सायकलप्रेमी शहरं तुम्हालाही सायकलच्या प्रेमात पाडतील!

 Image: freepik

कारमध्ये बसून फिरायला कोणाला आवडत नाही? लहानपणापासून सगळ्यांनाच बाइकचं आणि चारचाकी गाड्यांचं वेड असतं, इतकं की आपल्या खेळण्यात जास्त गाड्याच असतात. वेगवेगळ्या बाइक, कार, त्यांचे ब्रॅण्ड, त्यांची वैशिष्ट्य ही तर आपल्याला फाडफाड सांगता येतात. सहावी सातवीत जात नाही, तोच आपल्याला टू व्हिलर शिकण्याचे वेध लागतात. आपण कधी एकदा मोठे होतो आणि आपल्याला गाडी चालवायला मिळते असं वाटायला लागतं.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गाड्यांचं वेड असतं. पण माझा एक प्रश्न आहे, तुम्हा सगळ्यांना, जितकं प्रेम, आकर्षण आपल्याला गाड्यांबद्दल वाटतं, तितकं प्रेम सायकलबद्दल वाटतं का? किती जणांना सायकल मनापासून चालवायला आवडते? मला माहित आहे सायकल मनापासून आवडते असं म्हणणारे नक्कीच थोडे असतील. नाईलाज म्हणून शाळा क्लासला सायकल वापरणारे एकदा काॅलेजला गेले की सायकलकडे ढुंकूनही पाहात नाही. मोठ्यांनाही पेट्रोलचा खर्च परवडत नसला तरी लांब जायचं असू देत नाहीतर जवळ, ते गाडीच वापरतात. मोठं झाल्यावर अनेकांना सायकल चालवायची लाज वाटते. पण हे झालं आपल्याबद्दल . पण जगात असेही काही लोक आहेत, असेही काही देश आणि त्यातील शहरं आहेत, जे मनापासून सायकलवर प्रेम करतात. अभिमानानं, आनंदानं सायकल चालवणरेही खूप लोकं आहेत. तुम्हाला माहीती आहे का त्यांच्याबद्दल?

हेही वाचा!

आज तुम्हाला मी सायकल चालवण्याची आवड असणाऱ्या, सायकल चालवण्यावर खूप प्रेम करणाऱ्या जगातल्या काही शहरांबद्दल सांगणार आहे. या शहरांंचं, त्यातील लोकांचं सायकल प्रेम पाहिलं तर कदाचित आपल्यालाही त्यांच्यासारखी कायम सायकल चालवायला आवडू शकतं. सायकलवर प्रेम करणारी अशी कोणती शहरं आहेत?

सायकलवर प्रेम करणारे देश

मुन्स्टर

पश्चिम जर्मनीतलं मुन्स्टर हे एक मोठं शहर आहे. या शहरात रोज १ लाखापेक्षा जास्त लोक कामावर जाताना, शाळेत जाताना सायकलचाच वापर करतात. या शहरातील प्रत्येक नागरिकाकडे आपली स्वत:ची सायकल असतेच. तसेच सायकल चालवण्यासाठी येथील शासनाने विशेष व्यवस्थाही केलेली आहे. सायकल चालवणाऱ्यांसाठी ४५० किमीचा खास सायकल रस्ता आहे. शिवाय मुख्य रस्त्यावरही सायकलस्वारांसाठी एक स्वतंत्र लेनची व्यवस्था केलेली आहे. या लेनवर केवळ सायकलस्वारांनाच मुभा असते. सायकली सुरक्षित राहातील असे सायकल पार्क शहरात विविध ठिकाणी तयार केले आहेत. शिवाय सायकल भाड्याने देण्याची व्यवस्थाही जागोजागी आहे. सायकल नाही म्हणून येथे कोणाचीच गैरसोय होत नाही. शिवाय या शहरात सायकल विक्रेत्यांचं प्रमाणही खूप आहे.

Image: stadt-muenster.de

Image: bicycledutch.wordpress

ॲण्टवर्प

ॲण्टवर्प हे बेल्जियमधील मोठं शहर आहे. या शहराची ओळखच मुळी बायसिकल फ्रेण्डली शहर अशी आहे. जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न येथील शहर प्रशासन करतं. सायकल चालवण्यासाठी सिग्नलपासून रस्ते आणि सायकल पार्कपर्यंत अनेक सुविधा आहेत. त्यामुळे साहजिकच येथे जास्तीत जास्त लोकांना सायकल चालवायलाच आवडते. या शहरातील ट्रॅफिक सिग्नल चोख आहेत. या शहरातील ९५ टक्के रस्त्यांवर गाड्यांचा वेग ३० किमी प्रति तास ठेवण्याचं बंधन येथील सरकारनं घातलं आहे. रेल्वे स्टेशनवरही जास्तीत जास्त सायकली उभ्या राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील भाग एकमेकांना जोडणारे खास सायकलचे रस्ते तयार केले जात आहे.

स्ट्रासबर्ग

हे ईशान्य फ्रान्समधील अल्सास प्रांतातील प्रमुख शहर आहे. फ्रान्स देशातील हे शहर सायकलचं शहर म्हणून ओळखलं जातं. जास्तीत जास्त लोकांनी सायकलीच वापराव्यात असाच येथील प्रशासनाचा प्रयत्न असतो. उपनगरांना जोडणारे खासखास सायकलसाठीचे रस्ते तयार केले आहेत. तुम्ही स्ट्रासबर्ग मध्ये राहाणारे असा किंवा या शहराच्या बाहेर राहाणारे. या शहरात आल्यावर सायकलच्या सेल्फ सर्व्हिस स्टेशनवर किमान ६००० सायकली दिवसभर चालवण्यासाठी उपलब्ध असतात.

Image: familycantravel

 Image: strongtowns.org

कोपनहेगन

डेन्मार्क देशाची राजधानी आणि या देशातलं मोठं शहर आहे हे. या शहरातील एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के लोक ऑफिसला जाताना, शाळा -काॅलेजात जाताना सायकल वापरतत. कोपनहेगन शहरात रोज लोकं ८,९४,०००मैल सायकल चालवतात. पायाभूत सुविधात गुंतवणूक करताना येथील शासन प्रामुख्याने सायकल चालवणाऱ्यांच्या सोयी सुविधांचा विचार आधी करते.

खरंतर सायकल चालवणं हे आरोग्यासाठी लाभदायक, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही सुरक्षित पर्याय आहे. आपण जास्तीत जास्त लोकांनी गाड्यांऐवजी सायकल चालवण्याचंच ठरवलं , जास्तीत जास्त लोकं सायकल घेवून चालवायला लागले तर आपल्या शहरातील प्रशासनाली सायकल चालवणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन सायकल चालवण्यासाठी सुरक्षित रस्त्यांच्या सुविधा उपलब्ध करुन द्यावा लागतील. त्यासाठी आपल्यालाही या सायकल प्रेमी शहरांसारखं सायकलवर प्रेम करावं लागेल, चालवणार तर सायकलच असा निश्चय करावा लागेल. मग करायचा का हा निश्चय?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact