इवलीशी माशी माउंट एव्हरेस्ट शिखराच्याही वर उडू शकते! ते कसं?

Image: hindustantimes

माश्या किती उंची उडू शकतात? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला उत्तर देता येईल का? माश्यांच्या उडण्याचं कौतुक कोणी कधी केलंच नव्हतं . माणसांना जसं चालता येतं तसं माश्या उडतात, इतकं सामान्यपणे त्यांच्या उडण्याकडे बघितलं जातं. पण माश्या माउंट एव्हरेस्टच्याही वर उडतात असं म्हटलं तर विश्वास बसेल का तुमचा? पण शास्त्रज्ञांनी 'अल्पाइन बबंलबीज' या प्रजातीच्या माश्यांच्या उडण्याचा अभ्यास केला आणि कोणालाही सहजसहजी विश्वास बसणार नाही अशी माश्यांबद्दलची माहिती समोर आली.

शास्त्रज्ञ म्हणतात तुम्ही विमानात बसून प्रवास करत असाल तर तुम्हाला जमिनीवर दिसलेली बंबलबीज ही माशी वर देखील दिसू शकते. तुम्ही जर माउंट एव्हरेस्ट शिखरावर चढून गेलात तर या शिखराच्या टोकालाही म्हणजे नऊ हजार मीटर्स उंचीवरही ती दिसू शकते.

हेही वाचा!

अल्पाइन बंबलबीज एवढ्या उंच कशा बरं उडतात?

माउंट एव्हरेस्ट शिखराच्या उंचीवर उडायचं म्हणजे या माश्यांना वर विरळ होत चाललेल्या हवेत आणि ऑक्सिजनची पातळी कमी होत असतानाच्या वातावरणात आपल्या पंखांची जास्त आणि जोरजोरात हालचाल करावी लागत असणार असं बंबलबीजच्या उडण्यावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना वाटलं. पण शास्त्रज्ञांचा अंदाज बंबलबीजने चुकवला. पंखांची जोरात हालचाल न करताही या बंबलबीज सहज वर पोहोचत असल्याचं शास्त्रज्ञांना अभ्यासातून आढळलं. वर वर जाताना बबंलबीज आपल्या पंखांचा विस्तार वाढवतात. यामुळे पंख डोकं आणि पोटाच्या जवळ जातात. या अशा विशिष्ट उडण्याच्या पध्दतीने भरारी घेण्यासाठी हवा निर्माण होते. या हवेने त्यांना आणखी वर जायला मदत होते.

शास्त्रज्ञांना बंबलबीज माश्या ४,००० मीटर्सच्याही वर राहात असल्याचं आधीच आढळलं होतं.  चीनमधील ४,४०० मीटर्स उंचीवर असलेल्या हेंगडुआन शिखरावर या माश्यांची घरटी शास्त्रज्ञांना आढळली होती. एवढं उंच उडता येत असूनही या माशा मोठ्या प्रमाणात आणि सतत उंचावर का नाही दिसत? असा प्रश्नही अनेकांना पडला. या प्रश्नाचं सोपं उत्तर म्हणजे त्यांना वर उडता येत असलं तरी  राहातात त्या तिथेच जिथे त्यांना अन्न सहज मिळतं.  

वर उंचावर आढळणाऱ्या बम्बलबीज आणि समुद्रसपाटीच्या जवळ म्हणजे खाली आढळणाऱ्या बबंलबीज यांच्यातले वैशिष्ट्येही सारखीच असलेली शास्त्रज्ञांना आढळले. यासाठी शास्त्रज्ञांचा एक गट पश्चिम चीनमधील डोंगररांगात गेला. तिथून त्यांनी अल्पाइन बंबलबीज या प्रजातीच्या चार नर माशा खाली आणल्या. खाली आढळणाऱ्या माश्या वर नेल्या. या दोन्ही प्रयोगात वरुन खाली येताना किंवा खालून वर जाताना या माश्यांनी विशेषत: त्यांच्या इवल्याश्या पंखांनी वातावरणाशी लगेच जुळवून घेतल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलं. यावरुन शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की सर्व प्रजातीच्या माश्या या ४,००० मीटर्स उंचीपर्यंत उडू शकतात. इतकंच नाही तर काही प्रजातीच्या माश्या या ९,००० मीटर्सच्याही वर जावू शकतात.  

Image: washingtoninformer

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact