माणूस पाण्याशिवाय जगू शकतो का? तर अजिबात नाही. कुठे थोडावेळ जरी बाहेर जायचं झालं तरी आपण सोबत पाण्याची बाटली घेऊन जातो. तहान लागली की पाणी पितो आणि घरी आल्यावर बाटलीत पाणी उरलं असेल तर ते पाणी ओतून देवून बाटली धुवून ठेवतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर जाताना बाटली भरुन नेतो. नुसत्या आपल्या या सवयीचं निरिक्षण केलं तरी आपण पाणी जपून वापरत नाही हे आपल्या सहज लक्षात येईल. पण आपल्या या सवयीकडे (वाईट असली तरी) पाहायला कोणाला वेळ आहे. त्यामुळे आपण किती पाणी वाया घालवतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. पण बंगळूरु मधल्या गर्विता गुल्हाटी नावाच्या मुलीनं ती जेव्हा १३ वर्षांची होती तेव्हा लोकांच्या पाणी वाया घालवण्याच्या सवयीला बदलण्याचं ठरवलं. त्याच्यामागे एक गोष्ट आहे.
हेही वाचा!
२०१५ या वर्षी संपूर्ण भारतात मोठा दुष्काळ पडला होता. एरवी गाव खेड्यात, छोट्या छोट्या तालुक्यात जाणवणारी पाण्याची टंचाई शहरी भागांनाही जाणवू लागली होती. दुष्काळाचे चटके म्हणजे काय? पाण्याची टंचाई कशी असते या गोष्टी बंगळूरु सारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या गर्वितालाही समजल्या. पण गर्विताच्या घरी एक नियम होता. ताटातलं अन्न आणि ग्लासातलं पाणी वाया घालवायचं नाही. आपण पाणी वाया घालवत नाही, या गोष्टीवर गर्विता खूष होती. २०१५ मध्येच एकदा गर्विता तिच्या आई वडिलांसोबत अहमदाबादला फिरायला गेली होती. तेव्हा ते अहमदाबादमधील एका गावात पायऱ्या असलेली प्रसिद्ध विहिर पाहायला गेले. मोठ्या उत्साहानं ते पायऱ्या उतरुन खाली पोहोचले. पण विहिर मात्र कोरडीठाक होती. केवळ विहिरच नाही तर विहिरीच्या आजूबाजुच्या परिसरात, गावात कुठेही पाणी नव्हतं. तेव्हा एक छोटीशी मुलगी धावत त्यांच्याजवळ पोहोचली. गर्विताला आणि तिच्या आई बाबांना वाटलं की, ही मुलगी त्यांच्याकडे खाऊ किंवा पैसे मागेल. पण तिने यातलं काहीच मागितलं नाही. त्या मुलीने गर्विताच्या हातातली पाण्याची बाटली मागितली. गर्विताने ती लगेच त्या मुलीला दिली. ती बाटली मिळताच त्या मुलीच्या चेहेऱ्यावर आनंद पसरला. एक पाण्याची बाटली मिळाल्याने किती आनंद होवू शकतो हे गर्वितानं त्या दिवशी पहिल्यांदा बघितलं होतं. ते फिरुन पुन्हा घरी आले. पण काही केल्या गर्विताच्या डोळ्यासमोरुन ती पाण्याची बाटली मागणारी मुलगी जातच नव्हती.

Image: shethepeople

Image: yourstory
एके दिवशी गर्विताच्या पर्यावरण शिक्षकांनी वर्गात पाण्यासंबंधीच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आपण पाण्याचा किती निष्काळजीपणे वापर करतो, पाणी कसं वाया घालवतो, हे मुलांना समजेल असं एक उदाहरण देवून सांगितलं. रेस्टाॅरण्टमध्ये आपण जेव्हा जेवायला किंवा नाश्ता करायला जातो तेव्हा ग्लासातलं पाणी संपवण्याची किंवा आपल्याला हवं तितकंच पाणी घेण्याची काळजी आपण घेत नाही. ग्लासातलं पाणी तसंच ठेवून निघून जातो.नंतर हे पाणी फेकून दिलं जातं. या एका छोट्या वाटणाऱ्या गोष्टीमुळे दरवर्षी आपण १ कोटी ४० लाख लिटर पाणी वाया घालवतो. हे ऐकल्यावर गर्विताच्या डोळ्यासमोर ती पाण्याची बाटली मागणारी तहानलेली मुलगी उभी राहिली. तेव्हाच तिने पाणी वाया घालवण्याच्या या सवयीवर काम करण्याचं ठरवलं. तिने आपली कल्पना घरी, शाळेत मित्र मैत्रिणींना सांगितली. पण सगळ्यांनी तिला या विषयावर काम करणं, म्हणजे वेळ वाया घालवणं आहे, असं सांगितलं. पण गर्विताला या विषयावर काम करायचंच होतं. ती तिच्या मैत्रिणीला घेवून जवळ्च्या रेस्टाॅरण्टसमध्ये जायची. रेस्टाॅरण्ट मालकांना ग्राहकांच्या ग्लासमध्ये पाणी उष्टं टाकण्याच्या सवयीमुळे कसं पाणी वाया जातं, ते पाणी वाया जावू नये म्हणून काय करायला हवं हे समजून सांगण्याचा प्रयत्न करायची. पण ही एवढीशी मुलगी आपल्याला काय 'ग्यान' देते म्हणत रेस्टाॅरण्ट मालक तिचं सांगणं उडवून लावायचे. पण त्यामुळे गर्विता हताश झाली नाही. तिने आणखी चांगली तयारी करुन रेस्टाॅरण्टमध्ये जाण्याचं ठरवलं.
हेही वाचा!
गर्वितानं पाण्याचं महत्व समजून सांगण्यासाठी आधी आपल्या वर्गातल्या, शाळेतल्या मुला मुलींना तयार केलं. त्यांनी 'व्हाय वेस्ट' नावाची संस्था काढली. या संस्थेद्वारे तिने ' ग्लास हाफ फूल' नावाची चळवळ सुरु केली. गर्विता मग मुलामुलींचा घोळका घेवूनच रेस्टाॅरण्टमध्ये जायची. रेस्टाॅरण्टच्या मालकांना भेटायची. त्यांना ग्लास हाफ फूल या आपल्या मोहिमेबद्दल सांगायची. ही मोहीम आपण आपल्या रेस्टाॅरण्टमध्ये कशी राबवू शकतो. त्याने पाणी वाचवण्यास कसा हातभार लागेल हे समजावून सांगायची. गर्विताच्या या चळवळीला रेस्टाॅरण्ट मालकांनी मग चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. गर्वितानं सुरु केलेल्या ग्लास हाफ फूल या मोहिमेचा परिणाम म्हणून रेस्टाॅरण्ट मालक ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी द्यायचे. ग्लास रिकामा झाला की लगेच पाणी ओतण्याची सवय बदलून त्यांनी टेबलावर पाण्याचा भरलेला जार ठेवायला सुरुवात केली आणि लोकांना हवं तेवढंच पाणी घेण्याची विनंती केली. याचा परिणाम म्हणजे रेस्टाॅरण्टमध्ये पाणी वाया जाण्याचं प्रमाण आधीच्या तुलनेत खूप कमी झालं.
देशातील जास्तीतजास्त रेस्टाॅरण्टस आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी गर्विताने २०१८ मध्ये ५ लाख रेस्टाॅरण्टस सदस्य असलेल्या 'नॅशनल असोसिएशन ऑफ इंडिया' या संघटनेला रेस्टाॅरण्टमध्ये वाया जाणारं पाणी वाचवण्याच्या मोहिमेत सहभागी होवून पाणी वाचवण्यासाठी एक याचिका दिली. त्याचा परिणाम म्हणून बंगळूरुमधली गर्विताची व्हाय वेस्ट ही संस्था आणि या संस्थेने सुरु केलेली ग्लास हाफ फूल ही चळवळ देशभरात पोहोचली. अनेक रेस्टाॅरण्टसने गर्विताच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.

Image: .republicworld
हेही वाचा!

Image: thetribalbox
पाणी वापरावर लक्ष ठेवणारं 'व्हाय वेस्ट ॲप'
गर्विताच्या या मोहिमेला कोविड १९च्या संसर्गामुळे ब्रेक लागला. लाॅकडाउनमुळे रेस्टाॅरण्ट्स बंद झाले. लोकांचं बाहेर पडणं कमी झालं. पण गर्विताला पाणी वाचवण्याची आपली मोहीम थांबवायची नव्हती. तिने आणि तिच्या टीमने 'व्हाय वेस्ट ॲप' हे पाणी वाचवण्याचं मोबाइल ॲप सुरु केलं. या ॲपद्वारे आपण किती पाणी वापरतो, किती वाया घालवतो, आपली रोजची पाण्याची खरी गरज किती हे लोकांना समजायचं आणि रोजच्या जगण्यात आपण सोपे उपाय वापरुन पाणी कसं वाचवू शकत्ं, हे देखील हे ॲप सांगतं. या ॲपद्वारे गर्विताला आपली पाणी वाचवण्याची मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता आली.
एका वेळेस अर्धा ग्लास पाणी किंवा लागेल तेवढंच पाणी घ्या हा संदेश देणारी मोहिम राबवून आज गर्विता आणि तिची टीम कोटी लिटर पाणी वाचवण्यात यशस्वी झाली आहे. गर्विताच्या या मोहिमेने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. २०२० मध्ये गर्विताला या कामासाठी प्रिन्सेस ऑफ वेल्स, प्रिन्सेस डायना यांच्या सन्मानार्थ दिला जाणारा डायना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
आज देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय संस्थासोबत गर्विताची व्हाय वेस्ट ही संस्था काम करत आहे. त्यामुळे ही संस्था, या संस्थेद्वारे उभारण्यात आलेली चळवळ आणि पाणी वाचवण्याचं ध्येय घेवून गर्विता आणि तिची टीम आफ्रिका, युरोप, दुबई, नेपाळ, आफ्रिका, इंग्लड, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये पोहोचली आहे. आता गर्विताची ओळख केवळ बंगळूरुमधील इंजिनिअरची पदवी घेतलेली गर्विता गुल्हाटी इतरकीच राहिलेली नाही. गर्विताला आज 'वाॅटर गर्ल ऑफ इंडिया' म्हणून ओळखलं जातं. गर्विता सांगत असलेला 'एका वेळी अर्धा ग्लास पाणी ' हा संदेश लक्षात ठेवून आपण वागायचं ठरवलं तरी आपण रोज खूप पाणी वाचवू शकतो..
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact