मुलांना सर्व कळतं हे मोठ्यांना कधी समजेल की नाही?

- शिल्पा दातार

 Image: freepik

एका बाबांकडे आपल्या मुलीला नवीन दप्तर घेण्यासाठी पैसे नसतात तर एका आई बाबांकडे माॅलमध्ये जावून खर्च करायला खूप पैसे असतात. दोघांचीही मुलं समजूतदार.. आपले पालक कसे वागतात याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं.

आपण जे खातो ते अन्न कुठून मिळतं, कुणामुळे मिळतं, आपण कसं वागायला पाहिजे हा विचार करायला लावणारा एक लघुपट We Are Responsible . या लघुपटातील ती छोटी मुलगी म्हणजेच आपली मैत्रीण उड्या मारत शेतावर येते. तिच्या एका खांद्यावर शाळेची बॅग असते. शेतामध्ये तिचे बाबा कोथिंबिरीच्या जुड्या स्वच्छ करत असतात. हातातला कागद बाबांच्या हातावर टेकवत ती म्हणते, ‘आईनं किराणा सामान आणायला सांगितलाय. तुरीची डाळ, साखर, तेल, तांदूळ...’ त्यानंतर हळूच म्हणते, मला वह्या आणि साक्षीसारखी छोट्या भीमची बॅग घ्या ना. खरंच तिचं दप्तर खूप फाटलेलं असतं. तिच्या बाबाचा बनियन देखील खूप फाटलेला असतो. त्यांचे हात शेतात काम करुन रापलेले असतात. तरीही हसत तिचे बाबा म्हणतात, ‘बघूया घेता येईल का. आणूया.’

‘तुम्ही नेहमी म्हणता; पण आणत नाही,’ अशी कुरकुर ती करते तेव्हा तिच्या बाबांचा चेहरा उदास होतो. त्यांच्याकडं तिची शाळेची नवीन बॅग आणण्याइतकेही पैसे नसतात.

हेही वाचा!

बाबा तिची बॅग बघतात आणि त्यांना ती बॅग भरपूर फाटलेली दिसते. आता आपल्या मुलीला शाळेची बॅग आणण्याची गरज आहे, हे त्यांना समजतं. आपली भाजी चांगली विकली जाईल,चांगले पैसे मिळतील, मग आपण किराणा सामान आणि मुलीला बॅग घेऊ, असं त्या गरीब शेतकऱ्याला वाटतं. ' उद्या माझ्याबरोबर ये, तुला सुट्टी आहे ना?’ते म्हणतात.

नवीन दप्तर मिळेल म्हणून आपली ही छोटी मैत्रीण खुश होते.

एका मॉलसमोर एक कार थांबते. त्यातून आई, बाबा आणि छोटा मुलगा उतरतात. मॉलमध्ये जायला आपल्यालाही खूप आवडतं किनई. तिथं वेगवेगळे खेळ असतात. नवीन कपडे, वस्तू, खेळणी मिळतात. आपल्या आवडीचे पिझ्झा, बर्गर, पावभाजी असे पदार्थ असतात. मज्जाच मज्जा! एसीच्या थंड वातावरणात हा मुलगा सरकत्या जिन्यावरून वरच्या मजल्यावर जातो. तिथं कपडेच कपडे असतात. वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे... आई, बाबांची खरेदी तो गोड मित्र अगदी कुतुहलाने पाहात असतो. सगळ्यांचीच कपड्यांची खरेदी होते. तिथल्या कॅफेटेरियामध्ये आवडीचे पदार्थ खाल्ले जातात. मॉलमध्ये आई-बाबांना पैसे देताना, कार्ड स्वाइप करताना तो उत्सुकतेनं बघतो. कार्ड स्वाइप करून हजारो रुपयांचं बील आई-बाबा अगदी आनंदानं देतात. त्यांना एवढे पैसे खर्च झाल्याचं अजिबात दुःख होत नाही आणि पैसे खर्च करताना त्यांना कसली चिंताही वाटत नाही. आपल्या आई -बाबांच्या चेहेऱ्यावरचे हावभाव तो मुलगा टिपत असतो, त्या शेतकऱ्याच्या मुलीसारखेच.

Image: freepik

We Are Responsible या मराठी शॉर्ट फिल्ममधली दोन्ही मुलं खूप छोटी आहेत. पण दोघांची परिस्थिती खूपच वेगळी. आपल्या या मैत्रिणीच्या बाबांकडे कपडे फाटले असले तरी नवीन घेण्यासाठी पैसे नाहीत, मुलीचं शाळेचं दप्तर फाटलेले असते तरी नवीन दप्तर आपण घेवू शकू की नाही याची त्यांना खात्री नसते. अशा गोष्टी वाचून, पाहून  आपल्याला किती वाईट वाटतं ना. प्रत्यक्षात कोणी असे गरजू  दिसले तर लहान मुलं त्यांची इच्छा असूनही मदत करू शकत नाहीत. कारण त्यांचे आई-बाबा त्यांना परवानगी देत नाहीत. तुम्ही मोठ्या माणसांबरोबर जेव्हा खरेदीला जात असाल तेव्हा शोरूम, मोठ्या मॉलमधली खरेदी करताना ते हजारो रुपये देतात, तिथे  पैसे कमी करा, असे म्हणत नाहीत. पण भाजीवाल्यांची-फळवाल्यांची गाडी असो, चप्पल दुरुस्त करून देणारे असोत... अशा ठिकाणी मात्र शंभर रुपये बिल झालेले असले तर काही मोठी माणसं साठच किंवा पन्नासच देतो, थोडे पैसे कमी करा, परवडत नाही, असे म्हणतात. हे तुमच्यासारखी मुलं बघत असतात, मोठी माणसं चुकत आहेत असं वाटतं, पण बोलता येत नाही. असं बरेचदा होतं. कष्ट करणाऱ्या माणसांना त्यांचे पैसे व्यवस्थित मिळायला पाहिजेत, असं  लहान मुलांनाही वाटतं.  त्यांच्या मनात विचार सुरु होतात.

लहान मुलंही समजूतदार असतात, जबाबदार, शहाणी असतात हे दाखवणारी ही शाॅर्टफिल्म आहे. या फिल्ममधून माणसांचे स्वभाव आणि विरोधाभास कळतात. त्या छोट्या मुलीचं नवीन दप्तर घेण्याचं स्वप्न पूर्ण होतं का, त्या दिवशी किराणा आणायला पैसे मिळतात का? माॅलमध्ये पैसे खर्च करणाऱ्या आपल्या आई बाबांबद्दल त्या मुलाला खरंच काय वाटतं हे सर्व प्रश्न तुमच्या मनात आता उगवले असतील ना. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी We Are Responsible ही शॉर्ट फिल्म नक्की पाहा!

लघुपटाचे नावः -We Are Responsible

कुठं पाहाल? - YouTube

ZEE Talkies

https://www.youtube.com/watch?v=DG4DZ-GfDFk

mrs.shilpapankaj@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact