एक फोटो खूप काही सांगतो! विहानने काढलेल्या फोटोने वेधलं जगाचं लक्ष!

Image: newindianexpress

बंगळूर शहरातला विहान तल्या हा १० वर्षांचा मुलगा. विहानला निसर्गाच्या सान्निध्यात राहायला फार आवडतं. निसर्गातल्या बारीक सारीक गोष्टींचे निरिक्षण करायला फार आवडतं. निसर्गात रमणाऱ्या विहानला फोटोग्राफीचा , तीही वन्यजीवांची फोटोग्राफी ( वाइल्डलाइफ फोटोग्राफी) करण्याचा छंद आहे. विहानचे बाबाही वन्यजीव फोटोग्राफर आहेत. त्यांच्याचमुळे लहानगा विहानदेखील फोटोग्राफीकडे आकर्षित झाला. आपल्या वडिलांप्रमाणे त्यालाही वन्यजीवांचे फोटो काढायला आवडतात. विहान ७ वर्षांचा होता तेव्हापासूनच फोटो काढतो. कुमारन्स स्कूल या शाळेत शिकणाऱ्या विहानचं वय लहान असलं तरी फोटोग्राफीची समज, तंत्र, फोटोमागचा दृष्टिकोन या सर्व गोष्टी विहानने आत्मसात केल्या असून त्याच्या बळावरच तो लहान वयातही उत्तम आणि अर्थपूर्ण फोटो काढतो. विहानला त्याने काढलेल्या एका छायाचित्रासाठी नुकताच ' वाइल्डाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे. विहानला जाहीर झालेला हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आणि मानाचा समजला जातो. या पुरस्काराला फोटोग्राफी क्षेत्रातला ऑस्कर असं संबोधलं जातं.

लंडनमधील ' द नॅच्युरल हिस्ट्री म्युझियम'ने वाइल्डला इफ फोटोग्राफर ऑफ द इयर ही स्पर्धा आयोजित केले होती. या स्पर्धेसाठी जगभरातून ४९,९५७ प्रवेशिका आल्यात. ११ वेगवेगळ्या गटांममधून ५०,००० फोटोंमधून १०० फोटो निवडले गेले. त्यात विहान ताल्याने १०  वर्षांखालील वयोगटातला पुरस्कार जिंकला.

हेही वाचा!

विहानच्या फोटोत असं काय होतं?

विहानच्या ज्या फोटोला वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला तो फोटो बंगळूर शहरा बाहेरचा आहे. एका भिंतीवर बासरी वाजवणारा कृष्ण कोरण्यात आला आहे. विहानला या भिंतीवर या कोरीव कामाच्या जवळ एक दुर्मिळ होत चाललेला 'ऑर्नेमेण्टल ट्री ट्रंक स्पायडर' आढळला. हा विशिष्ट कोळी विहानने जराही वेळ न दवडता कॅमेराबध्द केला. विहानने काढलेल्या फोटोत बासरी वाजवणारा कृष्ण आणि त्याच्याजवळ हा विशिष्ट कोळी आढळतो. विहानने आपल्या फोटोतून धोक्यात आलेल्या कोळ्याच्या दुर्मिळ प्रजातीकडे, त्याच्या वैशिष्ट्यांकडे जगाचं लक्ष वेधलं. लहान मुलाची फोटोमागील या दृष्टीचं लोकं कौतुक करत आहेत.

पुरस्कार मिळाल्यानंतर विहानचा फोटो विस्मरणात जाणार नाही. हा फोटो मोठा प्रवास करणार आहे. हा फोटो 'द नॅच्युरल हिस्ट्री म्युझियम',मध्ये भरणाऱ्या फोटोग्राफर ऑफ द इयर या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. वन्यजीवांच्या सुरक्षा संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी ४ खंडातील २५ देशांमध्ये हा फोटो पुढे प्रवास करणार आहे.

Image: newindianexpress

आपल्या छंदामुळे आपण निसर्गात अधिक एकरुप होवून काम करणार असल्याचं विहान सांगतो. निसर्गातल्या छोट्यात छोट्या गोष्टी त्याला आपल्या फोटोंमध्ये टिपायच्या आहेत. शाळा, अभ्यास सांभाळून विहान आपला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचा छंदही जोपासतो आहे. जगाचं लक्ष आपल्याकडे जावं इतकं चांगलं काम करण्यासाठी वयाची अट नसते. आपली आवड आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आकर्षक काम करुच शकतो.. वयाने लहान असणारा विहान आपल्या कामाकडे किती गांभिर्याने बघतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल !

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact