पक्ष्यांनाही आवडतं गावाला जायला.उन्हाळ्यात कोणते पक्षी पाहुणे म्हणून येतात?

Image: mugdhasays

उन्हाळ्यात खाण्यापिण्याची, खेळण्या बागडण्याची जशी मजा असते तशीच मजा फिरण्याची देखील असते. कोणाला मामाच्या गावाला जायचं असतं, तर कोणाला आत्या- मावशीच्या. तर कोणाला कोणाच्या लग्नाला जायचं असतं तर कोणाला फिरण्यासाठी जायचं असतं . कोणत्याही कारणासाठी कुठेही फिरायचं म्हटल तरी फार मजा येते. फिरणं, प्रवास करणं, स्थलांतर करणं हे जसं माणसाला आवडतं, तसंच प्राणी पक्ष्यांनाही आवडतं. हिवाळ्यात आपल्याकडे परदेशातून खूप पक्षी येतात. हे स्थलांतरित पक्षी पाहाण्यासाठी लोकं गर्दी करतात. आपल्याला वाटतं पक्षी फक्त थंडीच्या काळातच पर्यटन/ स्थलांतर करतात. पण तसं नाही. भर उन्हाळ्यात देखील स्थलांतर करणारे, प्रवास करणारे पक्षी आहेत. काही पक्षी हे उन्हाळ्यात परदेशातून भारतात येतात, तर काही पक्षी देशातल्या देशातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात. हे स्थलांतरित पक्षी एरवी दिसत नाही. त्यामुळे त्यांना पाहणं, त्यांना समजून घेणं ही खूप मौज आणणारी गोष्ट असते.

हेही वाचा! 

उन्हाळ्यात स्थलांतर करणारे पक्षी

Image: indianbirds

रात ढोकरी

यांनाच रात बगळा असं म्हणतात. शास्त्रीय भाषेतलं यांचं नाव आहे ब्लॅक क्राउन्ड नाइट हेराॅन. हे पक्षी हिवाळ्यात दक्षिणेकडील देशात स्थलांतरित होतात, तर उन्हाळ्यात उत्तर गोलार्धातील देशात स्थलांतरित होतात. हे पक्षी दलदलीच्या ठिकाणी राहातात. उन्हाळ्यात हे पक्षी कोलकत्तातील प्राणी संग्राहलयात आढळतात. तिथे ते पिंजऱ्यात नसतात, तर प्राणी संग्राहालयातील इतर प्राण्यांसोबत मुक्तपणे वावरत असतात. तसेच काश्मीर आणि नेपाळातही आढळतात. रात ढोकरी या पक्षाची चोच चांगलीच मजबूत असते. नर आणि मादी रात ढोकरी दिसायला सारखेच असतात.

Image -ebird

नाकेर

या पक्ष्याला नकरे, नकटा किंवा नंदिमुखही म्हणतात. कोम्ब डक असं याचं इंग्रजी नाव आहे.नाकेर आकाराने बदकापेक्षा मोठा असतो. त्याचा रंग वरुन काळा व त्यावर हिरवी -निळी झाक असते. नर नाकेरच्या चोचीवर नाक असतं म्हणून या पक्ष्याला नाकेर असं म्हणतात. उन्हाळ्यात नाकेर पक्षी मादागास्कर वरुन भारतात येतात. हे पक्षी भारतात उत्तर आणि उत्तर पश्चिम भागात आढळतात. या काळात या पक्ष्यांना पाहायला जायचं असेल तर हरियाणा येथील चिलचिला हा वन्यजीव अभयारण्यात जायला हवं. या ठिकाणी या पक्ष्यांचं चांगलं निरीक्षण करता येतं.

वेडा राघू

निळे गाल असलेला हा पक्षी माशांसारखे किडे खातो म्हणून याला इंग्रजीमध्ये ब्ल्यू चिक्ड बी इटर्स असंही म्हणतात. वेडा राघू दिसायला अतिशय देखणा असतो. वेडा राघू हिरव्या रंगाचा असतो आणि त्याची शेपटी एका सरळ रेषेप्रमाणे असते. संध्याकाळच्या वेळी हे पक्षी मोठ्या थव्याने विजेच्या तारांवर ओळीने बसलेले असतात. भक्ष्य पकडण्यासाठी ते तारांवरुन उड्तात आणि भक्ष्य पकडल्यानंतर पुन्हा त्याच तारांवर येवून बसतात. परत परत त्याच जागी येत असल्याने या पक्ष्याला वेडा राघू असंही म्हणतात. वेडा राघू मुख्यत: मधमाशी, मुंग्या, चतुर हे कीटक हवेत सूर मारुन खातात. भक्ष्य खाण्यापूर्वी ते भक्ष्याच्या नांग्याइ काढतात. वेडा राघू धुलिस्नान करतात. हे पक्षी कधीकधी उडता उडता पाण्यात सूर मारुन आंघोळ करतात. हिवाळ्यात ते युरोपातील विविध भागात असतात आणि उन्हाळ्यात आशिया खंडातील विविध भागात येतात. उन्हाळ्यात गुजरातमधील थोल वन्यजीव अभयारण्यात या वेड्या राघूला नीट न्याहाळता येतं.

mage: observation

हेही वाचा! 

Image: en.wikipedia

हळद्या

युरेशियन गोल्डन ओरिओल म्हणजे हळद्या. दिसायला अतिशय आकर्षक असलेला हा पक्षी उत्तर भारतातुन मध्य आशियात आणि मध्य आशियातून भारतातील दक्षिणेकडील राज्यात स्थलांतर करतात. हे स्थलांतर प्रामुख्याने प्रजननासाठी, अंडी घालण्यासाठी असतं. नर हळद्या आणि मादी हळद्यामध्ये थोडा फरक असतो. नर हळद्या पिवळ्या जर्द रंगाचा असून त्याच्या पंखांचा रंग काळा असतो. तसेच त्याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगची पट्टी असते. मादी हळद्या नरासारखीच दिसते पण किंचित फिक्या पिवळ्या हिरव्या रंगाची असते. झाडावर एकट्याने किंवा जोडीने हे पक्षी बसलेले असतात. झाडांच्या फांद्यावर जरी हे बसलेले असले तरी हळद्या सहजासहजी दिसत नाही. आवाजावरुन त्याच्या अस्तित्त्वाची माहिती मिळते. फुलांमधील मध, विविध फळं आणि लहान किडे हेच हळद्याचं मुख्य खाद्य असतं. हळद्या बघण्यासाठी उन्हाळ्याच्या काळात तामिळनाडू येथील वेदांतहंगल पक्षी अभयारण्यात जावं, तिथे हे पिवळ्या रंगाचे आकर्षक पक्षी बघण्याचा आनंद घेता येईल.

Image: mugdhasays

आशियाई कोकिळ

गोड आवाजाचा कोकिळ हा ऐकून सगळ्यांनाच माहीत असतो. पण तो सहजासहजी नजरेस मात्र पडत नाही. साधारणपणे कावळ्याएवढ्या आकारमानाचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नर कोकिळचा रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे असून मादीचा रंग गडद तपकिरी असतो. कोकिळ पक्षी झाडावरच राहाणारा असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहातो. हे पक्षी आपले घरटे बांधत नाहीत. तसेच ते आपल्या पिलांची देखभाल करत नाहीत. अंडी उबवणे, पिलांना खाऊ पिऊ घालणे ही कामं कोकिळ ज्या घरट्यात अंडी घालते, त्या घरट्यातले पक्षी करतात. आशियाई कोकिळ हे प्रजाती उन्हाळ्याच्या काळात आग्नेय आशियातील विविध भागात स्थलांतर करतात. या पक्ष्यांना नीट न्हाहाळायचं असेल तर पाॅंडेचेरी हे उत्तम ठिकाण आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact