
Image: goodmorningamerica
व्हॅलेण्टिना डाॅमिग्यूझ नावाची ९ वर्षाची मुलगी अमेरिकेत राहाते. ती तिच्या आई बाबांसोबत फिरायला बाली बेटावर गेली. फिरायला जाताना व्हॅलेण्टिनाने सोबत तिची आवडती बाहुलीही घेतली. बीटराइस हे त्या बाहुलीचं नाव. ही बाहुली म्हणजे व्हॅलेण्टिनाचं केवळ खेळणं नव्हती तर चांगली मैत्रिण होती. बीटराइस सोबत असेल तरच व्हॅलेण्टिना आनंदी असायची. बाली फिरुन झाल्यानंतर व्हॅलेण्टिना आपल्या कुटुंबासमवेत पुन्हा अमेरिकेला निघाली. मध्ये विमान जपानला थांबलं. अमेरिकेत पोहोचल्यानंतर आपली बाहुली हरवल्याचं व्हॅलेण्टिनाला लक्षात आलं. ही बाहुली जपानला थांबलेलो असतानाच कुठेतरी हरवली असं व्हॅलेण्टिना म्हणत होती. घरी पोहोचल्यानंतर बीटराइस सोबत नसल्याने कोणीच आनंदी नव्हतं. बीटराइस ही बाहुली जितकी व्हॅलेण्टिनाची आवडती तितकीच तिच्या आई-बाबांचीही. त्यांनाही बीटराइस हरवल्याने वाईट वाटलं. पण आपली व्हॅलेण्टिना बीटराइस हरवल्याने फारच दु:खी झाली आहे हे बघून आई बाबा खूप काळजीत पडले. आपण काही प्रयत्न करुन पाहायला हवेत म्हणून त्यांनी बाहुली हरवल्याबाबत एक ऑनलाइन पोस्ट टाकली.
हेही वाचा!
व्हॅलेण्टिनाच्या आई बाबांनी टाकलेली ही पोस्ट अमेरिकन एयरलाइन्समध्ये पायलट असलेल्या अमेरिकन जेम्स डॅनन यांनी वाचली. त्यांनी बाहुलीशिवाय एकट्या पडलेल्या व्हॅलेण्टिनाची मदत करायचं ठरवलं. एखादा डीटेक्टिव्ह कसा काम करतो तसं काम करायला डॅनन यांनी सुरुवात केली. त्यांनी तुर्कीश एअर लाइन्सला लाॅस्ट ॲण्ड फाउंडसठी संपर्क साधला. अमेरिकन मुलीची बाहुली प्रवासात हरवल्याची माहिती दिली आणि ती बाहुली शोधण्यास मदत करण्याचं आवाहनही केलं. डॅनेन यांनी केलेल्या धडपडीतून त्यांना टोकियोच्या हॅनेडा विमानतळावर व्हॅलेण्टिनाची बाहुली सापडली. ही बाहुली मिळताच डॅनन यांनी त्या बाहुलीचे फोटो काढून ते फोटो ऑनलाइन टाकले. याद्वारे डॅनन यांनी व्हॅलेण्टिनाला बीटराइस ही सुखरुप असून घरी येण्यासाठी प्रवास करते आहे, हे व्हॅलेण्टिनापर्यंत पोहोचवलं.
डॅनन यांनी केवळ लहान मुलीचा हट्ट म्हणून बाहुली शोधण्यासाठी प्रयत्न केले. डॅनन यांचं अमेरिकेत व्हॅलेण्टिनाच्या घराजवळच घर . त्यांनी बाहुली व्हॅलेण्टिनाला प्रत्यक्ष नेवून दिली. सोबत डॅनन यांनी व्हॅलेण्टिनासाठी जपानमधील खाऊ घेतला आणि एक नकाशाही. आपल्याला बीटराइस कुठे सापडली हे व्हॅलेण्टिनाला नीट दाखवण्यासाठी त्यांनी तो नकाशा घेतला होता. बाहुली घेवून आलेल्या डॅननला भेटल्यावर व्हॅलेण्टिनाला फार आनंद झाला. तिने 'विमानात बीटराइस नीट वागली ना?' हा प्रश्न सर्वात आधी विचारला.
हरवलेली बीटराइस परत मिळाल्याने व्हॅलेण्टिना खूप खूष झाली होती. तर डॅननला एका छोट्या मुलीची मदत केल्याने खूप छान वाटत होतं. मुळातच मदत करणं हाच डॅननचा स्वभाव. आपल्या आवाक्यात असतील त्या गोष्टींद्वारे डॅनन इतरांना त्यांच्या गरजांमध्ये मदत करण्यास धडपडत असतो. हरवलेली व्हॅलेण्टिनाची बाहुली परत करण्यासाठी डॅननला बरेच कष्ट करावे लागलेत, पण त्याच्या मदत करण्याच्या इच्छाशक्तीने डॅननने बाहुलीचा शोध लावला. व्हॅलेण्टिना आणि बीटराइस यांच्यात ९००० कि.मीचं अंतर होतं. पण हे अंतर पार करुन डॅनन यांनी व्हॅलेण्टिनाकडे तिची आवडती बाहुली सोपवली. व्हॅलेण्टिनाला यातून एक मोठा धडा मिळाला, तो म्हणजे मदत करण्याचा. आपल्याला जर कोणी मदतीसाठी हाक दिली तर आपल्या क्षमतेनुसार मदत मागणाऱ्याची आपण मदत करायला हवी असं डॅननला वाटायचं आणि त्याने तेच केलं.

Image: kidspot
एखाद्या गोष्टीसारखीच वाटली ना ही व्हॅलेण्टिना, बीटराइस आणि डॅननची बातमी. तुम्हाला या अनुभवाबद्दल काय वाटतं, तुम्हालाही या अनुभवातून काय शिकायला मिळालं, हे मला नक्की लिहून पाठवा.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact