
दिवाळी जवळ येतेय, आपण सर्व परीक्षा सुरु असली तरी अभ्यास करता करता दिवाळीत करायच्या मजेचं धम्माल प्लॅनिंगही करतोय. आजूबाजूला मस्त उत्सवी वातावरण असल्याने परीक्षेचा अभ्यास करायचा असला तरी टेन्शन येत नाहीये. पण तुम्हाला अशी मुलं माहित आहे का ज्यांची शाळा सुरु होती, पण अचानक बंद झाली. त्यांना शाळेत जावून शिकायचं होतं, अभ्यास करायचा होता, परीक्षा द्यायची होती आणि मित्रांसोबत खूप मजाही करायची होती. पण त्यांची शाळा अचानक बंद झाली. कारण युध्द. हो. मी बोलतेये ते गाझा आणि इस्त्राएलबद्दल. ८ ऑक्टोबरपासून इस्त्राएल आणि गाझामध्ये युध्द सुरु झालंय. दिवसेंदिवस हे युध्द गंभीर होत चाललंय. युध्द सुरु असताना तेथील लोकं कशी जगत असतील? तेथील मुलं बाॅम्बचे आवाज ऐकून किती घाबरत असतील, काय अवस्था होत असेल त्यांची? सुरक्षित राहाण्यासाठी लाखो माणसांची धडपड सुरु आहे. त्यातला एका मुलगा म्हणजे याझान हेलीस. त्याने समाजमाध्यमांवर एक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्याने ते कसे बाॅर्डरवर अडकून पडले आहे आणि ऑस्ट्रेलियात जाण्याची त्यांची कशी धडपड सुरु आहे हे सांगितलं.
याझान हेलीस हा १२ वर्षांचा असून तो मूळ ऑस्ट्रेलियातला. ऑस्ट्रेलियात ॲडलेड येथे राहतो तो. पण काही दिवसांपूर्वी तो, त्याचे आई बाबा आणि ७ वर्षांची बहीण हे सर्व गाझाला आलेत. याझानचे वडील पॅलेस्टिनीन तर आई ऑस्ट्रेलियन. याझान गाझाला आला तो आजी आजोबांच्या घरी. तिथे मजा करायला, सुट्या घालवायला. पण झालं वेगळंच आणि तो आज गाझामध्ये राफाच्या बाॅर्डवर आपल्या कुटुंबासोबत अडकून पडला आहे. त्याने तिथून जे लिहिलं आहे त्यातून युध्दग्रस्त भागात लहान मुलांची काय अवस्था होतेय हे स्पष्टपणे दिसतं. आपण इस्त्राएल आणि गाझापासून खूप दूर आहे. पण याझान पत्र लिहून जे सांगू पाहतोय ते मात्र सर्वांच्या हदयापर्यंत पोहोचलं. त्याचे पत्र वाचून अनेक माणसं रडू लागली. काय लिहिलंय याझानने..
हेही वाचा!
याझान लिहितो की..
'तू ठीक आहेस ना?' असा प्रश्न मला कोणी विचारु नका. कारण मी ठीक नाहीये. मी सुरक्षितही नाहीये. मला ऑस्ट्रेलियात जायचंय. तिथे खूप शांतता आहे. आम्ही खूप वर्षांपासून गाझाला येण्याची वाट पाहात होतो. आम्हाला आजी आजोबांना भेटायचं होतं. माझे बाबा तर त्यांना गेल्या १२ वर्षांपासून भेटलेच नव्हते. आम्हाला यावर्षी गाझाला येता आले. आम्ही चांगली ४ आठवड्यांची सुटी घालवण्यासाठी गाझाला आलो होतो. आल्या दिवसापासून आमची मजा सुरु होती. आम्ही समुद्रावर गेलो. माझी चुलत भावंडंही आजोबांच्या घरी आली. आम्ही रात्र जागून गप्पा मारल्या. मध्यरात्री स्वयंपाकघरात जावून आम्ही चोरुन आमच्या आवडीचा खाऊ तयार केला. तो खाऊन आम्ही पुन्हा गप्पा मारल्या.
काही दिवसांनी आम्ही बाहेर फिरायला गेलो. एका रेस्टाॅरण्टमध्ये आम्ही बर्गर आणि आइस्क्रिम खाल्लं. खूप मजा आली. पण रेस्टाॅरण्टमधील पदार्थांपेक्षा माझी आजी जे बनवते ते पदार्थ खूप भारी असतात. आजीने आमच्यासाठी पिझ्झा, स्पगेटी, फटा, मकलुबासारखे पॅलेस्टिनी पदार्थ बनवले. आजी आजोबांकडे चोको-मिको नावाची दोन मांजरंही आहेत. त्यांच्यासोबत माझा वेळ कसा जायचा तेच कळायचं नाही.

Image: .yahoo.com
आम्ही शुक्रवारी रात्री दुसऱ्या दिवशी काय मजा करायची ते ठरवून झोपले. पण सकाळी आम्हाला जाग आली ती बाॅम्बच्या आवाजांनी. सगळं वातावरण एकदम बदललं. बाबा म्हणाले, 'काहीतरी भयंकर सुरु आहे बाहेर!' बाबंना आमची चिंता वाटू लागली. रोज येथील बाॅम्बचे आवाज वाढतच गेले. हे बाॅम्ब आजोबांच्या घराशेजारी पडू लागले. आजी आजोबांच्या शेजाऱ्यांच्या घरावर बाॅम्ब पडला. मांजरांनाही तो आवाज सहन होत नव्हता. मांजरं उलट्या करु लागली. आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो. डाॅक्टरांनी मांजरांना औषधं दिली. आम्ही जिथे राहात होतो तिथे नंतर जास्तच बाॅम्ब पडू लागले. आम्ही जिवंत राहू की मरुन जावू असे प्रश्न पडू लागले. बाॅम्ब हल्ल्यांमध्ये आमच्या शेजारची इमारत पडली. म्हणून मग आम्ही सर्वांनी गाझामधील एका मोठ्या हाॅस्पिटलात आसरा घेतला. त्या हाॅस्पिटलमध्ये लोकांची खूप गर्दी झाली होती. त्यामुळे आम्हाला रात्री जमिनीवर तसंच झोपावं लागलं. आमच्याकडे पांघरुण, सतरंजी काहीच नव्हतं. नंतर काकांच्या लक्षात आलं की चोको मांजर मेलं. मिको जिवंत राहिला. पण घाईगर्दीत त्याला आमच्यासोबत घ्यायचंच विसरलो. मिको गर्दीत हरवलं. मला फार वाईट वाटत आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही राफा बाॅर्डरवर गेलो. अख्खा दिवस आम्ही उन्हात घालवला. पण सीमा बंदच. मग आम्ही तिथून जवळ असलेल्या आमच्या काकांच्या मित्राच्या घरी गेलो. तिथे गेलो तोपर्यंत आम्ही जिथे आसरा घेतला होता त्या हाॅस्पिटलवर बाॅम्ब हल्ला झाला. त्यात ५०० माणसं मेली. जिथे हाॅस्पिटलसारखी जागा सुरक्षित नाही तिथे इतर ठिकाणी कसं सुरक्षित वाटेल?
हेही वाचा!

Image: cnbctv18.com
मला म्हणून आता ऑस्ट्रेलियात जायचं आहे. पण मी इथे गाझात अडकून पडलोय. उद्या काय होईल काहीच माहीत नाही. मी अनाथ होईल का? माझे आई बाबा सुरक्षित राहतील ना? आम्ही ऑस्ट्रेलियाला जावू शकू ना? माझ्या मनात खूप प्रश्न पडत आहेत. आम्ही का नाही जावू शकत परत? मला फुटबाॅलची, माझ्या मित्रांची, त्यांच्या सोबत सायकल चालवण्याची खूप आठवण येते आहे. हे सर्व माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला मी खूप मूर्ख झाल्यासारखं वाटतोय. मला शाळेत जायचंय. मला गणितं सोडवायला खूप आवडतात. मला माझ्या घरी जायचंय. माझ्या खोलीत माझ्या बेडमध्ये शिरुन मला झोपायचंय. ती फार सुरक्षित जागा आहे!
याझानने लिहिलेलं पत्र वाचून तुम्हालाही वाईट वाटलं ना? खरंच कधी युध्द थांबेल? कधी याझान आणि त्याच्यासोबत अडकलेल्या लाखो माणसांची सुटका होईल. कधी ते सुरक्षित ठिकाणी, आपल्या घरी जावू शकतील?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact