
Image: chilliwack
स्वीडनमधील सर्वात मोठं बेट म्हणजे गाॅटलंड बेट. या बेटाला स्वर्गीय बेट असं म्हटलं जातं. या बेटावरचं वाळवंट, वाळुचे किनारे, समुद्रात उभ्या असलेल्या मोठ मोठ्या दगडांचे सौंदर्य हे येथील वैशिष्ट्य. गाॅटलंड बेटावरचं हे स्वर्गीय सौंदर्य अनुभवण्यासाठी जगभरातल्या पर्यटकांची येथे गर्दी होते. अशा या जगप्रसिध्द सुंदर बेटावर एका अजब स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 'द वर्ल्डस अग्लीएस्ट लाॅन्स काॅम्पिटिशन', असं या स्पर्धेचं नाव. म्हणजे कुरुप लाॅन्स स्पर्धा. वाचून विचित्र वाटलं ना... कोणीही घरासमोर लाॅन्स कशाला लावतं तर शोभेसाठी. आपल्या घराची शोभा वाढावी, डोळ्याला छान दिसावं म्हणून लावतात लाॅन्स. शिवाय ही लाॅन्स राखणं ही मोठी वेळखाऊ आणि खर्चिक जबाबदारी आहे. अशा कष्टाने जपलेल्या लाॅन्सला कुरुप करण्याची ही कोणती स्पर्धा? कशाला लोकं यात भाग घेतील? असे प्रश्न नक्कीच पडतील तुम्हाला. द वर्ल्डस अग्लीएस्ट लाॅन्स काॅम्पिटिशन आयोजित करण्यामागे विशिष्टं कारणं आहेत. ती समजली तर लाॅन्सला कुरुप करण्याची स्पर्धा आपल्यालाही नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण वाटेल.
हवामान बदलाचा परिणाम होवून गाॅटलंडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाऊस कमी पडतोय, हिमवृष्टी कमी होतेय. त्याचा परिणाम म्हणजे गाॅटलंडमध्ये पाणी कमी होतंय. जमिनीखालचं पाणीही आटून गेलं आहे. तसेच पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या बेटाला पाण्याच्या कमतरेचा सामना करावा लागतोय. पण यावर काहीच उपाय न केल्यास या बेटावर लोकांना प्यायला पाणीच राहणार नाही, असा विचार करुन स्वीडनमध्ये ही 'द वर्ल्डस अग्लीएस्ट लाॅन्स' स्पर्धा भरवली जाते. २०२३मध्ये ही स्पर्धा ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात होत आहे.
हेही वाचा!
गाॅटलंडमधील 'द वर्ल्डस अग्लीएस्ट लाॅन्स' काॅम्पिटिशन
आपल्या घरासमोरचं लाॅन्स/ हिरवळ हे दिसायला खूप छान दिसते. यामुळे आपल्या घराची शोभा वाढते. पण लाॅन राखणं, हिरवळीची काळजी घेणं ही सोपी बाब नाही. यासाठी खूप पाणी लागतं. शिवाय अनेक लोकं आपल्या लाॅन्समधील हिरवळ चांगली यावी, दाट यावी, लवकर यावी यासाठी मोठ्या प्रमाणात खतांचाही वापर करतात. पण याचा फायदा लाॅन्स वाढण्याला होत असला तरी माणसावर, पक्ष्यांवर, पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होतो. शिवाय झाडांची बाग जशी सावली देते, फळं, फुलं, भाज्या देते तसं काहीच लाॅन्सकडून मिळत नाही. या हिरवळीकडे आकर्षित होवून मधमाशा, फुलपाखरं, पक्षी असे कोणीच येत नाही. त्यामुळे परागीभवन होवून वेगवेगळ्या ठिकाणी बी रुजण्यास मदतही होत नाही. उलट या लाॅन्सची तहान इतकी आहे की त्यांना पाणी पुरवणं हे पाण्याच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या गाॅटलंड बेटाला अवघड होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून लाॅन्स नकोच, लाॅन्सचं रुपांतर बागेत करा अशी मोहीमच गाॅटलंडमध्ये सुरु आहे. लाॅन्स काढून कमीत कमी पाणी लागेल/ अजिबात पाणी लागणार नाही अशी रानटी फुलांची झाडं लावावीत, गवत लावावे, फळं-भाज्यांची लागवड करावी नाहीतर बागेत दगडांची सुंदर रचना करावी असं आवाहन या स्पर्धेची जाहिरात करताना केलं जात आहे.

Image: theguardian
हेही वाचा!

Image: chilliwack
पाण्याच्या कमतरतेकडे, पाणी वाचवण्यासाठीच्या, पर्यावरण जपण्यासाठीच्या उपायांकडे लक्ष जाण्यासाठी, लोकांनी या गोष्टींचा गंभीरपणे आणि उपक्रमशीलतेने विचार करण्यासाठी आयोजित केली जाणारी द वर्ल्डस अग्लीएस्ट लाॅन्स ही स्पर्धा खरोखर अजब म्हणावी अशीच आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact