गोष्ट एक कष्टाळू दादा आणि त्याच्या समजूतदार बहिणीची

- शिल्पा दातार

Image: freepik

ईशान्य भारतातलं ते छोटंस गाव. अगदी साधंसुधं. गावाच्या आजूबाजूला डोंगर आणि भरपूर झाडं. लांब लांब अंतरावर घरं. तुम्ही पाहिली आहेत का कधी अशी गावं? तिथं फार आधुनिक सोयीही नसतात. पण स्वच्छ पाण्याचे झरे, पक्ष्यांचा आवाज, पानांची सळसळ यांचा अनुभव घेता येतो. अशाच एका अगदी छोट्या घरात छोटी बिंदू आणि तिचा दादा राहत असतात. बिंदू शाळेत शिकत असते. तिचा दादा मोठा असतो. बिंदूचे बाबा पण दादाच असतो आणि आईपण दादाच. तो तिची खूप छान काळजी घेत असतो. सायकलवरून तिला शाळेत सोडून तो कामाला जात असतो.

त्यांचं घर म्हणजे एक दगडी छोटी खोली असते. त्या घरात विंचू, सापसुरळी कधीही येऊ शकेल, अशी त्याचं दार आणि खिडकी असते. कारण घराच्या खिडकीला काचच नसते. पण बिंदूला अजिबात भीती वाटत नाही. कारण तिच्या आजूबाजूलाही काही घरं तशीच असतात.

हेही वाचा!

बिंदू शाळेत जाते खरी, पण तिचे शाळेचे बूट फाटलेले असतात. शाळेच्या बॅगेची चेन तुटलेली असते. रंगीत खडू ती पुरवून परवून वापरत असते. आपल्याकडं कसं आपल्या स्कूल बॅगेला जरा काही झालं किंवा चप्पल जुनी वाटली तरी आई-बाबा लगेच नवीन आणून देतात. नवीन पुस्तकं देतात. बिंदूचं तसं नव्हतं. तिला आई-बाबाच नव्हते. फक्त कष्ट करणारा, तिच्यावर प्रेम करणारा हसतमुख दादा होता. अशा गरिबीतही हे बहीणभाऊ आनंदात राहात असतात. तिला वाटत असतं, तिच्या दादाच्या स्लिपरला भोक पडलेलं असलं तरी तो स्वतःसाठी स्लिपर घेत नाहीये. आपला दादा आपल्यासाठी किती काय काय करतो? दादालाही वाटत असतं की बिंदू खूप समजूतदार आहे. बॅगेची चेन तुटलेली असली, बूट फाटलेला असला तरी अजिबात तक्रार करत नाही.

छोट्या बिंदूला उठवून तयार करणं, तिच्या वेण्या घालून देणं, तिला डबा देणं... रोज तिला सायकलवरून शाळेत सोडणं... येताना पैसे देऊन ‘चालत घरी जाऊ नको, टेंपोने जा’, असं काळजीने सांगणारा तिचा दादा बघून आपल्यालाही इतका चांगला दादा असावा असं वाटतं.

दादा सायकलवरून पेपर टाकण्याचं काम करत असतो. गाड्या धुण्याचं काम करत असतो. अशी छोटी मोठी कामं करून तो घर चालवत असतो. आपण बिंदूला चांगले बूट, दप्तर देऊ शकत नाही, याचं त्याला फार वाईट वाटत असतं. असे हे एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे बहीण-भाऊ आपल्याला ‘बिंदू’ या शॉर्ट फिल्ममधून भेटतात. ते दोघं आपल्याला खूप आवडतात. त्यांचं नातं आपल्याला खूप छान वाटतं.

ही गोष्ट पाहताना सतत एकमेकांचा विचार करणारे बिंदू आणि तिचा दादा एकमेकांसाठी काय काय करतात,  कसं एकमेकांना सरप्राइज देतात, हे बघण्यासारखं आहे. ही लघुकथा पाहताना आपण अगदी बिंदू आणि तिच्या दादाच्या गावातच जातो.

 Image: .freepik


तुम्हालाही ही लघुकथा पाहायला खूप आवडेल. बहीण-भावाचं नातं किती सुंदर असू शकतं, हे पाहायला मिळेल. चला, मग पाहताय ना तुमच्या ताई-दादाबरोबर ही शॉर्ट फिल्म!

लघुपटाचं नावः बिंदू

कुठं पाहाल? यूट्युब, फेसबुक

https://www.youtube.com/watch?v=_Kypeb2XhEw

mrs.shilpapankaj@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact