तणमोर नाचत नाही तर टणाटणा उड्या मारतो. ते का?

Image: wikiwand

नाचणारा मोर आपण सगळ्यांनीच प्रत्यक्षात किंवा व्हिडीओत पाहिलेला आहे. पण जागच्या जागी उड्या मारणारा मोर तुम्हाला माहीत आहे का? या विशिष्ट पक्ष्याला तणमोर असं म्हणतात. तणमोराला इंग्रजीत 'लेसर फ्लोरिकन' असं म्हणतात.

तणमोर हे एकटे राहाणारे आणि लाजाळू असतात. तणमोराचे नर आणि मादी दिसायला बऱ्यापैकी सारखेच दिसत असले तरी त्यांच्यातला फरक सहज ओळखता येतो. नर तणमोर हे मादी तणमोराच्या तुलनेत छोटे, वजनाने हलके, पांढऱ्या आणि काळ्या रंगांच्या पिसांनी चमकदार दिसतात. नर तणमोराला वर्षाच्या काही काळ डोक्यावर पिसांचा एक छानसा तुरा येतो. वर्षातील काही काळ नराचा रंग बदलतो. त्याच्या मानेचा आणि पोटाचा रंग काळा होतो. मादी तणमोराच्या तुलनेत नर तणमोर फारच आकर्षक दिसतात. 

हेही वाचा!

राजस्थानातील अजमेर, भिलवाडा, टोंक, पाली आणि प्रतापगड या जिल्ह्यांमध्ये, गुजरातच्या भावनगर , अमरेली, सुरेंद्रनगर, कच्छ या जिल्ह्यांमध्ये, मध्य प्रदेशच्या रतलाम, धार आणि झाबुआ जिल्ह्यांमध्ये, आंध्र प्रदेशात कुर्नुल जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या अकोला, वाशिम, चंद्रपूर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तणमोर आढळतात.  टोळ, किडे, मुंग्या अळ्या, बिया, झाडांचे कोवळे कोंब खायला तणमोराला फार आवडतं.  दाट झुडुपांमध्ये ते आराम करतात. तणमोराला खुल्या गवताळ भूभागावर राहायला आवडतं. विणीचा हंगाम सोडला तर इतरवेळी ते वृक्षाच्छादित जमिनीवरही आढळतात. विणीच्या हंगामात तणमोर कापूस, बाजरी, तृणधान्य, सोयाबिन, भूईमूग, ज्वारी, मका, ऊस, मोहरी आणि गव्हाच्या शेतात राहातात

Image: timesofindia

तणमोराच्या वैशिष्ट्यपूर्ण उड्या .

विणीच्या हंगामात नर तणमोर विशिष्ट हालचाल करतात. एका जागेवर  उभं राहून पाय वाकवून तणमोर उड्या मारतो.

तो २ ते३ मीटर उंचीपर्यंत उड्या मारतो. प्रत्येक ५० सेकंदानंतर एक अशा टणाटणा उड्या मारतात.  तणमोर अशा दिवसाला ५०० ते ६०० उड्या मारतो. या उड्यांमुळेच तणमोराला त्याची अशी वेगळी ओळख मिळाली आहे. 

आपली हद्द सांगण्यासाठी, आपल्या प्रतिस्पर्धी नर तणमोराला दूर करण्यासाठी आणि मादी तणमोराला आकर्षित करण्यासाठी नर तणमोर उड्या मारतो. 

तणमोराची मादी उघड्या जमिनीवर ४ ते ५ अंडी घालते. या अंड्यांमधून २१ दिवसांमध्ये पिले बाहेर येतात. तणमोराचे घरटे अगदीच उघड्या जमिनीवर असल्यामुळे त्याच्या अंड्यांना, पिलांना सतत धोका असतो. तणमोराची अंडी पळवली जाणं, पिलं पळवणं, तणमोराचीच शिकार होणं, तणमोरांचा अधिवास झपाट्याने नष्ट होणं, भटक्या कुत्र्यांचे हल्ले यामुळे तणमोरांची संख्या झपाट्याने घसरत आहे. २००० साली भारतामध्ये ३६०० तणमोर होते असं सांगितलं जातं. पण जुलै २०१८ मध्ये झालेल्या अभ्यासात भारतात चार राज्यांमध्ये केवळ २६४ तणमोर शिल्लक राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात २०१७ मध्ये केवळ १००० तणमोर होते.

तणमोर १२ ते १३ वर्षं जगतात. पर्यावरण आणि त्यांना मिळणारा आहार यावर त्यांचं आयुष्य अवलंबून असतं. पूर्वी पोस्टाच्या तिकिटांवर या वैशिष्ट्यपूर्ण तणमोराचे चित्र होते. निसर्गावर, प्राणी -पक्ष्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या कोणालाही तणमोराला एखाद्या चित्रात पाहाण्याऐवजी प्रत्यक्ष निसर्गात पाहायला आवडेल. उड्या मारताना दिसला तर भारीच!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact