पौष्टिक खाऊच्या डब्याला कशाला आईला त्रास? हा खाऊ तुम्हीच केला तर!

Image: freepik

दोन मधल्या सुट्या असतात. मोठ्या मधल्या सुटीत भाजी पोळीचा डबा तर छोट्या सुटीत खाऊचा छोटा डबा असा शाळेचा नियम असतो. नुकतीच शाळा सुरु झालेली. त्यामुळे सुरुवातीचे 3-4 दिवस छोट्या आणि मोठ्या मधल्या सुटीत मुलं डब्बा खात असली की वर्गताई मुद्दामून डोकावून जायच्या. मुलांमधून एक चक्कर टाकायच्या. मुलांनाही वाटायचं की सहजच आल्या असतील ताई. पण तसं नव्हतं. मुलं डब्यात काय आणतात याचा वर्गताई अंदाज घेत होत्या. मोठ्या मधल्या सुटीत बहुतेक मुलं पोळी भाजी आणण्याचा नियम पाळत होते. पण छोट्या सुटीत मात्र बहुतेक मुलांच्या डब्यात ताईंना जंकफूडच जास्त दिसलं. कोणाच्या डब्यात वेफर्स, तर कुणाच्या डब्यात कुरकुरे. क्रीमची बिस्किटं, कपकेक सारखा खाऊ मुलं खात होते. एखाद्या दिवशी आवडतो म्हणून वेफर्ससारखा खाऊ खाल्ला तर हरकत नव्हती, पण मुलं सतत खाऊचा डब्बा म्हटलं की दुकानात आयता मिळणारा जंक फूड कॅटेगिरीतला खाऊ खात होती.  

हेही वाचा!

मुलांनी असा खाऊ सारखा खाल्ला तर मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतील, शिवाय जंकफूडच्या खाऊमध्ये आणि नंतर मुलांची आजारपणं निस्तरण्यात आई बाबांचाच खर्च होतो. त्यामुळे मुलांशी या छोट्या खाऊच्या डब्याबाबत बोलणं, त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक वाटलं. मुलं घरी आईने कितीही समाजावून सांगितलं तरी ऐकत नाही, पण ताईंनी सांगितलं की पटकन ऐकतात, ही पालकसभेतला पालकांची प्रतिक्रिया नेहमीचीच. तिचीच आठवण ठेवून त्यावर काही पर्याय काढावा असं वर्गताईंना वाटलं.

आठवड्यातला एक दिवस संवादाचा तास असतो. त्या दिवशी ताईंनी मुद्दाम मुलांशी या खाऊच्या डब्याबाबत चर्चा केली. त्यादिवशी ताईंनी मुलांना पौष्टिक खाऊबद्दल सांगितलं. छोट्या सुटीच्या वेळेस कोणीही जंकफूड न आणता पौष्टिक खाऊ आणायचा असा नियम सर्व मुलांनी मिळून केला. पण शिवानीने हात वर केला. तिला काहीतरी बोलायचं होतं. 'ताई आईला रोज सकाळी लवकर ऑफिसला जावं लागतं. यायलाही उशीर होतो. आईला पोळी भाजीचा डबा करायलाच किती घाई होते, मग पौष्टिक खाऊ आई कशी रोज करणार? '

शिवानीचा प्रश्न अगदी बरोबर होता. शिवानीच्या आईप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईला पौष्टिक खाऊ करायला वेळ मिळेलच असं नाही. ताईंनी पौष्टिक खाऊमध्ये तुम्ही काय काय खाऊ आणू शकता हे सांगितलं. भाजलेले शेंगदाणे-फुटाणे, खजूर, राजगिरा चिक्की, राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, तिळाची चिक्की असे खाऊचे पर्याय सांगितले. यातला सर्वच खाऊ विकत मिळतो. पण ठरवलं तर काही खाऊ आपण आईला फारसा त्रास न देता घरी स्वत:च्य हातानंही तयार करु शकतो. आपल्या स्वत:च्या हातानं पौष्टिक खाऊ ही संकल्पना मुलांना खूपच आवडली. मग चर्चेअंती शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की करण्याचं ठरलं.  ही चिक्की शाळेत छोट्या सुटीला खाऊ म्हणून आणू शकतो शिवाय घरी अभ्यास करताना मधेच भूक लागते, तेव्हाही ही चिक्की खाऊ शकतो आणि संपली की पुन्हा पुन्हा बनवून ठेवू शकतो ना ताई' असं सोहम म्हणाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून सोहमच्या म्हणण्याला दाद दिली. आता प्रश्न होता ही शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की करायची कशी? ताईंनी मुलांना चिक्की करण्याची रेसिपी समजावून सांगितली. एकदम सोपी होती रेसिपी. वाचून तर पाहा!

शेंगदाणाच्या कुटाची चिक्की करताना..


शेंगदण्याच्या कुटाची चिक्की करताना एक वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. अर्धी वाटी साखर घ्यायची. आपल्याला चिक्की करायला सुरुवात करण्याच्या आधी एका ताटाला आणि वाटीला थोडा तुपाचा हात लावून ठेवायला लागेल. कारण चिक्की फार पटकन होते आणि ती झाल्याच्या नंतर हे सगळं करायला वेळच नसतो. शिवाय एका सुरीला पण तूप लावून ठेवायचं.

आता एका कढईत अगदी चमचाभर तूप घालावं. मग त्यात साखर घालावी. गॅस सुरु करावा.पण चिक्की पटकन व्हावी म्हणून मोठा करु नये. तो मध्यम किंवा बारीक ठेवावा. जरा वेळात सगळी साखर वितळेल, ती वितळेपर्यंत सतत हलवत रहावं. साखर वितळली की त्यात शेंगदाण्याचा कूट घालावा. तो पूर्ण मिसळला की गॅस बंद करावा आणि ते मिश्रण ताटात लावून ठेवलेल्या तुपावर ओतावं आणि तूप लावलेल्या वाटीने एकसारखं पातळ थापावं. ते गार व्हायच्या आत तूप लावलेल्या सुरीनं त्याच्या वड्या पाडाव्यात.

Image:thestateplate

ही चिक्की करायला फक्त पाच मिनिटं लागतात आणि नंतर ती गार व्हायलाही पाचच मिनिटं लागतात. शक्यतो सुरुवातीला घरातल्या कुठल्यातरी मोठ्या माणसाला बरोबर घेऊन हा उद्योग करावा. आणि मग गंमत बघा. काही दिवसांनी आई -बाबा ऑफिसला जाताना पौष्टिक खाऊ म्हणून तुम्ही केलेली ही शेंगदाण्याची कुटाची चिक्की कौतुकाने नेतील.

कशी वाटली तुम्हाला या पौष्टिक खाऊची आयडिया. करुन बघाल ना मग शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की. तुमची ही चिक्की कशी झाली हे ऊर्जालाही नक्की कळवा आणि आपल्या हाताने आपण आणखी कोणते पौष्टिक खाऊ करु शकतो हे देखील कळवाल ना!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact