तासनतास बसूनही अभ्यास होत नाही. अभ्यासात लक्षच लागत नसेल तर?

Image: freepik

वर्षभर कितीही चांगला अभ्यास केला तरी परीक्षेच्या वेळेस आपण जो अभ्यास करतो त्याला महत्व असतंच. परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे विशिष्ट पेपरचा अभ्यास करावा लागतो. दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करायचा असतो. पण एका विषयाला धरुन अभ्यास करणे ही सोपी गोष्ट नाही. कारण अभ्यास करताना अभ्यासातलं लक्ष सारखं उडून जातं. आपण जो अभ्यास करतोय त्यावर फोकसच करता येत नाही. त्यामुळे एकाच विषयाचा अभ्यास करायचा असूनही दिवस संपत येतो तरी अभ्यास होत नाही. याचं एकमेव कारण अभ्यास करताना लक्ष न लागणं हेच असतं. परीक्षेचा अभ्यास करताना लक्ष केंद्रित करणं अतिशय आवश्यक असतं. आपलं लक्ष विचलित करणारी अनेक कारणं आजूबाजूला असली तरी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे काही सोपे उपायही आहेत.

अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करावं?

आपलं अभ्यासातलं लक्ष उडवण्याचं काम करतो तो मोबाइल. मोबाइलमुळे अभ्यास करताना मन लागत नाही.मोबाइल हाताळता हाताळता अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ वाया जातोय हे देखील लक्षात येत नाही. हे टाळायचं असेल तर मोबाइल आपल्यापासून दूर ठेवावा.  अशा जागी ठेवावा जो वाजला तर घ्यायला उठून चालत जावं लागेल. इतक्या अंतरावर मोबाइल ठेवला तर मोबाइलकडे लक्ष जात नाही. तो हाताळावासाही वाटत नाही.

समजा अभ्यास करताना अभ्यासाचे ऑनलाइन व्हिडीओ पाहाण्यासाठी मोबाइल जवळ हवा असेल तर मोबाइल सायलेंट मोडवर ठेवावा, म्हणजे मोबाइल वाजल्यावर सारखं लक्ष त्याकडे जाणार नाही.

अभ्यास करता करता आपण घरातल्यांशी गप्पा मारत असू तर मग अभ्यासातलं लक्ष विचलित होतं. त्यामुळे घरात जिथे माणसं एकमेकांशी बोलतात, त्याठिकाणी अभ्यासाला न बसता दुसऱ्या खोलीत किंवा घरातल्यांच्या बोलण्याचा आवाज कानावर पडणार नाही अशा ठिकाणी अभ्यास करण्यासाठी बसावं.

हेही वाचा!

आपण अभ्यासाला बसतो ती जागा अस्तव्यस्त असेल तर अभ्यासात मन लागत नाही. पुस्तक एकीकडे, आपण काढलेल्या नोट्स दुसरीकडे आणि शाळेतल्या वह्या भलतीकडेच.. अशी जर आपल्या अभ्यासाच्या साहित्याची स्थिती असेल तर या साहित्याची जमवाजमव करण्यातच खूप वेळ जातो. त्यामुळे आपण जिथे अभ्यासाला बसणार आहे ती जागा व्यवस्थित आवरलेली, नीटनेटकी असावी. यामुळे शोधाशोध करण्यात वेळ वाया जात नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित होतं आणि नीटनेटक्या जागेत अभ्यासाला बसल्यास मनात सकारात्मक (पाॅझिटिव्ह) विचार येतात.

खूप वेळ बसून अभ्यास केला तरी अभ्यासातलं लक्ष उडतं. आपण काय वाचत होतो हे देखील लक्षात येत नाही. असं होवू नये म्हणून अभ्यास करताना मध्येमध्ये ब्रेक घ्यावा. ब्रेक घेतल्याने आपण जो अभ्यास केलेला असतो तो व्यवस्थित आठवण्यासाठी मदत होते. एकच गोष्ट सारखी सारखी वाचत राहिली तरी आपला मेंदू थकतो. मेंदू थकल्याने मेंदूची लक्ष केंद्रित करण्याची, विचार करण्याची क्षमता संपते.

एकाच विषयाचा अभ्यास करताना वाचणं, लिहिणं, नोट्स काढणं असं वैविध्य आणल्यास अभ्यासातली आवड टिकून राहाते , अभ्यासात लक्ष लागतं आणि अभ्यास करताना मज्जाही येते.

Image: k8school

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact