आरुषीने शोधला वाया जाणारं पाणी वाचवण्याचा प्रभावी उपाय!

Image: .aqua-pods.net

आरुषी वाधवा ही १८ वर्षांची तरुणी कॅलिफोर्नियामध्ये राहाते. अगदी लहानपणापासूनच आपण आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं तिला वाटायाचं. ती जेव्हा सातवीत होती तेव्हा तिच्या इच्छेला एक मार्ग सापडला. जगात एकीकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे तर दुसरीकडे झाडांना नको इतकं पाणी घालून पाणी अक्षरश: वाया घालवलं जातं. जसं माणसांचं तसंच झाडांचं आणि वनस्पतींचंही असतं. जास्त पाणी प्यायल्यास आरोग्यास त्रास होतो तसंच गरजेपेक्षा जास्त पाणी झाडांना घातल्यास झाडांनाही तोटा होतो आणि पाणीही वाया जातं,असं होणारं दुहेरी नुकसान टाळण्यासाठी आरुषीनं झाडांना हवं तितकंच पाणी आणि पोषण देणारे ॲक्वा पाॅड्स ( एक प्रकारचा स्पंज) तयार केले. आरुषीच्या वाया जाणारं पाणी वाचवणाऱ्या या शोधाचं जगभरात कौतुक तर झालंच शिवाय या नाविन्यपूर्ण शोधासाठी आरुषीला इको हिरो २०२१ हा मानाचा पुरस्कारही मिळाला.

हेही वाचा!

ॲक्वा पाॅडस तयार करणारी आरुषी पाणी पर्यावरण याबाबत फारच जागरुक आहे. पर्यावरण प्रश्नाविषयीच्या अनेक बाबी तिला केवळ वाचन  आणि निरिक्षणातून समजत गेल्या. मनुष्य पाणी किती वाया घालवतो, हे तिला या माध्यमातूनच समजत गेलं. एक अभ्यास सांगतो की ४ ट्रिलियन क्युबिक मीटर्स ताजं गोड पाणी दर वर्षी वापरलं जातं. त्यातील ७० टक्के पाणी हे शेती आणि सिंचनासाठी वापरलं जातं. त्यातील ५० टक्के पाणी हे शेतीला, झाडांना जास्त पाणी घालून, बाष्पीभवन , वारा, वाहून जाणे या पध्दतीने वाया जातं. तर ४३ देशातील  ७० कोटी लोकं हे आपल्या दररोजच्या आयुष्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करतात. अशा या अभ्यासाच्या निष्कर्षातूनच आरुषीला झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देवून पाणी वाया घालवण्याच्या समस्येवर उपाय शोधायचा होता.

२०१७ पासून आरुषी ॲक्वा पाॅड या स्पंजच्या निर्मिती प्रक्रियेत गुंतलेली होती. हा स्पंज तिने सर्व नैसर्गिक घटक वापरुन तयार केला आहे. त्यात काॅफी बियांपासून काॅफी तयार केल्यानंतर उरणारा भुसा, बटाटे आणि केळाची सलां यांचा वापर  केला आहे.  आरुषीने वापरलेल्या या नैसर्गिक घटकांमुळे हे ॲक्वा पाॅड झाडांच्या मातीची सुपिकता वाढवण्यासही उपयुक्त ठरतात.  शिवाय या स्पंजचा कचराही होत नाही . कारण हे ॲक्वा पाॅड १०० टक्के नैसर्गिकरित्या कुजणारे आहे. हे ॲक्वा पाॅडस झाडांच्या मुळाशी ठेवले की या स्पंजमध्ये साठलेलं पाणी आणि त्यातील पोषक घटक प्रसरण आणि परासरण ( पसरणे आणि शोषणे) या प्रक्रियेद्वारे झाडंना पोहोचतं.

Image: nhl.com

आरुषीने वाया जाणारं पाणी वाचवणारा हा ॲक्वा पाॅड्सचा पर्याय प्रत्यक्षात्यात तयार करण्यासाठी, त्याबाबात संशोधन करण्यासाठी , या उत्पादनाच्या चाचण्या घेण्यासाठी तिने एक टीम तयार केली. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर याचं तात्पुरतं पेटंटही मिळवलं. आरुषी आणि तिच्या टीमने तयार केलेले ॲक्वा पाॅडसचं वितरण कॅलिफोर्नियामध्ये झालं आहे. शिवाय सामाजिक संस्थांसोबत पार्टनरशिप ( भागिदारी) करुन त्याद्वारे ते केनया, भारत या देशातही वितरित करण्यात येत आहे. येत्या दहा वर्षात हे ॲक्वा पाॅडस आरुषीला जगातल्या प्रत्येक खंडातल्या देशांपर्यंत पोहोचवायचं आहे. शिवाय ॲक्वा पाॅडस तयार करणाऱ्या कंपनीला पार्टनर करुन ॲक्वा पाॅडसचं उत्पादन वाढवायचं आहे. या उत्पादनाच्या विक्रीतून जो नफा येईल तो तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर देणगी स्वरुपात द्यायचा आहे.

Image: nhl.com

आपल्या या ॲक्वा पाॅडसच्या प्रोजेक्टबद्दल बोलताना आरुषी सांगते की आपण जे शिकतो, ते जर डोळे, डोकं उघडं ठेवून शिकलो, आपण काय शिकलो याचं मनन केलं, जे शिकलो त्याचा उपयोग करुन बघितला की ॲक्व पाॅड्स सारखे पर्यावरणाला पुरक आणि फायदेशीर गोष्टी तयार होतात. सातवीच्या विज्ञानाच्या पुस्तकात घटक पसरणे ( पसारण) घटकांचं शोषण होणं ( परासरण) या संकल्पना शिकण्यास होत्या. शिवाय घरी आई बाबा बागेतल्या झाडांसाठी चहाची पानं, काॅफीचा भुसा यांचा खत म्हणून वापर करायचे. शाळेत जे शिकत होते, घरी जे पाहात होते त्याचं एकत्र मिश्रण करुन जी नवीन गोष्ट शोधली ती म्हणजे ॲक्वा पाॅडस . कोणत्याही समस्येवरचा उपाय शोधणं अवघड असलं तरी अशक्य नसतं असं आरुषी म्हणते. त्यासाठी आपल्याला आपल्याकडच्या ज्ञानाला आवाहन द्यावं लागतं, आपल्याला खूप प्रश्न पडावे लागतात, त्याच्या उत्तरांचा आपण न कंटाळता आणि थकता शोध घ्यावा लागतो. , जे शिकलोय, जे पाहिलंय त्यातून जे सूचतंय ते कृतीत उतरवून पाहावं लागतं. तेव्हा यश नक्की मिळतं.

आरुषी म्हणते की, या पृथ्वीचं भविष्य आम्हा तरुणांच्या हातात आहे. आज या पृथ्वीवर पाण्याची कमतरता, हवामान बदल, जागतिक तापमान वाढ असे एकापेक्षा एक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मी लोकांसोबत, शासनासोबत मिळून समस्यांवर उपाय शोधण्याचे, पर्यावरण समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तुम्ही काही तरी करा असं तरुणांना आवाहन करण्याचे प्रयात्न चालूच ठेवणर आहे असा आरुषी वाधवाचा ठाम निश्चय आहे. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५०० 

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact