बुड्डो बेटावर फक्त कुत्रेच राहातात. हे डाॅग आर्यलंड कसं आहे?

Image: trtworld

पाकिस्तानातल्या एका बेटावर फक्त कुत्रेच राहतात, हे माहितीये का तुम्हाला? कराचीजवळच्या या बेटावर जेव्हा मच्छिमारांची बोट येते तेव्हा या बेटावरील कुत्रे पाण्यामध्ये उडी घेऊन अगदी अधाशासारखे पोहत होड्यांच्या जवळ येतात. या होड्यांमधून मच्छिमार कुत्र्यांसाठी खाऊ घेऊन येतात. हे बेट आहे डिंगी बेट, याला बुड्डो बेट असंही म्हणतात. कराचीजवळच्या समुद्रात हे बेट असून, त्यावर पिण्यायोग्य पाणी आणि खाण्यासाठी कुत्र्यांना काहीच मिळत नाही. फक्त कुत्रेच या बेटावर राहत असल्यामुळे त्याला 'डाॅग आयलंड' असंही म्हणतात. पण अन्न, पाणी नसणाऱ्या या बेटाची निवड कुत्र्यांनी का केली असेल, असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. पण हे कुत्रे येथे स्वत:हून आले नाहीत. तर त्यांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी येथे आणून ठेवण्यात आलं आहे. 

हेही वाचा! 

कराचीमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर आहे. ही भटकी कुत्री अस्वच्छ असतात, घाण पसरवतात,असं स्थानिक लोकांना वाटतं. या भटक्या कुत्र्यांना मारण्यासाठी एक विशेष पथक कराचीमध्ये काम करत आहे. ते कुत्र्यांना अन्नातून विष देवून किंवा बंदुकीची गोळी मारुन कुत्र्यांना मारतात. दरवर्षी शेकडो कुत्र्यांची अत्यंत वाईट पध्दतीने कत्तल करुन त्यांची संख्या कमी केली जाते; मात्र कराचीतल्याच काही लोकांना या कुत्र्यांची दया आली. या कुत्र्यांची  अशी कत्तल होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी कराचीपासून वेगळ्या असलेल्या बुड्डो बेटावर या कुत्र्यांना आणून सोडलं.  प्राणी प्रेमी लोकांनी या बेटावर कुत्र्यांना आणून सोडलं असावं असं  सांगितलं जातं. कुणी म्हणतं, मच्छिमारांनी या कुत्र्यांना बेटावर आणलं.. पण नेमक्या कोणामुळे बुड्डो बेटावर भटकी कुत्री जमा झाली हे मात्र नक्की कोणालाच सांगता येत नाही. 

बुड्डो बेट कराचीपासून तुटलेले आहे. तेथे पोहोचण्यासाठी केवळ बोटीचाच वापर केला जातो.  या बेटावरील कुत्र्यांना जगवण्याची जबाबदारी मच्छिमारांनी घेतली आहे. हे मच्छिमार बोटीतून येवून या कुत्र्यांना पिण्याचं पाणी आणि खाण्याच्या गोष्टी पुरवतात.  बेटावर लहान कुत्र्यांसोबत मोठी आक्रमक कुत्रीही खूप आहेत. अशा वेळेस हे मच्छिमार केवळ मोठ्या कुत्र्यांचंच नाही तर लहान कुत्र्यांचंही पोट भरेल याची काळजी घेतात. 

 Image: thehindu

होड्यांमधील मच्छिमार पाण्यात उतरतात तेव्हा बुड्डो बेटाचे रहिवासी असलेले हे कुत्रे त्यांची आतुरतेने वाटच पाहत असतात. आपल्याला खायला मिळणार या आनंदापोटी ते भुंकू लागतात. या बेटावर कुत्र्यांच्या आजूबाजुला केवळ प्लॅस्टिकचा कचरा आहे. आपल्याला जशी भूक तहान लागते, तशी या कुत्र्यांनाही लागतच असेल या जाणिवेतूनच हे मच्छिमार या कुत्र्यांना अन्न पाणी देण्यासाठी न चुकता बुड्डो बेटावर येतात. हे मच्छिमार येईपर्यंत  हे कुत्रे किनाऱ्यावर वाहून आलेल्या मेलेल्या माशांना खातात  किंवा एखाद्या लहानशा प्राण्याला मारण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी ते भुकेमुळे दुसऱ्या कुत्र्यांवर हल्ला करतात. पिण्याचे पाणी या बेटावर अजिबात नसल्यामुळे तहानेने व्याकूळ झालेले कुत्रे किनाऱ्याजवळील खारट पाणीही पितात.

बुड्डो बेटावर आणून सोडल्यामुळे या कुत्र्यांवरचं कत्तीलचं संकट टळलं आहे. पण आता या बुड्डो बेटावर विकासकामांच्या प्रकल्पाची आखणी सुरु आहे. ही विकासकामं करुन निर्जन असलेल्या बुड्डो बेटावर माणसांची वर्दळ करुन हे बेट कराची शहराला जोडण्याचं नियोजन आहे.  हा प्रकल्प आज ना उद्या अस्तित्वात येणारच, मग या कुत्र्यांचं काय होणार असा प्रश्न येथील प्राणीप्रेमींना पडला आहे. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact