कितीही अभ्यास केला तरी तो लक्षातच राहात नाही. मी काय करु?

Image: freepik

तासनतास एका जागी बसून अभ्यास केला म्हणजे परीक्षेत चांगले मार्क्स मिळतात असं नाही. जेव्हा केलेला अभ्यास आपला चांगला लक्षात राहातो तेव्हा रिझल्ट चांगला लागतो. पण अनेकजणांच्या बाबतीत असं होतं की केलेला अभ्यास लक्षातच राहात नाही. लक्षात न राहणे हा मोठा प्रश्न वाटत असला तरी काही सोप्या गोष्टी केल्या तरी आपली स्मरणशक्ती वाढू शकते अणि आपण जो अभ्यास करु तो परीक्षा होईपर्यंत दीर्घकाळ लक्षात राहू शकतो. केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी काय करायला हवं? हा अनेक मुला-मुलींचा प्रश्न असतो. त्याचं सोपं उत्तर म्हणजे अभ्यास करताना सोप्या टेक्निक्स वापरणे. कुठलाही अवघड विषयचा अवघड प्रश्न असू दे तो सोडवण्यासाठी योग्य टेक्निक्स वापरल्यास कमी श्रमात चांगला परिणाम दिसून येतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी जर सोप्या आणि सहज टेक्निक्स वापरल्या तर आता केलेला अभ्यास परीक्षेपर्यंत कसा लक्षात ठेवायचा असा प्रश्नच  पडणार नाही. टेक्निक्स वापरुन अवघड गोष्टी लवकर समजतात आणि त्या दीर्घकाळ लक्षात राहतात.

हेही वाचा! 

अवघड गोष्टी लक्षात ठेवण्यासाठीचे सोपे टेक्निक्स

माइंड मॅपिंग हे स्मरणशक्ती सुधारण्याचं आणि अवघड विषयांचा अभ्यासही लक्षात ठेवण्याचं हे एक सोप्पं आणि फायदेशीर तंत्र आहे. यात दृश्य गोष्टी म्हणजेच व्हिज्युअल आणि आपल्याला जे लक्षात ठेवायचे आहे त्या माहितीचे तुकडे केले जातात आणि त्याचा संबंध व्हिज्युअलशी जोडला जातो. शब्द आणि दृश्य गोष्टी यांच्या एकत्रित संबंधाचा फायदा म्हणजे आपल्याल अभ्यासातल्या अवघड गोष्टीही सहज लक्षात राहतात. माइंड मॅपिंगसाठी एक कोरा कागद घ्याव आणि त्यावर आपल्याला जे लक्षात ठेवायचं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे . हे तुकडे आपण ट्री डायग्राम काढतो तसे एकमेकांना जोडायचे. यात मुख्य मुद्दा, त्याचे उपमुद्दे आणि उपमुद्द्यांचेही छोटे छोटे मुद्दे करुन आपला आपण एक नकाशा करावा.  या माइंड मॅपिंगद्वारे एखाद्या अवघड विषयाचा अभ्यास केला जातो , तेव्हा तो पुन्हा लक्षात आणताना आपल्या डोळ्यासमोर आपण तयार केलेला ट्री ड्रायग्राम उभा राहातो. यापद्धतीने सर्व मुद्दे नीट लक्षात राहतात. इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयातील अवघड मुद्यांची सविस्तर माहिती आपण माइंड मॅपिंगद्वारे दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतो. माइंड मॅपिंगचा उपयोग रोज अभ्यास करताना केल्यास आपली स्मरणशक्ती १० टक्क्यांनी वाढते असं तज्ज्ञ सांगतात.

Image: freepik

नेमोनिक्स हे स्मरणशक्ती वाढवण्याचं आणखी एक तंत्र आहे. एखादी अवघड गोष्ट दीर्घ काळ लक्षात ठेवण्यासाठी नेमोनिक्स ही पध्दत योग्य मानली जाते. या तंत्राने छोट्या स्वरुपात मोठी आणि अवघड माहिती लक्षात ठेवता येते. नेमोनिक्स मध्ये लक्षात ठेवण्यासाठी यमक, गाणी, अवघड शब्दांचं लघुरुप तयार करणं या शब्दाशी निगडित तंत्राचा उपयोग केला जतो. इंद्रधनुष्यातील रंग त्याच क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी 'व्हीआयबीजीवायओआर' असा विशिष्ट शब्द वापरतात. या शब्दामुळे इंद्रधनुष्याचे रंग आणि त्यांचा क्रम या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणे सोपे जाते. कोणत्या महिन्यात किती दिवस हे लक्षात ठेवण्यासाठी आपण हाताची मूठ करतो आणि बोटांचे सांधे म्हणजे उंचवटे आणि खळगी यांचा वापर करुन महिन्यांचे दिवस लक्षात ठेवतो. या अशा पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवण्याच्या तंत्राला नेमोनिक्स तंत्र असं म्हणतात.

एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला दृश्य स्वरुपात दाखवली जाते तेव्हा ती पटकन आणि दीर्घकाळ लक्षात राहाते. त्यामुळे अभ्यास करताना त्या त्या विषयाचा जो भाग अवघड वाटतो तो आकृती, चित्रं, तक्ता यांच्या सहाय्याने लक्षात ठेवता येतो. तसेच आपण अवघड माहितीतील महत्त्वाच्या गोष्टी किंवा अभ्यासातल्या अवघड गोष्टी जर हायलाइट केल्या तर अभ्यास करताना ते कायमच नजरेत भरतात आणि त्या दीर्घकाळ लक्षात राहतात.

हेही वाचा!

Image: freepik

विषय अवघड असो की सोपा, त्याच्या नोट्स काढण्याची सवय लावावी. पुस्तकातलं जसंच्या तसं उतरवणं म्हणजे नोटस काढणं नव्हे. तर संपूर्ण धडा, प्रकरण नीट वाचून तो समजून घेणं आणि आपल्याला काय समजलं आहे ते आपल्या मनानं लिहून काढणं ही नोट्स काढण्याची उत्तम पध्दत मानली जाते. तर धड्यातला जो भाग अवघड वाटतो तो कमीत कमी शब्दात लिहिणे, अवघड माहितीतील महत्त्वाचे मुद्दे काढणे याप्रकारेही नोट्स काढल्या जातात. धड्यातले अवघड मुद्दे स्वतंत्र लिहिणे, धड्यातील संकल्पना, व्याख्या लिहिणे या स्वरुपात नोट्स काढू शकतो. किंवा संपूर्ण धड्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहिणं हे देखील नोट्स काढणंच होय. या नोट्स जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्याशी निगडित इतर माहितीही मेंदू आठवायला लागतो. नोट्स काढण्याच्या सवयीनेही आपली स्मरणशक्ती वाढते.

तासनतास एका जागी बसून अवघड गोष्टींचा अभ्यास केला तर तो लक्षात राहात नाही. त्यापेक्षा थोडा थोडा करुन अवघड गोष्टींचा अभ्यास करावा. अभ्यास करताना मधे मधे ब्रेक घेवून अभ्यासातल्या एक एक अवघड गोष्टींचा अभ्यास केल्यास त्या लक्षात राहतात.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact