हातात अभ्यासाचं पुस्तकं धरलं की झोप यायला लागते. हे असं का होतं?

Image: freepik

नेमकं अभ्यासाला बसल्यावरच कंटाळा का येतो? एरवी झोप येत नाही पण हातात पुस्तक धरलं की झोप यायला लागते ती का? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? टी.व्ही पाहताना, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना, खेळताना, टाइमपास करताना आपल्याला जराही कंटाळा येत नाही. पण अभ्यास करतानाच आपल्यातली एनर्जी कुठे जाते हे मात्र कळत नाही. हे फक्त आपल्याच बाबतीत होतं असं नाही. ही गोष्ट खूप जणांच्या बाबतीत घडते. अभ्यास करताना झोप येण्यामागे मुख्यत: दोन कारणं असतात असं तज्ज्ञ सांगतात. एक म्हणजे आपल्याला अभ्यास करण्यात मुळी इंटरेस्टच नसेल, अभ्यास करण्याची आवडच नसेल तर आणि दुसरं कारण म्हणजे एका वेळी एका ठिकाणी बसून खूप वेळ अभ्यास केला तर अभ्यास करताना झोप येते. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, अभ्यास करण्याची चुकीची पध्दत या गोष्टीही अभ्यास करताना झोप येण्यास कारणीभूत ठरतात. या प्रत्येक गोष्टीत बदल घडवल्यास अभ्यास करताना छान ताजं तवानं वाटेल आणि झोप येणार नाही. पण त्यासाठी नेमकं काय करायला हवं?

हेही वाचा!

अभ्यास करताना झोप येवू नये म्हणून...

आपण काय खातो त्याचा आपल्या अभ्यासावर आणि आपण करत असलेल्या कामावर परिणाम होतो. तेलकट, तूपकट पदार्थ अती प्रमाणात खावू नये. दिवसातून एकदा तरी एखादं फळ खावं. जेवताना दोन्ही वेळेस आई आपल्या ताटात जी भाजी वाढेल ती आनंदाने खावी. भाज्या-फळं यातून आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषणमुल्यं आणि खनिजं मिळतात. हे घटक आपल्याला अभ्यास करताना ताजेतवाने ठेवतात. पण आपण हे पौष्टिक पदार्थ खायचे सोडून जंक फूडस, फास्ट फूडा खात असू तर शरीरातले अनावश्यक फॅट्स वाढतात. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला अभ्यासाच्या वेळेस, महत्त्वाची कामं करताना आळस येतो, उत्साही वाटत नाही. झोपावंसं वाटतं.

अभ्यासाच्या वेळेस झोप येणे ही बाब आपण रात्री किती वेळ झोपतो यावरही अवलंबून असते. रात्री आपण टी.व्ही/ मोबाइल या कारणांनी उशीरा झोपत असलो आणि सकाळी शाळेसाठी लवकर उठत असलो तर आपली झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम म्हणजे अभ्यास करताना झोप येते. त्यामुळे रात्री लवकर झोपून पुरेशी झोप घेणे हाच त्यावरचा उपाय. आपण ६ तासांपेक्षा कमी झोपलो तर आपली झोप पूर्ण होत नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांनी ६ ते ८ तास झोपणं आवश्यक असतं.

अनेकांना शाळेतून दुपारी घरी आल्यावर जेवण करुन झोपायची सवय असते. एकदा झोपले की २-३ तास उठतच नाही. अशी झोप नंतर अभ्यासावर परिणाम करते. दुपारी झोपण्याची सवय असल्यास झोपावं पण ही झोप एक तासापेक्ष जास्त असू नये असं तज्ज्ञ म्हणतात. त्यापेक्षा जास्त झोपल्यास आळस येतो आणि अभ्यास करतानाही झोप येते. फ्रेश वाटत नाही.

दिवसभर पुरेसं पाणी प्यावं. अभ्यास करतानाही पाण्याची बाटली आपल्याजवळ भरुन ठेवावी. पुरेसं पाणी प्यायल्यास शरीरात ओलावा राहातो. त्यामुळे शरीराची ऊर्जाही वाढते. अभ्यासाला बसल्यावर झोप येत असल्यास थोडं थोडं पाणी प्यावं.

एका जागी तासनतास बसून अभ्यास करण्याऐवजी थोड्यावेळ उभ्याने किंवा हातात पुस्तक घेवून खोलीत फिरता फिरता अभ्यास करावा. यामुळे एका जागी बसून आलेला कंटाळा निघून जातो आणि उत्साही वाटतं. फारच झोप येत असेल तर सरळ हातातलं पुस्तक बाजूला ठेवावं, खोलीतून बाहेर पडावं. घराच्या बाहेर पडून ५ मिनिटं पायी फिरुन यावं. चालण्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. शरीरात सर्वत्र सुरळीत रक्तप्रवाह होतो. यामुळे शरीरातला उत्साह वाढतो. पुन्हा अभ्यासाला बसल्यावर छान वाटतं.

अभ्यास करताना एक सलग न करता मधे मधे छोटे ब्रेक घ्यावे. ब्रेकमुळे अभ्यासात अडथळा येत नाही. उलट अभ्यास करण्याची क्षमता वाढते. सलग तासनतास अभ्यास केला तर आपला मेंदू थकतो, शिणतो आणि त्यामुळे झोप येते. पण दर ४० मिनिटांनी  ५-१० मिनिटांचा ब्रेक घेतला तर शरीर आणि मनाला उत्साही वाटतं. पुन्हा अभ्यासाला बसल्यावर कंटाळा येत नाही.

Image: freepik

हेही वाचा!

बऱ्याचदा पुस्तक वाचताना झोप येते. याचा अर्थ आपल्या मेंदूला वाचण्यापेक्षा आणखी गुंतवून ठेवणारी प्रभावी कृती हवी असते. त्यामुळे ती कृती करावी. ती कृती म्हणजे लिहिणे. धडा वाचताना झोप यायला लागली की आपण वाचत असलेल्या धड्याच्या नोट्स काढाव्यात, त्या लिहाव्यात. लिहिताना मेंदू जास्त गुंतून राहातो आणि आलेली झोप पळून जाते.

अनेकांना गादीवर झोपून, लोळून अभ्यास करण्याची सवय असते. पण ही सवय मन लावून अभ्यास करण्याला पोषक नसते. झोपून अभ्यास करताना आपलं अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. टेबल -खुर्चीवर आणि तेही ताठ बसून हीच अभ्यास करण्याची योग्य पध्दत असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

तासनतास एकाच विषयाचा, एकाच टाॅपिकचा अभ्यास केला तर झोप येणारच. त्यामुळे सगल एका विषयाचा अभ्यास न करता टाॅपिक आणि विषय बदलून अभ्यास करावा.

मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र अभ्यास केल्यानेही छान उत्साही वाटतं. मित्र मैत्रिणींसोबत अभ्यास करताना मधून मधून त्यांच्याशी अभ्यासाच्या विषयावर बोलणं होतं. त्यामुळे एकत्र अभ्यास करताना अभ्यास करण्याची मजाही वाटते आणि चांगला अभ्यास होतो.

शाळा, क्लास, अभ्यास असं आपलं कितीही बिझी शेड्यूल असलं तरी शाळेत जाणाऱ्या मुलांनी न चुकता रोज किमान २० मिनिटं तरी व्यायाम करायला हवा. पळणे, चालणे, दोरीच्या उड्या मारणे, योग करणे यापैकी कोणताही व्यायाम केल्यास त्याचा फायदा शरीर आणि मनाला मिळतो आणि अभ्यास करताना छान उत्साही वाटतं. 

अभ्यास करताना झोप येवू नये यासाठीचे हे उपाय आहेत. तज्ज्ञांनी सांगितलेले. हे उपाय तुम्हीही करुन पाहा आणि तुमचा अनुभव काय आहे, अभ्यास करताना कंटाळा आल्यावर तुम्ही काय करता याबद्दल ऊर्जालाही नक्की लिहून पाठवा.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact