३२,००० कि.मी. प्रवास तोही सायकलने.कसं शक्य आहे? लियाम गार्नरलाच विचारा!

 Image: bicycling.com

आपला निश्चय पक्का हवा, मग काम किती का अवघड असेना, ते साध्य करता येतं. हे सांगणारा लियाम गार्नर हा वयाने फार काही मोठा नाही. तो आता १९  वर्षांचा आहे. पण त्याने जेव्हा एक अवघड ध्येय पार करायचं ठरवलं तेव्हा तो १७ वर्षांचा होता. लियाम गार्नर हा कॅलिफोर्नियातील लाॅंग बिच शहरात राहाणारा आहे. त्याला वेगवेगळे साहस करायला फार आवडतं. हायस्कूलमधून ग्रॅज्युऐट झाल्यानंतर त्याला काहीतरी साहस करुन पाहावं  असं वाटायला लागलं. लियामला सायकलवर लांब लांब फिरण्याची आवड आहे. त्याने लाॅस एंजलिस ते सॅन्सफ्रान्सिस्को हे ६१३ कि.मी. अंतर सायकलवर पार केले होते.आता यापेक्षा आणखी काहीतरी वेगळं, अचाट आणि अवघड करण्याची इच्छा त्याला झाली. त्याने पुन्हा सायकलवर लांबचा प्रवास करण्याचं ठरवलं. यासाठी त्याने उत्तर अमेरिकेच्या टोकावरुन दक्षिण अमेरिकेच्या टोकापर्यंत  सायकलने जायचं ठरवलं.  

हेही वाचा!

उत्तर अमेरिकेचं टोक म्हणजे अलास्कतील प्रुधोए बे ते दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनातील उशुएयिया. हे अंतर ३२,००० किमी इतकं.  इतक्या लांब त्याने जावू नये असं त्याच्या आई बाबांना वाटत होतं. पण लिआम हट्टी आहे आणि तो जे ठरवतो,  ते तो करतोच, हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी लियामला फार विरोध केला नाही. उलट लियामचा निर्णय पक्का आहे याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लियामला पाठिंबा द्यायचं ठरवलं.

सर्व तयारी करुन १ ऑगस्ट २०२१ ला लियाम आपल्या सायकलवरच्या सर्वात लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी सज्ज झाला. त्याने सोबत घडी घालता येईल असा त्ंबू, स्लीपींग बॅग, एक फोन, प्राथमिक उपचार साहित्य, सायकलचे स्पेअर पार्टस , मोजकेच कपडे , थोडं खाण्याचं सामान आणि पाणी इतकंच सामान घेतलं.  लाॅस एंजलिस ते सॅन फ्रान्सिस्को असा प्रवास त्याने सायकलवर केला असल्याने सायकल प्रवासातले आव्हाने त्याला चांगली माहिती होती. त्याने त्यापध्दतीने अलास्का ते अर्जेटिना या मोहिमेची आखणी आणि तयारी केली होती.

अमेरिकेची सीमा पार करण्यास लियाम याला तीन महिने लागले. डिसेंबर महिन्यात तो मेक्सिकोला पोहोचला. मेक्सिको हे त्याचं सर्वात आवडीचं ठिकाण. कारण त्याचे आई बाबा दोघेही मूळ मेक्सिकोचे. मेक्सिकोला पोहोचल्यनंतर लियामचा पुढचा प्रवास इतका सोपा नव्हता. कारण मेक्सिकोमध्ये त्याला चोरांनी लुटले. नंतर ऊन इतकं वाढलं की त्याला सायकल चालवणं अशक्य वाटू लागलं. पुन्हा घरी परतावं की काय अशी वेळ आली होती. पण लियाम जिद्दी होता, त्याला पुढे जायचंच होतं, आपलं लक्ष्य गाठायचंच होतं.

Image: newsforkids

मध्य अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्याला पुढचा प्रवास आवाक्यातला वाटू लागला. तरीही पुढे प्रवासात त्याला पुन्हा चोरांनी लुटलं. अलास्का ते अर्जेंटिना या प्रवासात त्याला चोरांनी ५ वेळा लुटलं. दोनदा तीनदा तो खूप आजारीही पडला. एकदा सायकलवरुन पडून त्याला गंभीर दुखापत झाली. खरंतर शस्त्रक्रिया करण्याची गरज असतानाही लियामनं पुढे प्रवास करण्याचं ठरवलं. ऊन, वारा, पाऊस, थंडी, वाळवंट, डोंगर या सगळ्या गोष्टींनी लियामला प्रवासात गाठलं. पण लियाम कोणत्याच परिस्थितीने डगमगला नाही. त्याने आपला प्रवास सुरु ठेवला.

Image: newsforkids

१० जानेवारी २०२३  रोजी लियाम दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना येथील उशुएयिया या ठिकाणी पोहोचला.  ३२,००० कि.मी. अंतर लियामने ५२७ दिवसात सायकलवर प्रवास करुन गाठलं. या प्रवासात त्याने १४ देश ओलांडले.  लियाम प्रवासाला निघाला तेव्हा १७  वर्षांचा होता, तो जेव्हा अर्जेंटिनाला पोहोचला तेव्हा तो १९ वर्षांचा झाला होता. आपल्या या साहसी प्रवासावर लियाम पुस्तक लिहिणार आहे. आपलं पुस्तक वाचून इतर मुलांनाही साहसी गोष्टी करण्याची प्रेरणा मिळावी, ते जर काही साहस करण्याचं ठरवत असतील तर त्यांना मदत व्हावी म्हणून लियाम आपल्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिणार आहे.

लियाम म्हणतो की ठराविक लोकांनाच साहस करता येतं, जगावेगळं काम करता येतं असं नाही. उलट वेगळं काही करण्याची प्रत्येकात क्षमता, ताकद असते. फक्त काहीतरी मिळवण्यासाठी, आपलं लक्ष्य गाठण्यासठी आपला आपल्यावर विश्वास असायला हवा!

लियामच्या या साहसी प्रवासाबद्दल वाचून तुम्हाला काय वाटलं, काय प्रश्न पडले, तुम्हाला काही वेगळं करावंसं वाटंत का, त्यात तुम्हाला काय अडचणी जाणवतात हे मला नक्की लिहून पाठवा. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact