आदित्य मुखर्जी हा १८ वर्षांचा तरूण मुलगा हरियाणामधील गुरुग्राम या शहरात राहातो. गेल्या चार वर्षांपासून आदित्य एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तुंचा वापर ( सिंगल यूज प्लॅस्टिक) कमी होण्यासाठी एक मोहीम राबवत आहे. या सिंगल यूज प्लॅस्टिक वस्तूंच्या ऐवजी कोणत्या गोष्टी वापरता येतील याचे पर्यायही तो लोकांना आपल्या मोहीमेद्वारे सांगत आहे. लोकांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वस्तू, जसे स्ट्राॅ, बाटल्या, सॅशे, पाउचेस म्हणजे मानवाने लावलेला घातक शोध असल्याचं आदित्य म्हणतो. कारण सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वस्तुंमध्ये पाॅलिप्राॅपिलेन नावाचा घटक वापरला जातो. या घटकामुळे सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वस्तू नष्ट होत नाही आणि त्यांचा पुर्नवापरही होत नाही. तेव्हा या गोष्टी वापरातून काढून टाकाव्यात यासाठी आदित्य लोकांची समजूत घालत आहे.
आदित्य जसजसा मोठा होत होता तशा त्याच्या कानावर जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, नैसर्गिक स्त्रोत आटत जाणे, या गोष्टी कानावर पडत होत्या. त्याचे आई बाबाही निसर्गाचं रक्षण करणं किती महत्वाचं आहे, यावर आदित्यशी बोलायचे. त्याचा परिणाम आदित्यच्या मनावर झाला. तो चौदा वर्षांचा होता तेव्हा त्याने 'चिंतन एन्व्हाॅर्यमेंटल रिसर्च ॲण्ड ॲक्शन ग्रूप' या संस्थेत एक स्वयंसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली.
या संस्थेत काम करत असताना त्याला आपल्या देशात सिंगल यूज प्लॅस्टिकचा किती वापर केला जातो, आणि त्याचा आपल्या पर्यावरणावर किती वाईट परिणाम होतो आहे, हे समजले. त्याने याबाबत अभ्यास करायला सुरुवात केली. आपल्याला आपली पृथ्वी वाचवायची असेल तर सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर थांबवणं किती गरजेचं आहे याची जाणीव आदित्यला झाली आणि त्याने सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी काम करण्याचं ठरवलं.

Image : twitter

Image : twitter
सिंगल यूज प्लॅस्टिकवर आदित्य अभ्यास करत होता, त्यातून त्याला जी माहिती मिळत होती त्याचा वापर करुन त्याने सिंगल यूज प्लॅस्टिकचा बेसुमार वापर, त्याने नष्ट न होणारा कचरा निर्माण होणे, त्याचा पर्यावरणावर आणि माणसाच्या जगण्यावर होणारा परिणाम, हा सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर कसा कमी करायचा, त्यासाठी पर्यावरणपूरक कोणते पर्याय असू शकतात अशी माहिती असलेलं एक पाॅवर पाॅइण्ट प्रेझेण्टेशनच तयार केलं. हे प्रेझेण्टेशन घेऊन तो घरोघरी जायचा. हाॅटेल, कॅफे, रेस्टाॅरण्टमध्ये फिरायचा .
आपल्या एकट्याच्या प्रयत्नाने असा कितीसा प्लॅस्टिकचा कचरा कमी होणार आहे, या गोष्टीचा विचार न करता, आदित्य काम करत राहिला. आपल्याला कोणी बोलेल, रागवेल याची भीती न बाळगता तो लोकांच्या घरी जायचा, त्यांच्याशी बोलायचा, हाॅटेल, कॅफे, रेस्टाॅरण्टमध्ये जायचा. तिथल्या मालकाशी, तिथे येणाऱ्या ग्राहकांशी बोलायचा, त्यांना आपलं प्रेझेण्टेशन दाखवायचा.
हेही वाचा!
सुरुवातीला शाळा, अभ्यास आणि काम करताना आदित्यची खूप धावपळ व्हायची. पण म्हणून त्याने काम थांबवलं नाही. शाळा आणि अभ्यास यामुळे रोज कामाला पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून तो शनिवार आणि रविवार हे दोन दिवस तो पूर्ण आपल्या कामासाठी देतो. त्याने कामाला सुरुवात केली तेव्हा आपण प्रयत्न करुन ५०,००० प्लॅस्टिकचा स्ट्राॅचा वापर थांबवायचा असं ध्येय ठरवलं होतं. पण प्रत्यक्षात त्याने २ कोटी ६० लाख प्लॅस्टिक स्ट्राॅचा वापर थांबवून दाखवला. सिंगल यूज प्लॅस्टिक न वापरण्याबाबत १५० व्यावसायिक लोकांचे ( हाॅटेल, कॅफे , रेस्टाॅरण्टचे मालक) मन वळवण्यात तो यशस्वी झाला. आता आदित्यने झाडं लावण्याच्या मोहिमेतही भाग घेतला आहे. प्लॅस्टिकचा वापर थांबवून त्याला पृथ्वी स्वच्छ आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित करायची आहे, तर झाडं लावून ती हिरवीगार करायची आहे.
आदित्यने सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर थांबवण्यासाठी सुरु केलेल्या कामाचं कौतुक फक्त गुरुग्राममध्येच झालं असं नाही. २०२० मध्ये 'ॲक्शन फाॅर नेचर' या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे 'इंटरनॅश्नल यंग इको हिरो' म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमात त्याला प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. अशी संधी मिळवणारा १८ वर्षाखालील आदित्य हा पहिला मुलगा आहे.

Image: yocee
हेही वाचा!
आदित्यने सुरु केला प्लॅस्टिकचा उपवास
सिंगल यूज प्लॅस्टिकबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आदित्यने २०१८मध्ये 'प्लॅस्टिकचा उपवास' हा एक उपक्रम राबवला. यात तो लोकांना आठवड्यातला एक दिवस प्लॅस्टिकचा उपवास धरायला लावायचा. या उपक्रमाद्वारे आदित्य आपण प्लॅस्टिकच्या वस्तूंशिवाय जगू शकतो, प्लॅस्टिकला चांगला पर्याय शोधू शकतो, आपण प्लॅस्टिक न वापरता आपली पृथ्वी वाचवू शकतो, या महत्वाच्या गोष्टींची जाणीव लोकांना करुन द्यायचा. त्याच्या या उपक्रमाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आदित्यचा प्लॅस्टिकचा कचरा कमी करण्यासाठी काम करण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास आणखीनच वाढला.
पर्यावरणाशी निगडित समस्या सोडवण्यासाठी लहान मुलं, तरुण यांनी पुढाकार घ्यायला हवा. असं झालं तर आपण सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतो, असं आदित्यला वाटतं. आदित्य म्हणतो आपण प्रयत्नपूर्वक पुढे टाकलेलं एक पाऊल आपल्याला खूप दूरपर्यंत घेवून जावू शकतो. प्लॅस्टिकमुक्त पृथ्वी हे आदित्यचं ध्येय आहे. ते पूर्ण होण्यासाठी त्याला जगातल्या सर्व मुला मुलींचा, तरुणांचा सहभाग हवा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact