कोकाटोज म्हणजे पांढरे पोपट.आपल्या गरजांसाठी टूलकिट वापरतात!

Image: animals.net

पोपट म्हटल्यावर आपल्या डोक्यात तो हिरव्या रंगाचा असणार, त्याची चोच लाल असणार, तो मिठू मिठू बोलणार हे पक्कं असतं. पण डोक्यावर तुरा सदृश्य पिसे असलेला पांढरा/करडा/गुलाबी किंवा काळा रंगाचा पोपट तुम्ही पाहिला आहे का? खरंतर तुम्ही अशा पक्ष्याला पोपटच म्हणणार नाही. पण हा पोपटच आहे. पोपटाच्या प्रजातीचा असूनही वेगळा दिसणारा आणि वेगळा वागणारा कोकाटोज. हे कोकाटोज म्हणजे पोपटच. पण अनेक बाबतीत पोपटापेक्षा कोकाटोज फारच वेगळे दिसतात. कोकाटो पक्षी पाळले जातात आणि त्यांनाही माणसांमध्ये राहायला खूप आवडतं. आपल्या आसपास माणसं असायलाच हवीत असा त्यांचा हट्ट असतो.  कोकाटोज हे काकाटुड्ये या कुळातले असून ते ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, सोलोमन बेट आणि न्यू जिनिव्हा येथे आढळतात. कोकाटोज पक्षी खूप हुशार असतात आणि भावनिकही खूप असतात. अभ्यासक कोकाटोजची तुलना २ वर्षांच्या मुलांशी करतात. या वयातली मुलं कशी मध्येच रागावतात तर मधेच वेड्यासारखी वागतात. तसेच कोकाटोजही वागतात.

कोकाटोज हे हुशार असतात पण ते किती बुध्दिमान असतात हे मात्र आतापर्यंत माहित नव्हतं. पण त्याचं उत्तर आता मिळालं आहे. हे कोकाटोज हुशार असतात, बुध्दिमान असतात, त्यांची आकलन शक्ती चांगली असते. समोरची परिस्थिती समजून योग्य गोष्टींचा वापर करण्याच्या बाबतीत ते चिंपाझी इतके बुध्दिमान असतात हे संशोधकांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिलं आहे. कोकाटोजमध्ये एकापेक्षा अनेक साधनं वापरुन समस्या सोडवण्याचं कौशल्य असतं, जे फार कमी प्राण्यांमध्ये आढळतं. नवीन संशोधनानुसार कोकाटोज हे पहिले पक्षी आहेत जे स्वत:ची गरज ओळखून त्याप्रमाणे एकापेक्षा जास्त साधनं (टूलकिट) वापरतात. आपलं टूलकिट ते सोबत घेवूनही उडतात. आपली गरज पूर्ण करण्यासाठी सोबत आणलेल्या टूलकिटचा हुशारीने वापर करतात. ऑस्ट्रिया आणि लंडन येथील संशोधकांनी गुफिन जातीच्या १० कोकाटोजवर प्रयोग केला. या प्रयोगाचे निष्कर्ष 'करंट बायोलाॅजी' या जर्नलमध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत. हे निष्कर्ष कोकाटोजबद्दल जगाला माहित नसलेल्या गोष्टी सांगतात.

हेही वाचा!

कोकाटोज हे बुध्दिमान पक्षी कसे?

संशोधकांनी ज्यांच्यावर प्रयोग केले ते गाॅफिन्स कोकाटोज हे इंडोनेशियामधील टनिंबार बेटावरील छोटे पांढरे पक्षी आहेत. हे कोकाटोज जंगली भागात आपल्या चोचीत टूल किट घेवून उडताना बघितल्यावर संशोधकांनी प्रयोगासाठी गाॅफिन्स कोकाटोज घेतले. व्हिएन्ना येथील गाॅफिन लॅबमधील कोकाटोजवर संशोधकांनी प्रयोग केलेत.

यापूर्वीच्या अभ्यासात मनुष्याव्यतिरिक्त चिंपाझी आणि तेही गोउलोउगे ट्रिएंगल चिंपाझी जे उत्तर कांगो प्रजासत्ताक येथे आढळतात फक्त तेच टूलकिट्स वापरतात. चिंपाझी जसे वाळवीच्या उंचवट्याला पहिले एका बोथट काडीने छिद्र पाडतात आणि नंतर दुसऱ्या टोकदार काडीचा उपयोग करत उंचवट्यातील वाळवी कोरुन खातात. चिंपाझीच्या या अनुभवावर आधारित कोकाटोजसाठी प्रयोगाची रचना करण्यात आली.

संशोधकांनी एक खोकं घेतलं.  त्या खोक्याच्या आत काजू होते. या कोकाटोजना त्यांच्यातील कौशल्याच्या सहाय्याने या खोक्याला भोक पाडून त्यातील काजू काढायचे होते. या प्रयोगात काही  कोकाटोजने ही समस्या काही वेळातच सोडवली. अगदी ३१ सेकंदात. प्राथमिक साधनांचा वापर करणं हे प्राण्यांमधलं सर्वसामान्य कौशल्य. पण आपल्या समोरील समस्या सोडवण्यासाठी एकापेक्षा अधिक साधनांचा वापर करण्याचं सूचणं ही बाब मात्र सामान्य नाही.

हेही वाचा!

Image: eurekalert.org

दहापैकी चार कोकाटोज हे पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरले. एका कोकाटोजने या प्रयोगात रसच नसल्याने त्याने तो सोडून दिला.

दुसरा प्रयोग कोकाटोजमधील साधनं वापरण्याची लवचिकता तपासण्यासाठीचा होता. कोकाटोज हे आपल्यासमोरील समस्या सोडवण्यास योग्य साधनं निवडतात का? हे या प्रयोगातून पाहिलं गेलं. या प्रयोगात ढोबळपणे कोकाटोज समोर एक खोकं ठेवलं गेलं. आतले काजू काढण्यासाठी एक किंवा जास्त साधनं (टूल्स) वापरावे लागणार होते. तर या प्रयोगातही सहभागी झालेले कोकाटोज यशस्वी ठरले.

शेवटच्या प्रयोगात संशोधकांनी खोकं अशा ठिकाणी ठेवलं जिथे कोकाटोजना उडत जावं लागणार होतं. या प्रयोगात कोकाटोज समस्या ओळखून/गरज ओळखून त्यासाठीची आवश्यक साधनं घेवून उडतात का? हे या प्रयोगात तपासलं गेलं. समस्या सोडवण्यासाठी जेव्हा एकापेक्षा जास्त साधनं लागणार असतात तेव्हा कोकाटोज वेळ वाचवण्यासाठी दोन्ही साधनं एकदम घेवून उडतात का? हेही तपासलं गेलं. तर संशोधकांना आढळं की प्रयोगात सहभागी चार कोकाटोजने आपली गरज ओळखून त्यासाठीची दोन साधनं (टूल्स) एकाच वेळेस चोचीत उचलली आणि उडत ते खोक्याजवळ आलेत. परिस्थितीनुरुप गरज ओळखणे आणि तशी साधनं निवडणं, समस्या सोडवणे याद्वारे कोकाटोजची आकलन क्षमता तपासली गेली.

प्रयोगाच्या नंतरच्या टप्प्यात कोकाटोजची तुलना माणसाच्या लहान मुलांशी केली गेली. यात संशोधकांना आढळलं की प्रत्येक कोकाटोजची टूल्स घेवून उडणं टूल्सचा वापर करणं यात फरक होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकाटोज हे सर्व आवडीने आणि खेळीमेळीने करत होते. कुतुहलाने शिकत होते.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact