
Image: freepik.
खोटं बोलण्यचा आणि नाक गरम होण्याचा काय संबंध? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल.. हो ना? याचं उत्तर हो की नाही, हे जाणून घेण्याआधी एक गोष्ट वाचा. ही गोष्ट आहे पिनोचियोची. कोण हा पिनोचियो. तर हा पिनोचियो म्हणजे इटालियन गोष्टीतला काल्पनिक हिरो आहे. हा पिनोचियो भेटतो तो 'द ॲडव्हेनचर्स ऑफ पिनोचियो'या कोलोडी कार्लो या इटालियन लेखकाने लिहिलेल्या लहान मुलांच्या पुस्तकात. लाकडाचं कोरीव काम करणाऱ्या जेपेटोने पिनोचियोला घडवलं. त्याला आकार दिला. हा पिनोचियो ओळखला जायचा तो त्याच्या नाकासाठी . पिनोचियो खोटा बोलला की त्याचं नाक काही इंचांनी लांब व्हायचं आणि पिनोचियोची खोटं बोलण्याची लबाडी पकडली जायची. पिनोचियो हा लाकडाची कठपुतळी म्हणजे लाकडी बाहुला होता. त्याचं एक स्वप्न होतं. त्याला खराखुरा मुलगा व्हायचं होतं. पण यासाठी त्यानं खोटं बोलणं सोडायला हवं, ही अट त्याला टाकलेली होती. पण पिनोचियोची ही सवय काही केल्या कमी होत नव्हती. मग एकामागोमाग पिनोचियोवर संकंट येतात. या संकटांचा सामना करता करता पिनोचियो शिकतही जातो. पिनोचियो त्याच्यावर आलेल्या संकटातून उदारपणा, प्रामाणिकपणा आणि मेहनत करायला शिकतो. मग काय परी खूष होते आणि पिनोचियोचं खराखुरा मुलगा होण्याचं स्वप्न पूर्ण होतं.
हे वाचा!
खोटं बोलताना काय होतं ?
पिनोचियोच्या गोष्टीचा आणि खोटं बोलताना नाक गरम होण्याचा संबध आहे, म्हणूनच तर गोष्ट सांगितली. खोटं बोलताना नाक गरम होतं का? या प्रश्नाला अभ्यासकांनी दिलेलं उत्तर हो आहे. याचबरोबर अभ्यासकांनी असं का होतं, हे देखील शास्त्रीय दृष्टीकोनातून समजून सांगितलं आहे. खोटं बोलताना नाक गरम होण्याच्या प्रक्रियेला अभ्यासकांनी 'पिनोचियो इफेक्ट' असं म्हटलं आहे. खोटं बोलताना नाकाभोवतालचं तापमान वाढतं आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातील आतील बाजूचे स्नायू मोठे होतात. खोटं बोलणं, म्हणजे काहीतरी आपल्याच मनात लपवून ठेवणं. आपल्या भावना मनात लपवून ठेवल्यामुळे नाकाकडील भाग गरम होतो. अभ्यासक म्हणतात, जेव्हा आपण मानसिकरित्या खूप कष्टाचं काम करतो तेव्हा आपला चेहेरा थंड होतो. कारण चेहेऱ्याचं तापमान मानसिक कष्टामुळे कमी होतं. पण आपल्याला समजा भीती वाटली तर चेहेऱ्याचं तापमान वाढतं.

Image: pngfind
हे वाचा!
खोटं बोलणं आणि नाकाचं तापमान वाढणं हा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांनी 'थर्मल कॅमेरा' वापरला. या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं नाकाभोवतीचं तापमान मोजलं. थर्मोग्राफिक कॅमेऱ्याला विस्तृत दृष्टी असल्यानं या कॅमेऱ्याचा उपयोग गायी, म्हशींचा श्वसननलिकेशी संबंधित आजार आणि उत्तर अमेरिकेत आढळणऱ्या रॅकून नावाच्या प्राण्यातलं रेबीज ओळखण्यासाठी होतो.
आपण खोटं बोलतो तेव्हा नाकाकडचं तापमान वाढतं आणि मेंदूतील इन्सूला नावाचा भाग उद्दिपित होतो. खरंतर इन्सुला आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं. पण आपण काही लपवत असू किंवा खोटे बोलत असू तेव्हा जे विचार येतात त्यामुळे आपला चेहेरा गरम होतो. इन्सुला हा भाग उलटं काम करत असल्यानं हा परिणाम होतो. तेव्हा तुमच्या नाकावरुन तुम्ही खोटं बोलत आहात, हे सहज पकडता येवू शकतं. तेव्हा खोटं बोलण्याआधी सावधान!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact