- शिवान दर्डा
मधमाश्यांच्या गुणगुणण्याचा आवाज आला, की आपल्यापैकी बहुतेकांना वैताग तरी येतो किंवा भीती तरी वाटते. पण आपली परिसंस्था चालती ठेवण्यामध्ये या काळ्यापिवळ्या किड्यांचा फार महत्वाचा सहभाग असतो. इतका महत्वाचा, की त्यांची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. त्या इतकं महत्वाचं काय काम करतात ते समजून घेऊया.

परागीकरण - मधमाशीचं प्राथमिक काम
मधमाश्या एका फुलावरचे पराग दुसऱ्या फुलावर घेऊन जाण्यात भलत्याच तरबेज असतात. परागीभवन या क्रियेने फुलांचं पुनरुत्पादन होतं आणि त्यातून फळं आणि बिया तयार होतात. काही प्रजातींच्या मधमाश्या चक्क ‘बझ पॉलिनेशन’ करू शकतात. म्हणजे त्यांच्या पंखांच्या कंपनांमुळे टोमॅटो, किवी आणि ब्लूबेरीजसारख्या वनस्पतींचे पराग बाहेर पडण्याची प्रक्रिया जास्त चांगल्या पद्धतीने होते. मधमाश्यांमुळे केवळ पिकांचं परागीभवन होतं असं नाही, तर जंगली झाडाझुडूपंसुद्धा परागीभवन होण्यासाठी मधमाश्यांवर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्या परिसंस्थेतील जैवविविधता टिकवणं आणि वन्यजिवांना जगवणं यातही मधमाश्यांची भूमिका महत्वाची ठरते.
याव्यतिरिक्त अमेरिकेत फक्त मधमाश्यांनी केलेल्या परागीभवनामुळे अर्थव्यवस्थेत १५ बिलियन डॉलर्स म्हणजे लाखो करोड रुपयांची भर पडते. जागतिक पातळीवर विचार केला तर मधमाश्या दरवर्षी लाखो लोकांच्या जगण्यासाठी कोट्यावधी डॉलर्सची भर घालतात.
हेही वाचा!
मधमाश्यांची रोडावणारी संख्या
मधमाश्या पर्यावरण आणि अर्थकारणामध्ये कितीही मोलाची भूमिका बजावत असल्या तरी त्यांच्या संख्येला आणि अस्तित्वालाच धोका निर्माण होईल अशी अनेक संकटं त्यांच्यासमोर आहेत. हवामानबदल, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, रोग आणि मधमाश्यांना राहण्यायोग्य ठिकाणांचा अभाव ही मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागची काही महत्वाची कारणं आहेत.


ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो?
सुदैवाने मधमाश्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. स्थानिक प्रजातींची फुलझाडं लावणं, कीटकनाशकांचा वापर कमी करणं आणि स्थानिक मधमाश्या पाळणाऱ्यांना मदत करणं यासारख्या काही गोष्टी व्यक्तिगत पातळीवर करू शकतो. सरकार आणि मोठ्या संस्था मधमाश्याना हितकारक ठरतील अशी धोरणं आखून मधमाश्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करू शकतात.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact