पेपरच्या दिवशीच किंवा अगदी पेपर लिहिताना भीती वाटली तर काय करायचं?

Image: timesnownews

परीक्षा जसजशी जवळ यायला लागते तशी अनेकांच्या मनातली भीती वाढायला लागते. मनावरचा ताण वाढायला लागतो.  अनेकजण म्हणतात की परीक्षेसाठी थोडासा ताण येणं आवश्यकच असतं. पण खरं तर ताण हा थोडा असो किंवा जास्त त्याचा वाईट परिणाम परीक्षेच्या कामगिरीवर होतो. केवळ भीतीमुळे मुलांना पेपर लिहिता आला नाही अशी उदाहरणं खूप आहेत. एकदा का मनातली भीती गेली की पेपर सोडवताना जे येत नव्हतं ते आठवायला लागतं. आता आठवून काय उपयोग, पेपर लिहिताना काय झालं होतं आठवायला? असं प्रश्न पडून स्वत:वरच चिडचिड व्हायला लागते. प्रत्यक्ष पेपर लिहिताना आठवलं नाही कारण मनात भीती होती. भीतीमुळे हे असं होणारच. त्यावरचा सोपा उपाय म्हणजे मनात भीती येवूच द्यायची नाही. आणि ती समजा आलीच तर ती पटकन घालवण्यासाठी उपाय करावेत. मनातल्या भीतीवरचे उपाय आपल्याला स्वत:लाच करावे लागणार आहेत आणि ते करणं सोपंही आहे.

परीक्षेच्या वेळेस वाटणारी भीती जावी म्हणून काय करावं?

परीक्षेच्या आधी आपण थोड्याच वेळात खूप काही करण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करतो. घाईघाईत करत असलेल्या रिव्हिजनमुळे अभ्यास लक्षात राहण्याऐवजी मनात भीती निर्माण होते. हे टाळण्यासाठी रिव्हिजन करताना वाचण्याचा/ अवलोकन करण्याचा वेग कमी करावा. एकामागोमाग वाचत सुटण्यापेक्षा शांतपणे वाचायला सुरुवात करावी.

जेव्हा केव्हा परीक्षेच्या विचाराने भीती वाटायला लागते तेव्हा आपला श्वास थोडा मंद/ हळू करावा. मुद्दाम खोलवर श्वास घेण्यास सुरुवात करावी. ३० सेकंद श्वास आत घ्यावा आणि त्यापेक्षा जास्त वेळ घेवून तो बाहेर सोडावा. श्वासाच्या या सोप्या व्यायामाने मनातली भीती लगेच कमी होते.

भीती वाटते तेव्हा आपण कसं बसलेलो आहोत, आपल्या शरीरात काय होतंय याकडे लक्ष द्यावं. बसण्याची स्थिती बदलून पाहावी. खांदे सैल सोडावेत, मुद्दाम हात ताणावेत. अशा प्रकारे शरीराची स्थिती बदलूनही मनातला ताण कमी होतो.

 प्रत्यक्ष पेपर लिहिताना भीती वाटू लागल्यास डोळे मिटून शांत बसावं. खोल श्वास घ्यावा. हे काही मिनिटं केल्यास मन शांत व्हायला, भीती कमी व्हायला मदत होते.

पेपर लिहिताना भीती वाटू नये म्हणून सारखं घड्याळीकडे लक्ष असू द्यावा. आपल्या हातात किती वेळ उरला आपल्याला किती प्रश्न अजून सोडवायचे आहेत याचा अंदाज घेवून पेपर सोडवण्याचं फेरनियोजन करायला मदत होते. वेळ पुरला नाही आणि पेपर अपूर्ण राहिला तर या विचाराने निर्माण होणारी भीती या उपायाने कमी होते.

हेही वाचा!

एखाद्या प्रश्नाचं उत्तर नीट लिहिता येत नसेल, एखाद्या प्रश्नाबद्दल जरा कमी आत्मविश्वास असेल तर लगेच घाबरुन जावू नये. आपल्याला जितकं येतंय , माहिती आहे ते आठवून लिहित राहावं. यामुले आपल्या स्मरणशक्तीवर आवश्यक तो ताण पडून कठीण वाटणारे प्रश्नही सोडवता यायला लागतात.

लक्ष कमी असलं तरी मनात भीती निर्माण होते. आजूबाजूला काय चाललंय, कोण काय करतंय याकडे न बघता आपल्या पेपरवर मन एकाग्र करावं.

जेव्हा आपल्या मनात 'मला हे जमणार नाही!', 'मला पेपर नीट सोडवता येणार नाही!', 'मला मार्क्स कमीच पडतील!' असे विचार आले की मनात भीती येणारच. अशा भीतीपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करायला सुरुवात करावी. ' मला उत्तरं नीट लिहायला जमणार आहे!', 'मी शांत आहे आणि माझं पूर्ण लक्ष पेपरकडे आणि उत्तरं लिहिण्यावर आहे!', 'माझी परीक्षेची तयारी उत्तम झाली आहे!' 'परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्याची माझी क्षमता आहे!', 'अवघड प्रश्नही मी सहज सोडवू शकेल!' ' मी माझ्यापरीने पेपर चांगला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.!' असे स्वत:चा आत्मविश्वास वाढवणारी वाक्यं मनात आणली, मनातल्या मनात उच्चारली तर परीक्षेच्या दिवशी किंवा पेपर लिहिताना मनात भीती निर्माण होणार नाही.

Image: apeejay.news

येत असलेलंही विसरायला लावणारी भीती डेंजर असली तरी ती घालवण्याचे उपाय अगदीच सोपे आहेत. करुन पाहा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact