गायी म्हशीच्या पाठीवरुन फिरणारा कोतवाल म्हणजे अतिशय छळकुटा पक्षी!

- डाॅ. गौरव देशमुख

Image: freepik

पक्ष्यांमध्ये धीट पक्षी म्हणून कोतवाल पक्ष्याची खास ओळख आहे. कोतवाल पक्षी स्वसंरक्षणासाठी मोठ्या, हिंस्त्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावतात. कोतवाल पक्ष्याच्या या धीट स्वभावामुळेच त्याच्या आश्रयाने इतर लहान मोठे पक्षी आपले घरटे बांधतात.  कोतवाल पक्ष्याला इंग्लिशमध्ये 'ब्लॅक ड्रोंगो' म्हणतात. याचे शास्त्रीय नाव Dicrurus Macrocercus आहे. कोतवाल पक्ष्याच्या ३० प्रजाती आहे. कोतवालाची कावळ्यांचा राजा  (किंग क्रो) म्हणूनही ओळख आहे.कोतवाल संपूर्ण भारतासह इराण, पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका, चीन, इंडोनेशिया या देशांमध्ये आढळून येतो. कीटक, फुलातील मकरंद आणि क्वचित लहान पक्षी हे या पक्ष्यांचे खाद्य आहे. 

कोतवाल पक्षी हा साधारण ३१ सें.मी. आकाराचा असून, संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य. कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात. मादी कोतवाल एकावेळी ३ ते ५ पांढऱ्या रंगाची त्यावर भुरकट-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर त्यांचं संगोपन, त्यांना खाऊ घालणं ही सर्व कामं नर-मादी मिळून करतात. भारतात कोतवाल पक्षाच्या नऊ जाती आढळतात. मोठा भृंगराज व पांढऱ्या पोटाचा कोतवाल हे कोतवालाचे भाऊबंद जंगलात आढळतात. कोतवाल १५ वर्षं जगतात. 

 

हेही वाचा!

एका सेकंदात वीस वेळा टकटक करतो सुतार !

Image: freepik.com

 शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात, जंगलात किंवा मानवी वस्तीत कोतवाल थव्यानं राहाणं पसंत करतात. त्यांना एकट्यानं राहायला आवडत नाही. टेलिफोनच्या तारांवर किंवा विजेच्या तारांवर तर कोतवाल हमखास दृष्टीस पडतो. कोतवालाला म्हशीच्या, गायींच्या पाठीवर बसून फिरायला फार  आवडतं. त्यांच्या अंगावरील गोचिड तो फस्त करतो. म्हशीच्या पाठीवरुन फिरत असताना हवेत उडणारे किडेही तो शिताफीने पकडतो. कोतवालाची खोलवर दुंभगलेली लांब शेपूट त्याला हवेत झेप घेऊन किडे पकडायला उपयोगी पडते. शेतीला त्रासदायक असे कीटक खात असल्यामुळे कोतवाल पक्ष्याला शेतकऱ्यांचा मित्र मानलं जातं.  कोतवाल पक्षी दुसऱ्यांचं अन्न चोरण्यात फारच पटाईत असतात. ते इतर पक्ष्यांचा पाठलाग करतात. खात असलेल्या पक्ष्यांवर ते घिरट्या घालतात. त्यांना चोची मारुन सळो की पळो करुन सोडतात. हे पक्षी घाबरुन-वैतागून आपलं अन्न सोडून पळून जातात. मग कोतवाल मस्तपणे त्या अन्नावर डल्ला मारतात. 

Image: https://www.freepik.com

कोतवाल प्रामुख्याने शांत असतो. पण मध्येच मोठ्याने आणि विचित्र आवाज काढतात. शिंकल्यासारखा आवाज काढतात. मोठे कोतवाल तर इतर प्राणी पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही काढतात. अशी नक्कल करुन ते इतर प्राणी पक्ष्यांची दिशाभूल करतात. कोतवालाच्या नकलेला फसलेले पक्षी प्राणी त्याला प्रतिसाद देतात. इतर प्राण्यांना त्यांच्या अन्नापासून दूर करण्यासाठी, त्यांचं अन्न आपल्या वाट्याला येण्यासाठी अशा युक्त्या कोतवाल करत असतो.  केवळ पशू पक्ष्यांच्या आवाजाचीच नाही तर चालू बाईकच्या आवाजाची नक्कलही तो करु शकतो.  कोतवाल पक्ष्याच्या पंखाच्या फडफडीमध्ये खूप ताकद असते. ते खूप वेगाने उडतात. त्यामुळेच व्यावसायिक फोटोग्राफरही उडणाऱ्या कोतवालाला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करु शकत नाही. धिटाई खाई मिठाई या उक्तीचा अर्थ कोतवाल पक्ष्याचं वर्तन पाहून सहज लक्षात येतं. 

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?...लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : ९११२०५०५०० 
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com 
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact