खारीपेक्षा तिप्पट असलेले शेकरु असते खादाड,भित्रं आणि लाजरंही!

Image: pugdundeesafaris

पानगळी रानांपासून ते सदाहरीत अरण्यांपर्यंत अनेक प्रकारच्या जंगलांनी आपल्या महाराष्ट्राला समृध्द केलं आहे. या सगळ्या जंगलातील वन्य जिवांमधून महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून कोणाची निवड करायची? या अवघड प्रश्नाचं उत्तर मिळालं ते पुण्याजवळच्या भीमाशंकरच्या अभयारण्यात. या जंगलाची शान म्हणजे इथे आढळणाऱ्या जायंट स्क्विरल्स अर्थात शेकरु. तशा अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून ते केरळच्या जंगलापर्यंत भारतात शेकरुच्या एकूण सात उपप्रजाती आढळतात. पण भीमाशंकर येथे आढळणारे शेकरु मात्र फक्त भीमाशंकरच्या रानातच आढळतात. 'भीमाशंकरी' अशी त्यांची वेगळी उप जात नोंदण्यात आली आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच सापडणारा प्राणी म्हणून या भीमाशंकरी शेकरुची निवड राज्यप्राणी म्हणून झाली. शेकरुंना इंग्रजीमध्ये जायंट स्क्विरल्स म्हणतात ते अगदीच योग्य आहे. कारण आपण नेहमी बघतो त्या खारुताईंपेक्षा शेकरुचा आकार तिप्पट मोठा असतो. शेकरु  ४० इंच लांबीचं असून त्याची शेपूट दोन फूट लांब असते. शेकरुच्या अंगावर असलेले मऊ केसात लाल,विटकरी, तपकिरी या तीन रंगांचं मिश्रण असतं.  

हेही वाचा!

शेकरु आयुष्यभर झाडावरच राहातं. शेकरुच्या लांबलचक शेपटीमुळे ते झाडावर व्यवस्थित तोल सांभाळू शकतं. शेकरुचे मागचे पाय अधिक मजबूत असतात . त्याच्या जोरावरच एकमेकांपासून २० फुट अंतरावरील एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर ते सहज उड्या मारु शकतं. विविध प्रकारची फळं आणि फुलांमधील मधुरस हा त्यांचा आवडता आहार. शेकरु घाबरल्यास ते झाडावर स्वत:ला सावलीसारखं सपाट करुन घेतं.

शेकरु दिवसा लवकर आणि संध्याकाळी खूप जास्त क्रियाशील असतं. या काळात शेकरुचं एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर बागडणं सुरुच असतं. शेकरु सतत काही ना काही खातंच असतं. भलेही ते एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारत असलं तरी शेकरुच्या तोंडाची चक्की सुरुच असते. स्थानिक बियांचा प्रसार करण्यात शेकरुचा वाटा मोठा असतो. 

Image: critter.science

नर आणि मादी शेकरु सारखेच दिसतात. मादीच्या शरीरावरील तीन स्तन सोडले तर नर मादी शेकरुमध्ये काहीच फरक नसतो. कायम झाडावर राहणारे शेकरु आपल्या सुरक्षिततेसाठी उंचावरच्या बारीक फांद्यांवर काड्या आणि झाडांच्या पानांचा उपयोग करुन एखाद्या घमेल्यासारखी सहा ते आठ वेगवेगळी घरटी करतं. रोज शेकरु वेगवेगळ्या घरट्यात मुक्काम करतं आणि त्याच्या मागावर असलेल्या शिकाऱ्यांना चकवतं.

 Image: hoaxorfact

शेकरूचं पिल्लू जन्माला येतं तेव्हा.. 

ऑक्टोबर ते जानेवारी या काळात शेकरुची मादी पिल्लाला जन्म देते.शेकरुंचा गरोदरपणाचा काळ एक महिन्यापेक्षाही कमी असतो. एका महिन्याच्या आत मादी शेकरु एका पिल्लाला जन्म देते. शेकरुचं पिल्लू जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते आंधळं असतं आणि त्याच्या शरीरावर मऊ लोकर नसते. आईच्या मदतीशिवाय जगायला शेकरुच्या पिल्लाला सहा महिने लागतात.  

भीमाशंकरच्या जंगलातील शेकरुचा पहिला शास्त्रीय अभ्यास डाॅ. रने बोर्जेस यांनी केला आहे. आजही त्यांची निरीक्षणे आणि त्यांनी गोळा केलेली माहिती अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरते. महाराष्ट्रातील भीमाशंकराबरोबरच वासोटा, फणसाड, माथेरान, तिलारी, आंबा घाट, येथील जंगलात शेकरु आढळतं. मात्र, शेकरु झाडावर उंच ठिकाणी असल्याने आणि स्वभावाने लाजरे असल्यानं शेकरु दर्शन सहजासहजी घडत नाही. पण शेकरुचा विशिष्ट आवाज झाडावर ते असल्याची खात्री पटवतं. शेकरुचं आयुष्य २० वर्षं असतं.

( लेखक वन्यजीव अभ्यासक आहेत.)

makrandvj@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact