बटरफ्लाय हे नावाप्रमाणेच मोठं आणि अतिशय देखणं फुलपाखरु आहे. नारिंगी-तपकिरी रंगांच्या पंखांवर पांढरे ठिपके असतात. आणि पखांच्या कडा काळ्या असतात, त्यामुळे या फुलपाखराचे पंख चमकदार दिसतात. ही फुलपाखरं उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. ती दलदलीत, जंगलाच्या कडेला किंवा अगदी वाळवंटातही आढळतात. विन आणि डाॅगबेन नावाच्या विषारी वनस्पतींवर या फुलपाखरांची अळी वाढल्याने ही फुलपाखरं विषारी असतात.

द पोस्टमन

पोस्टमन नावाचं हे फुलपाखरु परागकण गोळा करत नाही, तर खातं. या फुलपाखराची अळी पॅशनफ्लाॅवर नावाची विषारी वनस्पती खाते. पोस्टमनची नक्कल विषारी नसलेले फुलपाखरं करतात. या पोस्टमन फुलपाखरांसोबत तीही उडतात आणि शिकारी पक्षी आणि किटकांपासून स्वत:चं संरक्षण करुन घेतात. ही फुलपाखरं मध्य अमेरिकेत आणि दक्षिण ब्राझिलमध्ये आढळतात.

पाइपविन स्वॅलोटेल

चमकदार , तेजस्वी दिसणारी ही फुलपाखरं विषारी असतात. या फुलपाखरांचे पंख वरुन तर सुंदर दिसतातच पण त्यांच्या पंखाचा आतील भागही सुंदर दिसतो. पाइपविन ही विषारी वनस्पती असते. या फुलपाखरांची अळी या विषारी वनस्पतीवर पोट भरते , त्यामुळे ही फुलपाखरं विषारी होतात.

झेब्रा लाॅंगविंग

ही फुलपाखरं खूप जगतात आणि त्यांच्या पंखाचा विस्तारही मोठा असतो. ही फुलपाखरं विषारी फुलांमधील परागकण खातात तसेच या फुलपाखरांची अळी पॅशन फ्लाॅवर या विषारी वनस्पतीचं सेवन करते. त्यामुळे हे फुलपाखरु विषारी होतं. या फुलपाखरांच्या पंखांवर झेब्र्याप्रमाणे पट्टे असतात, म्हणून या फुलपाखरांना झ्रेब्रा लाॅॅंगविंग असं म्हणतात.

रेड लेसविंग

ही देखणी फुलपाखरं आशिया आणि आग्नेय आशियात आढळतात. या फुलपाखरांच्या पंखांचा रंग नारिंगी, काळा आणि पांढरा असतो. या फुलपाखरांच्या पंखाच्या वरील भागापेक्षा पंखांचा आतील भाग जास्त सुंदर असतो. या फुलपाखराची अळी पॅशनफ्लाॅवर या विषारी वनस्पतीवर वाढते. या फुलपाखराच्या मणक्यात विष असतं.

मोनार्च

ही फुलपाखरं त्यांच्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिध्द आहेत. शिवाय ही फुलपाखरं दूरवर स्थलांतर करतात आणि महत्त्वाचं म्हणजे विषारीही असतात. हे फुलपाखरं आपली अंडी मिल्कवीड या विषारी वनस्पतींवर घालतात. त्यामुळे त्यांच्या अळ्या या वनस्पतीवरच वाढतात. अळी या वनस्पतीतील विष शरीरात साठवते आणि अळीचं जेव्हा फुलपाखरु होतं, तेव्हा हे विष या फुलपाखराच्या पंखात आणि पोटाकडील भागात असतं.


काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact