बी बस स्टाॅप माहीती आहे? मधमाशांसाठी बस स्टाॅप का बरं केला असेल?

Image: gardenbetty

मधमाशा काय करतात? असा प्रश्न विचारला तर उत्तर किती सोपं आहे. मधमाशा मध तयार करतात. पण मधमाशांचा एवढाच उपयोग असता तर घटत चाललेल्या मधमाश्यांच्या संख्येने जग चिंताग्रस्त झालं नसतं. झाडं, माणसं आणि प्राणी जगवण्याची ताकद या मधमाश्यांमध्ये असते. ९० जंगली वनस्पती आणि ७५ टक्के शेतातील पिकं ही मधमाशा करत असलेल्या परागीभवनाच्या क्रियेवर अवलंबून असतात. मधमाशांद्वारे होणारी ही परागीभवनाची क्रियाच झाली नाही तर जगभरातल्या वनस्पती नष्ट होतील. वनस्पतीच नसतील तर प्राणीजीवन आणि मनुष्यजीवनही अवघड होईल. त्यामुळेच मधमाशा असणं आणि त्यांनी परागीभवन करणं ही आवश्यक बाब आहे. आज जगात २ लाख कोटी मधमाशा आहेत. मधमाशांच्या २०,००० प्रजाती जगभरात आहेत. जिकडे फुलझाडं तिकडे मधमाशा. त्यामुळे जगभरात मधमाशा आहेत. फक्त अति थंड असलेल्या अंटार्क्टिकामध्ये ना वनस्पती आहेत ना प्राणी. तिथे झाडंच येत नाही, त्यामुळे तिथे मधमाशाही नाहीत. पण तेवढा भाग सोडला तर पृथ्वीवर सर्वत्र मधमाशा आहेत. पण वाढतं शहरीकरण, प्रदूषण, शेतीमध्ये किटकनाशकांचा वाढता वापर, मधमाशांचे अधिवास नष्ट होणं यासारख्या कारणांमुळे मधमाशांची संख्या घटते आहे.

इंग्लड आणि युरोपमध्ये मधमाशांच्या अनेक प्रजातीच नष्ट झाल्या आहेत. १९७० पासून आतापर्यंत इंग्लडमध्ये मधमाशांची संख्या ५० टक्के कमी झाली आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर आजपर्यंत इंग्लडमधील ९७ टक्के रानटी फुलांचं क्षेत्र नष्ट झालं आहे. एकूणच मधमाशांच्या मुक्त वावरण्यावर फारच मर्यादा आल्या आहेत. आपल्या जगण्यात मधमाशांचं असलेलं महत्व आणि त्यांची कमी होत चाललेली संख्या यांचं गांभीर्य इंग्लड आणि युरोपातील अनेक देशांनी ओळखलं. मधमाशांची संख्या वाढावी यासाठी तिथे आगळा वेगळा प्रयोग करण्यात येत आहे.

हेही वाचा!

मधमाशांसाठी बी बस स्टाॅप

इंग्लड आणि युरोपातील कही देश मधमाशांची संख्या वाढावी यासाठी बस स्टाॅपच्या छतावर बागा तयार करत आहेत. या बागांमध्ये फुलंझाडं लावून धोक्यात आलेल्या मधमाशांना, कीटकांना आकर्षित करुन त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बस स्टाॅपच्या छतावरील या बागेला 'बी बस स्टाॅप' म्हणून ओळखलं जात आहे. अशा प्रकारच्या बागा तयार करुन मधमाशा, फुलपाखरं यांना मुक्तपणे वावरण्यासाठी छोट्या छोट्या बेटांसारख्या जागा इंग्लडमध्ये तयार होत आहेत. शहरांचा विस्तार करण्यासाठी मानवाने जास्तीत जास्त बळकावलेली जमीन रस्ते, शेती यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली गेली. शिवाय शेतीमध्ये जास्तीत जास्त कीटकनाशकांचा वापर होत असल्याने मधमाशांची संख्या कमी होत आहे. मधमाशा जर अशाच कमी होत राहिल्या तर माणूस, प्राणी आणि वनस्पती यांना जगणं अवघड होईल. मधमाशांच्या घटत्या संख्येचा धोका ओळखून इंग्लडमध्ये बस स्टाॅपवरील छतांवर फुलबागा लावल्या जात आहेत.

 Image: .lasexta

 हेही वाचा!

यासाठी इंग्लडमधील ' क्लियर चॅनेल' ही ॲडव्हरटायजिंग कंपनी वाइल्ड लाइफ ट्रस्ट आणि शहरातल्या प्रशासनासोबत एकत्र काम करुन इंग्लड देशातील विविध शहरातल्या बस स्टाॅपवर बाग लावून बी बस स्टाॅप तयार करण्याचं काम करत आहे.

बी बस स्टाॅप आपल्या नेहमीच्या बस स्टाॅप सारखेच आहेत फक्त त्यांच्या छतावर हिरवीगार फुलझाडांची बाग आहे. बस स्टाॅपच्या छतावर बाग तयार करताना विशेष विचार केला गेला आहे. कारण छतावर बाग तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच वजन जास्त असते. विशेषत: पाऊस पडल्यानंतर मातीचा भार आणखी वाढतो. याचा विचार करुन बस स्टाॅपच्या छतावरील बागेसाठी विशेष वनस्पती आणि झाडांची निवड केली गेली. या बागेची वर्षातून केवळ दोनदाच छाटणी करावी लागते. बस स्टाॅपवरील या बागांमुळे मधमाशा , फुलपाखरं येतात. उन्हाळ्यात बस स्टाॅपच्या परिसरात थंडावा असतो. शिवाय अशा बागांमुळे हवा देखील शुध्द राहाते.

Image: .archdaily

क्लिअर चॅनेल संस्थेने इंग्लडमधील ३०,००० बस स्टाॅपचा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांना बहुतेक बस स्टाॅप हे २०  वर्षाहूनही जुने असल्याचे आढळले. या जुन्या बस स्टाॅपच्या जागी नवीन बस स्टाॅप उभे करुन या नवीन बस स्टाॅपच्या छतावर बाग करता येईल, ही कल्पना त्यांनी प्रशासनाला सूचवली आणि अमलात आणली. सुरुवातील असे १००० बी बस स्टाॅप तयार करण्याचं उद्दीष्ट संस्थेनं ठेवलं होतं. फक्त इंग्लडमधेच नाही तर युरोपातील अनेक देशांमध्ये क्लिअर चॅनेलने असे  बस स्टाॅपच्या छतावर बाग असेलेले बी बस स्टाॅप तयार केले आहेत. मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी बी बस स्टाॅप तयार करणारा नेदरलॅंड हा पहिला देश आहे. नेदरलॅंडमधील उट्रेच या शहरात ३०० बी बस स्टाॅप आहेत.

 हेही वाचा!

बी बस स्टाॅपचा आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा संशोधकांनी अभ्यास केला असता छतावर बाग असलेल्या बी बस स्टाॅपमुळे परागीभवनाला मदत होत असल्याचं, त्यामुळे मधमाशा आणि परागीभवनाला उपयुक्त कीटकांची संख्या वाढत असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे. बी बस स्टाॅपच्या छतावरील बागेमुळे शहराचं तापमान कमी होण्यास मदत झाल्याचंही संशोधक म्हणतात. बी बस स्टाॅपवरील बागांना तशी जागा कमी लागते. पण शहरात असलेल्या एकूण बस स्टाॅपच्या संख्येचा विचार केल्यास बी बस स्टाॅपमुळे अशा भरपूर हिरव्या जागा शहरात तयार व्हायला आणि त्यामुळे शहरातलं तापमान कमी होण्यास , हवा शुध्द होण्यासही मदत होत असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे.

मध जरी आपण आवडीने खात असलो तरी कडाडून डंख मारणाऱ्या मधमाशीपासून आपण दहा हात दूरच राहातो. आपल्याला मधमाशीचं कडकडून चावणंच माहीती. पण मधमाशा एकूण जीवसृष्टीसाठी खूप महत्त्वाच्या असून त्यांची संख्या वाढवण्यासाठी जगात आता प्रयत्न सुरु झाले आहेत. मधमाशांचं हे जग समजून घेण्यासाठी मधमाशांशी आपली दोस्ती असणंही गरजेचं आहे! तुम्हाला काय वाटतं?

काय वाटलं वाचून? मजा आली? नवीन काहीतरी कळलं? प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! -कसं कळवणार?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact